अनेक नवनवीन मालिका सध्या विविध वाहिन्यांवर दाखल होत आहेत. यातील काही मालिकांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ हि त्यातलीच एक मालिका. या मालिकेतील लतिका आणि अभिमन्यू या व्यक्तिरेखांच्या केमिस्ट्रीमुळे मालिकेतील कथानकात गंमत निर्माण होते. यात अक्षया नाईक हिने लतिका तर समीर परांजपे याने अभिमन्यू या मुख्य भूमिका साकारल्या आहेत. याआधी आपण समीर बद्दल काही आठवड्यांपूर्वी मराठी गप्पाच्या एका लेखातून वाचलं असेलच. तसच कामिनी हि भूमिका करणाऱ्या पूजा पुरंदरेविषयी सुद्धा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या लेखात वाचलं असेलं. आज या मालिकेतील लतिका या मध्यवर्ती भूमिकेच्या निमित्ताने अक्षया नाईक हिच्या कलाप्रवासाचा आपण थोडक्यात धांडोळा घेणार आहोत.
लतिका हि मुंबईची. तिचं बालपण, शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झालं. तिला अभिनय, नृत्य यांची आधीपासूनच आवड. काही काळापूर्वी तिने तिच्या सोशल मिडियावरती एक विडीयो अपलोड केला होता ज्यात ती शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य करताना दिसत होती. आपली हि कलेची आवड केवळ छंद म्हणून जोपासण्याऐवजी त्यात करियर करण्याचा तिने निर्णय घेतला. मग तिने काही अभिनयाच्या वर्क शॉप्समधून अभिनयाचे धडे गिरवले. या निमित्ताने ती ‘पृथ्वी थिएटर’, ‘अंतरंग’ या नाटकाच्या फेस्टिवलशी जोडली गेली. ‘अंतरंग’ अंतर्गत तिने काही नाटकांत कामे केली आहेत. त्यातील उल्लेखनीय म्हणावं असं काम म्हणजे सखाराम बाइंडर मधली चंपा तिने साकारली होती. एल.जी.बी.टी. या नाटकातही तिने अभिनय केला आहे.
नाटकांसोबतच तिने फिल्म्स आणि वेबसिरीजमध्ये हि अभिनय केला आहे. ‘इतवार’ ह्या सिनेमातलं तिचं काम विशेष गाजलं आहे. या सिनेमाला “इंडियन फिल्म प्रोजेक्ट”चा “गोल्ड फिल्म ऑफ द इयर” हा पुरस्कार मिळाला आहे. तसच, फिट इंडिया या शॉर्ट फिल्ममध्ये तिने मुख्य भूमिका बजावली आहे. “जिओ लाईक पम्मी” या वेबसिरीजमध्येही तिने काम केलं आहे. तिने शॉर्ट फिल्म्स आणि वेबसिरीज या नवीन माध्यमांसोबत मालिकांमध्येही कामे केली आहेत. सध्या चालू असलेली ‘सुंदरा मनामध्ये भरली’ हि मराठीतील मालिका. तसेच हिंदीत तिने ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ हि मालिका केली होती. यातील तिच्या भूमिकेची बरीच चर्चाही झाली होती. अभिनयासोबतच तिला नृत्याची आवडसुद्धा आहे. तिचं स्वतःच युट्युब चॅनेल सुद्धा आहे. या चॅनेलवर तुम्हाला तिने केलेली नृत्यं पाहता येतील. तसेच तिला भटकंतीचीही आवड आहेच. तिचे विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देतानाचे विडीयोजही पाहता येतात.
अक्षया हि इतर भटकंती करणाऱ्या माणसांसारखीच अगदी फुडी आहे. तिला विविध खाद्यपदार्थ खायला खूप आवडतात. तशीच ती एक उत्तम वाचकही आहे. तिला विविध पुस्तकं वाचायला खूप आवडतं. याखेरीज तिला हिंदीतील आदित्य नारायण हा गायक-सूत्रसंचालक खूप आवडतो. तिच्या वाढदिवसानिमित्त जेव्हा त्याने तिला एका विडीयोद्वारे शुभेच्छा दिल्या तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अक्षया प्रत्येक व्यक्तिरेखा अगदी मनापासून आणि पूर्ण जीव ओतून निभावते. लतिका हि, “सुंदरा मनामध्ये भरली” मधली भूमिका सुद्धा यास अपवाद नाही. तिचं बालपण गेलं मुंबईत, पण लतिका हि व्यक्तिरेखा नाशिक जवळच्या भागातील दाखवली आहे. त्यामुळे त्या भागातील मराठी भाषेचा लहेजा शिकण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली, असं एका मुलाखतीत नमूद केलेलं होतं.
तिचा स्वभाव जसा अभ्यासू आणि जीव ओतून काम करण्याचा आहे, तसाच तो एकदम बिनधास्तही आणि सडेतोडही आहे. मालिकांच्या निमित्ताने तिची प्रसिद्धी जस जशी वाढायला लागली तस तशी प्रशंसकांची संख्या तर वाढलीच. पण सोबत काही जण तिच्या वजनावरून तिला सोशल मिडियावरून चिडवत असत. तिनेही मग अशा ट्रोल करणाऱ्यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून असा काही दणका दिला कि विचारायला नको. तर अशी हि बिनधास्त अक्षया अभिनयात आणि नृत्यात अग्रेसर आहे आणि विविध माध्यमांतून या तिच्या कला ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असते. नाटक, शॉर्ट फिल्म्स, वेबसिरीज, मालिका असा तिचा कलाप्रवास या पुढेही अव्याहतपणे आणि यशस्विरीत्त्या सुरु राहील हे नक्की. तिच्या पुढील वाटचालीसाठी तिला मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)