मराठी सिनेसृष्टीतील सगळ्यात हॅपनिंग जोडी सध्या कोणती असेल तर ती आहे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या दोघांची. त्यांची भन्नाट केमिस्ट्री त्यांच्या फोटोज, मुलाखतीतून आपण सतत बघत आलो आहोत. जोडी म्हणून जसे ते प्रसिद्ध आहेतच तसेच त्यांनी गेल्या काही काळात केलेल्या आणि करत असलेल्या उत्तमोत्तम कलाकृतींसाठीही ते लोकप्रिय आहेत. सिद्धार्थला आपण ओळखतो ते त्याच्या झेंडा, वाडा चिरेबंदी, जिवलगा, गुलाबजाम, क्लासमेट्स या सिनेमा-नाटकातील अभिनयासाठी. त्याने एक म्युजिक विडीयोहि काही काळापूर्वी केला होता. तसेच अप्सरा आली या डान्स रियालिटी शोमध्ये सूत्रसंचालकच्या भूमिकेत तो दिसला होता. सिद्धार्थप्रमाणेच आपण मितालीला तिच्या नाटक, सिनेमा आणि मालिकांसाठी ओळखतो. सध्या तिची प्रमुख भूमिका असलेली ‘लाडाची मी लेक गं’ हि मालिका दाखल झाली असून प्रेक्षकांना ती खूप आवडते आहे. याआधी तिने फ्रेशर्स या मालिकेत, उर्फी या सिनेमात काम केलं आहे. तसेच, महाराष्ट्राचा फेवरीट डान्सर या डान्स रियालिटी शो मध्ये सहभाग घेतला होता.
या दोघांची पहिली भेट झाली २०१७ साली. तेव्हा मिताली ‘फ्रेशर्स’ हि मालिका करत होती आणि सिद्धार्थ एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन. फ्रेशर्सच्या प्रमोशननिमित्त त्यांची भेट झाली तो दिवस होता, २४ जानेवारी २०१७ आणि गेल्या वर्षी बरोब्बर दोन वर्षांनी त्यांनी २४ जानेवारी २०१९ ला साखरपुडा केला. त्यांच्या पहिल्या भेटीनंतर इंस्टाग्राम वर दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. त्या दोघांना हॅरी पॉटर फार आवडतो. हाच त्यांच्या गप्पांमधला समान दुवा ठरला. हळू हळू या नुसत्या बोलण्याचं रुपांतर मैत्रीत आणि मग प्रेमात झालं. २०१८ साली सिद्धार्थ ने मितालीला लग्नासाठी विचारलं आणि ती हो म्हणाली. आधी सांगितल्या प्रमाणे यथासांग त्यांचा साखरपुडाही झाला. या वर्षी त्यांचं लग्नही होणार होतं. पण करोनाची माशी शिंकली आणि ठरवलेल्या गोष्टी जागच्या जागी थिजल्या. खरं तर ठरलेल्या वेळी घरचे आणि अगदीच निवडक नातेवाईक यांच्या सोबतीने ते करू शकले असते. पण लग्न करायचं तर व्यवस्थित आणि सगळ्या नातेवाईकांच्या साथीने असा त्या दोघांचा विचार झाला. सरतेशेवटी त्यांचा लग्नाचा मुहूर्त पुढील वर्षी ढकलला गेला असल्याचं मितालीने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हंटलं आहे.
त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना पुढील वर्षी पर्यंत या जोडीच्या लग्नासाठी थांबावं लागणार आहे. पण, त्यांचे एकत्र भटकंती करतानाचे क्षण पहायचे असल्यास त्यांच्या एकत्रित चालवलेल्या इंस्टाग्राम अकाउंटला नक्की भेट द्या. नाव आहे @tinypandaofficial. या नावामागे पण एक गंमत आहे बरं का. सिद्धार्थ मितालीला tiny म्हणतो आणि ती त्याला panda म्हणून हे असं नाव. सध्या लॉकडाऊनमुळे घरीच असले तरीही लॉकडाऊन आधीचे बाहेरगावी केलेल्या प्रवासाचे फोटोज पहायला मिळतात. हि जोडी आपलं आयुष्य मनमुराद जगताना दिसते. आजकालच्या तरुणाईचं खऱ्या अर्थाने हि जोडी प्रतिक आहे असं म्हणण्यास हरकत नाही. पुढील वर्षी त्यांचं लग्न अगदी यथासांग आणि धुमधडाक्यात पार पडो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी या उत्साही जोडीला मराठी गप्पा टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)