मराठी कलाकार आणि त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे लेख ही मराठी गप्पाची विशेष ओळख आहे. यात आपण सातत्याने नवनवीन कलाकारांविषयी लेख लिहीत असतो. या लेखांना असंख्य वाचकसंख्या लाभते. तुमच्या या प्रतिसादाबद्दल मराठी गप्पाच्या टिमकडून मनापासून धन्यवाद ! आज याच मांदियाळीत अशा एका अभिनेत्रीविषयी आपण जाणून घेणार आहोत, जी तिच्या मालिकांतील आणि नाटकांतील भूमिकांसाठी लोकप्रिय आहे आणि यावर्षी ती चित्रपटांतून आपल्यासमोर प्रथमतः येणार आहे. तुम्हाला ओळखता येतंय का कोण आहे ती अभिनेत्री ? एक हिंट देतो. नुकतंच सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक रवी जाधव यांनी एका नायक आणि नायिकेचा फोटो आपल्या सोशल मीडिया पोस्टमार्फत शेअर केला होता.चर्चा अशी आहे की टाईमपास ३ या चित्रपटात ही जोडी झळकणार आहे.
आपल्या पैकी अनेकांनी बरोबर ओळखलं आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे ऋता दुर्गुळे. होय आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री म्हणजे ऋता. तरुणांच्या हृदयात जिचं अढळ स्थान आणि मुलींच्या गराड्यात जिला मान अशी आपली ऋता. मूळची मुंबईकर असलेल्या ऋताने स्वतःचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील नावाजलेल्या शिक्षण संस्थांतून पूर्ण केलं. याच काळात अभिनय, रंगमंच यांच्याशी तिची ओळख झाली. तिची पहिली मालिका म्हणजे दुर्वा. त्यातील प्रमुख भूमिकेने तिला तिच्या पहिल्याच कलाकृतीत महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचतं केलं. तिचे बोलके डोळे तिच्या अभिनयाला व्यक्त करण्यात अगदी खरे उतरले. पुढे तिने अजून एक मालिका केली, ज्यात यशोमान आपटे सोबत तिची मुख्य भूमिका होती. होय, वेगळी ओळख करून द्यावी लागणार नाही अशी ही मालिका. यशोमान आणि ऋता यांच्या कारकिर्दीत एक महत्वाचं वळण. या वळणाने या दोघांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेलं.
आजही मानस आणि वैदेही ही जोडी प्रेक्षकांवर आपलं गारुड कायम ठेवून आहे. पुढे ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसली. फरक फक्त एवढाच की या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे ऋता सांभाळत होती आणि यशोमान हा त्यात स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. पुढे हा कार्यक्रम खूप प्रसिद्ध झाला आणि त्यातून ऋता हिची सूत्रसंचालक म्हणून आपल्या मनातली जागा एकदम पक्की झाली. मालिकेतील अभिनय आणि सूत्रसंचालन या भूमिकांमुळे ऋता केवळ टीव्ही वर काम करते असं वाटत असेल तर ते चूक आहे. कारण, ऋता ही नाटक आणि शॉर्ट फिल्म्स मधूनही अभिनय करत असते. तिने अभिनित केलेल्या शुगर अँड सॉल्ट, रियुनियन २ पुन्हा बाकावर या शॉर्ट फिल्म्स गाजल्या आहेत.
तसेच स्ट्रॉबेरी शेक या कलाकृतीतही तिने अभिनय केलेला आहे. रंगभूमीवर तिने ‘ दादा, एक गुड न्यूज आहे’ हे नाटक केलेलं आहे. किंबहुना येत्या १७ जानेवारी पासून हे नाटक अनलॉक नंतर पुन्हा रंगमंचावर आलं आहे. याची गंमतीशीर आठवण करून देण्यासाठी ऋता आणि कलाकारांच्या टीमने एक विनोदी व्हिडीओ शेअर केला होता. या कलाकारांच्या टीममध्ये उमेश कामत, आरती मोरे आणि ऋषी मनोहर हे कसलेले कलाकार आहेत. यातील ऋषी मनोहर या सहकलाकारासोबत ऋताचा एक चित्रपट येत्या काळात आपल्या भेटीस येईल. या चित्रपटाचं नाव अजूनही प्रसिद्ध झालेलं नाहीये पण हा चित्रपट उत्तम असेल हे नक्की. या चित्रपटाची निर्मिती अभिनेता ऋतुराज शिंदे आणि लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केलेलं आहे. पण या चित्रपटा अगोदर हृताचा अजून एक बहुचर्चित चित्रपट प्रसिद्ध होईल अशी चिन्ह आहेत.
हा चित्रपट म्हणजे अनन्या नाटकावर बेतलेला आणि तेच नाव असलेला चित्रपट आहे. अनन्या हे नाटक ऋतुजा बागवे हिने स्वतःच्या सशक्त अभिनयाने सजवलं होतं. लॉक डाऊन होण्याअगोदर अगदी कमी काळात या नाटकाचे ३०० च्या आसपास प्रयोग झाले होते. त्यामुळे या आगामी चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत हे नक्की. पण ऋता आहे म्हंटल्यावर उत्तम अभिनय असणारच हे नक्की. सोबत सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यामुळे ऋताच्या चाहत्यांना या वर्षी ऋताच्या अभिनयाने नटलेल्या निदान तीन कलाकृती तरी अनुभवता येतील हे नक्की आणि केवळ तीनच नव्हे तर येत्या काळात अनेक कलाकृतींमधून ऋता तिच्या अभिनयाने, सुत्रसंचालनाने आनंद देत राहील हे नक्की. तिच्या यापुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !