मराठी गप्पाच्या टीमचे लेख म्हंटले की विविध मालिका, त्यातील कलाकार यांच्याविषयीचे लेख ओघाने येतात. त्यातही उत्तम काम करणाऱ्या कलाकारांवर आवर्जून लेख लिहावा आणि त्यांच्या कलाप्रवासाची ओळख आमच्या वाचकांना करून द्यावी, हा आमच्या टीमचा उद्देश असतो. यावर्षीही आमची टीम यात खंड पडू देणार नाहीये. आजच्या या लेखातून एका अभ्यासू, वैविध्यपूर्ण माध्यमातून व्यक्त होणाऱ्या अभिनेत्रीविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. ही अभिनेत्री सध्या सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत हेमा ही व्यक्तिरेखा साकार करते आहे. होय, बरोबर ओळखलंत, तू माझा सांगाती मधील आवली ही व्यक्तिरेखा साकार करणारी ही अभिनेत्री.
प्रमिती नरके असं तिचं नाव. प्रमिती मुळची पुण्याची. तिथे तिचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झालं. लहानपणापासून तिला कलाक्षेत्राबद्दल आकर्षण. ती विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून भाग घेत असे. महाविद्यालयात असतानाच आपली ही आवड आपली उत्तम कारकीर्द होऊ शकते, हे तिच्या लक्षात आलं. मग त्यासाठी अभिनयाचा अभ्यास महत्वाचा म्हणून पुण्यातील प्रसिद्ध ललित कलाकेंद्रात तिने नाट्यशास्त्राचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. या काळात तिच्यातील अभिनेत्रीला पैलू पडत गेले. या काळात तिने अनेक प्रयोगांतून स्वतःला जोखलं. स्वतःच्या अभिनेत्री म्हणून अधिक उण्या बाजूंवर तिने काम केलं. हे शिक्षण संपल्यावर मग तिने मुंबईची वाट धरली. ऑडिशन्स देणं सुरू केलं आणि काही काळाने तिला ‘तू माझा सांगाती’ ही मालिका मिळाली. यातील आवली ही ऐतिहासिक भूमिका प्रेक्षकांना खूपच भावली. त्यामुळे चांगले वाईट अनुभव तिला आले. पण हीच तिच्या अभिनयासाठीची पोचपावती असं म्हणूयात. या काळात तिने रंगमंचाशी असलेलं नातं तोडलं नव्हतं. अनेक प्रायोगिक नाटकांतून ती प्रेक्षकांचं मनोरंजन आणि नाटकांत प्रयोग करत राहिली.
यातील ‘रीड मी इन 5D झोन’ हे नाटक विशेष गाजलं. तोडी मिल, ह्या सल्या ENERGY चं करायचं काय ह्या अजून काही नाट्यकृती. मालिका, नाटक यांच्यासोबत तिने शॉर्ट फिल्म्स मधूनही मुशाफिरी केली आहे. ब्लर्ड लाईन्स, डोह या तिच्या गाजलेल्या शॉर्ट फिल्म्स. ब्लॅर्ड लाईन्स या शॉर्ट फिल्म ला तर ११ लाखांहून अधिक प्रेक्षक लाभले आहेत. एकूणच काय, तर ही गुणी अभिनेत्री विविध माध्यमातून व्यक्त होत आली आहे आणि यापुढेही होत राहील हे नक्की. सध्या ती ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत व्यस्त आहे. येत्या काळात तिच्या अनेक उत्तमोत्तम कलाकृती आपल्याला पाहायला मिळतील हे नक्की. तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !