Breaking News
Home / मराठी तडका / सीरिअलमध्ये एकत्र काम करताना झाले होते प्रेम, ८ वर्षांनी लहान असूनदेखील प्रियाने केला होता प्रपोज

सीरिअलमध्ये एकत्र काम करताना झाले होते प्रेम, ८ वर्षांनी लहान असूनदेखील प्रियाने केला होता प्रपोज

मनोरंजन क्षेत्रामधे अनेक जोड्या एकत्र काम करण्यामुळे प्रसिद्ध होतात. त्यांच्या एकमेकांना पूरक स्वभावामुळे अनेक वेळेस ह्या जोड्या खऱ्या आयुष्यातही एकमेकांशी एकरूप होतात. प्रेक्षकांच्या तर पसंतीस उतरलेल्या असतातच. पण प्रेक्षकांचं सदाबहार प्रेम प्रत्येक जोडीला मिळत राहातच असं नाही. पण काही जोड्या मात्र प्रेक्षकांच्या ऑल टाईम फेवरिट असतात. त्यातलीच एक आघाडीची जोडी म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत. चुलबुली प्रिया आणि तेवढाच शांत उमेश अशी हि जोडी प्रेक्षकांना आवडतेच. आपण त्यांच्याशी सोशल मिडियावरून कनेक्टेड असतोच. त्यांच्या एकत्र फोटोंवर लाईक्स करतो, कमेंट्स करतो. पण आपल्या पैकी किती जणांना माहिती आहे त्यांची लवस्टोरी आणि हे सुद्धा कि त्यांचं लग्न व्हायला जवळपास सहा वर्ष लागली ते? नाही न माहित, मग जाणून घ्या तर.

प्रियाला शाळेपासूनच अभिनय आणि कलाक्षेत्राची आवड होती. तिने “दे धमाल” या त्या वेळेच्या सुप्रसिद्ध कार्यक्रमामधे बालकलाकार म्हणून काम केलं होतं. पुढे “भेट” या चित्रपटामध्ये तिने काम केलं. ज्यात उमेशही होता. पण गंमतीचा भाग असा कि त्यात त्या दोघांचा एकत्र म्हणावा असा एकही सीन न्हवता. त्यामुळे चित्रपटाचं नाव भेट असूनही त्यांची पहिली भेट झाली ती थेट चित्रपटाच्या प्रीव्यूच्या वेळी. मग ते पुन्हा भेटले ते “आभाळमाया” या सुप्रसिद्ध मालिकेच्या वेळी. प्रिया उमेश पेक्षा आठ वर्षाने लहान. त्यामुळे उमेश समोर तिची “दे धमाल” मधली बालकलाकार हीच ओळख होती. पुढे आभाळमाया पासून त्यांच्यात मैत्री सुरु झाली. एकमेकांचे फोन नंबर्स घेतले गेले. पुढे यथावकाश वादळवाट या मालिकेत त्यांनी एकत्र काम केले. आणि हि मैत्री अजूनच वाढत गेली.

प्रियाला उमेश आवडत होता आणि उमेशला प्रिया. या मैत्रीचं प्रेमात रुपांतर व्हावं असं दोघांना वाटत होतच. यात पुढाकार घेतला तो प्रियाने. तिने त्याला मागणी घातली २००६ ची घटना असावी. उमेशने सुद्धा होकार दर्शवला, पण लगेचच नाही. तुम्ही म्हणाल, त्याला विचार करायला वेळ हवा असेल. तसं न्हवतं. साधारण एका महिन्याच्या अंतराने त्याने तिला होकार कळवला. त्याने होकार दिला ती तारीख होती १८ सप्टेंबर २००६. कारण हा दिवस म्हणजे प्रियाचा वाढदिवस. पण मागणी घातली म्हणून लगेच लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला नाही. मधला काळ जवळपास ५ वर्षांचा होता. त्यांनी २०११ मधे लग्न केलं. म्हणता म्हणता आज त्यांच्या लग्नाला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. पण मग लग्न करायला त्यांनी एवढा वेळ का घेतला असावा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खरं तर त्याचं लग्न थोडं आधी होऊ शकलं असतं. पण उमेश आणि प्रियाच्या लग्नावेळी उमेश प्रसिद्ध होता. पण तो अजून जास्त स्थिरस्थावर असावा अशी प्रियाच्या घरच्यांची मागणी होती. उमेशला सुद्धा थोडा वेळ हवा होता.

तेव्हा दोघांनीही ठरवलं, आई वडिल्यांच्या म्हणायला विरोध करण्यापेक्षा थोडं थांबायचं. त्यांनी स्वतःला आणि घरच्यांना वेळ दिला. दरम्यानच्या काळात दोघांनी आपलं करियर उत्तम रीतीने उभारलं. सिरियल्स, सिनेमे ते करत राहिले. मनोरंजन दुनियेत चर्चा होतीच. तसच, घरच्यांना आपली बाजू पूर्णपणे पटवून पण दिली. दोघांनाही पुढच्या वाटचालीसाठी आत्मविश्वास होताच. आणि तो क्षण आला जेव्हा घरच्यांनीही हिरवा कंदील दाखवला. अशा प्रकारे हि आपली लाडकी जोडी, २०११ च्या ऑक्टोबर मधे लग्नाच्या बेडीत अडकली ती आजतागायत. आज आपली सर्वार्थाने हि लाडकी जोडी आहे. सिरियल्स म्हणू नका, सिनेमे म्हणू नका, वेब सिरीज म्हणू नका, दोघांनीही आपल्याला सदैव आपल्या अभिनयाने आनंदच दिला आहे. त्यांची नैसर्गिक केमिस्ट्री खऱ्या आणि पडद्यावरच्या आयुष्यातही सदैव कायम राहो. आणि या पुढेही आपल्याला आनंद देत राहो. या प्रेमळ जोडीला येत्या काळासाठी भरपूर शुभेच्छा.

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *