Breaking News
Home / मराठी तडका / सिम्बा, काशिनाथ घाणेकर सारख्या चित्रपटांत काम केलेली वैदेही खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा वैदेहीची जीवनकहाणी

सिम्बा, काशिनाथ घाणेकर सारख्या चित्रपटांत काम केलेली वैदेही खऱ्या आयुष्यात कशी आहे, बघा वैदेहीची जीवनकहाणी

मराठी गप्पावर आपण वेगवेगळ्या कलाकारांच्या विषयी वाचत असतो, त्यांची जीवनकहाणी जाणून घेत असतो. आज आपण एका अश्या सुंदर अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत, जिने मराठी सोबतच हिंदी चित्रपटांत देखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. आपल्या घायाळ करणाऱ्या सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आहे वैदेही परशुरामी जिने मराठीत ‘आणि डॉ काशिनाथ घाणेकर’ तर हिंदीमध्ये ‘सिम्बा’ सारख्या चित्रपटांत काम केलेले आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली. वैदेहीने मनात ठरवले नसतानादेखील ती अभिनयक्षेत्रात कशी आली, ती खऱ्या आयुष्यात कशी आहे. चला तर जाणून घेऊया वैदेहीच्या खऱ्या आयुष्याविषयी.

वैदेहीचा जन्म १ फेब्रुवारी १९९२ रोजी मुंबईत झाला. वयाच्या सातव्या वर्षापासूनच तिने नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली. तिला अभिनय करायचे आहे असे, कधी तिने ठरवलं देखील नव्हतं. शाळेत असताना तिने काही नाटकात काम केले होते. परंतु तिला असं वाटलं नव्हते कि, तिला चित्रपटसृष्टीत करिअर करायचे आहे. परंतु तिने वयाच्या १७ व्या वर्षीच अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत पर्दापण केले. ह्यामागे कारणही तसे मनोरंजकच आहे. वैदेही आशाताई जोगळेकर ह्यांच्याकडे कत्थकचे शिक्षण घेत होती. त्यांच्याकडेच अभिनेत्री उर्मिला कानेटकर सुद्धा कत्थकच्या शिक्षणासाठी येत होत्या. त्याचदरम्यान अभिनेत्री उर्मिला कानिटकर आणि आदिनाथ कोठारे ह्यांचे लग्न ठरत होते. त्यादरम्यान उर्मिलाचा परफॉर्मन्स बघण्याकरिता महेश कोठारे आणि त्यांचे कुटुंब कत्थकचा वार्षिक कार्यक्रम पाहायला आले होते. त्यांना वैदेहीचा परफॉर्मन्स खूप आवडला. त्यावेळी महेश कोठारे ‘वेड लावी जिवा’ ह्या चित्रपटासाठी आदिनाथ कोठारे ह्याच्या पर्दापणाविषयी सुद्धा प्लॅन करत होते. त्यांनी चर्चा करून मग उर्मिला कानिटकर ह्यांच्या आईला वैदेहीसाठी चित्रपटासाठी विचारणा केली.

सुरुवातील वैदेहीच्या आईने नकार दिला. वैदेहीच्या सुद्धा मनात चित्रपट करिअर विषयी काही ओढ नव्हती. परंतु जेव्हा त्यांना खूप समजावले, खूप चांगली संधी आहे, चर्चा करा आणि सांगा. आई आणि वैदेहीचा नकारच होता. परंतु वडिलांनी सांगितले कि तू एकदा करून बघ. तुला कसं वाटतं ते बघ. कारण वडिलांनी अगोदर कॉलेजमध्ये नाटकांत काम केलेले होते. वडिलांचे म्हणणे वैदेहीला पटलं. त्यानंतर तिने चित्रपटासाठी ऑडिशन दिले. महेश कोठारेंना तिचे ऑडिशन आवडलं. आणि मग तिला तिचा पहिला चित्रपट मिळाला. तिने अकरावी बारावी कॉमर्स मधून पूर्ण केले. परंतु तिला नंतर असं वाटले कि आकड्यांमध्ये जास्त इंटरेस्ट नाही आहे, त्यापेक्षा जास्त भाषेत इंटरेस्ट आहे. त्यामुळे मग तिने रुईया कॉलेजमधून बीए साठी ऍडमिशन घेतले. परंतु एका मागून एक चित्रपटाच्या संधी येत गेल्या. आणि हळूहळू ती चित्रपटसृष्टीकडे वळत गेली. परंतु तिने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. तिचे शिक्षण सुरूच होते आणि तिला एक एक चित्रपट मिळत गेले, ते ती करत गेली. तिने तिचे बीएचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने एलएलबी करायचे ठरवले, कारण तिच्या घरी सर्व एलएलबी शिक्षण केलेले आहेत. जेव्हा तिने तिचे एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. योगायोगाने तेव्हाच तिला ‘आणि काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट मिळाला. ह्या चित्रपटानंतर तिने ठरवलं कि आता मागे वळून बघायचं नाही. आता हेच करिअर करायचं, तिने ठरवूनच टाकलं.

तिला डान्सची प्रचंड आवड आहे. वैदेही खऱ्या आयुष्यात थोडी वेगळी आहे. तिचे काही मोजके लोकं आहेत, ज्यांच्यासोबत ती तिचं मन मोकळं करते. त्यांच्यासोबत खूप वेडेपणा करते. तिला गॉसिप करायला खूप आवडतं. तसेच तिला नकला करायलाही खूप आवडतं. एखाद्याची एखादी गोष्ट लक्षात राहिली किंवा चेष्टा मस्करी करताना तिला खूप पटकन गोष्टी आठवतात आणि मग ती त्यांची नक्कल करते. तिला प्राण्यांबद्दल खूप प्रेम आहे खासकरून कुत्रे. तिच्या म्हणण्यानुसार ते खूप प्रेमळ असतात, ते जबाबदार सुद्धा असतात आणि आपल्याकडून जास्त काही अपेक्षा सुद्धा करत नाहीत. तिला खायला खूप आवडतं. त्याचप्रमाणे झोपही तिला प्रिय आहे. ती नेहमी आनंदी असते. बंजी जम्पिंग सारख्या थरारक गोष्टी करायला ती खूप घाबरते. तिला तिची हि भीती घालवण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. ती तिच्या आई वडिलांना आदर्श मानते. ‘कितीही मोठी झालीस तर जमिनीवर राहा’ हे वडिलांनी सांगितलेले शब्द ती नेहमी लक्षात ठेवते. तिचा सध्याचा सेलेब्रिटी क्रश सोनू सूद आहे.

वैदेहीला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत असतात. परंतु ती निवडक चित्रपटांतच काम करते. ती तिचं काम खूपच काळजीपूर्वक निवडते. तिला मोजकीच पण प्रेक्षकांना लक्षात राहतील अशी कामे करायची आहे. केवळ अभिनेत्री म्हणून तिला काम करायचे नाही आहे. तर चित्रपटातील भूमिका मग ती छोटी असो किंवा मोठी, परंतु ती प्रेक्षकांच्या लक्षात राहील, हे वैदेहीसाठी खूप महत्वाचे आहे. वैदेहीने ‘वेड लावी जीवा’, ‘वृंदावन’, ‘कोकणस्थ’, ‘आणि डॉ काशिनाथ घाणेकर’ ‘एफयू’ ह्यासारख्या मराठी चित्रपटांत काम केलेले आहे. तसेच तिने ‘वजीर’ आणि ‘सिम्बा’ सारख्या बॉलिवूड चित्रपटांत काम करून आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. वैदेही ह्यापुढे देखील आपल्या अभिनयाची जोरावर रसिकांच्या मनावर राज्य करेल, ह्यात काही शंका नाही. तिच्या चित्रपट कारकिर्दीसाठी पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाकडून हार्दिक शुभेच्छा.

(Author : Rahul Ranjan Arekar)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *