‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेला प्रेक्षकांच्या रूपात प्रचंड चाहता वर्ग मिळाला आहे. या मालिकेच्या इंस्टाग्राम हँडलने नुकतेच १०,००० फॉलोवर्स चा टप्पा पार केला. यावरून त्यांची तरुणाईमध्ये असलेली प्रसिद्धी प्रामुख्याने दिसून येते. या मालिकेतील मुख्य व्यक्तिरेखा गौरी आणि जयदीप यांचा नुकतंच लग्न झालं असं दाखवलं गेलंय. मालिकेतील हे एक महत्वाचे वळण आहे. आज या लेखात गौरी आणि जयदीप यांच्या मालिकेतील लग्नाच्या निमित्ताने, या सुप्रसिद्ध मालिकेतील प्रमुख पात्रांच्या भूमिका निभावणारे कलाकार आणि त्यांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार यांच्याविषयी आपण थोडंस जाणून घेणार आहोत.
१. वर्षा उसगांवकर :
मराठी सिनेमाला पडलेलं एक सुंदर स्वप्न म्हणजे वर्षाजी. गंमत जंमत सारख्या सदाबहार मराठी सिनेमातून त्यांनी सिनेअभिनयाला सुरवात केली. तिथपासून ते आजतागायत त्यांनी अनेक भूमिका रंगवल्या. टेलिव्हिजन वरती त्यांचा वावर त्यामानाने कमी असे. पण या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या निमित्ताने त्या तब्बल दहा वर्षांनी टेलिव्हिजनच्या पडदयावर कोठारे विजनच्या प्रोडक्शन हाउसतर्फे दाखल झाल्या आहेत. गंमत अशी कि दहा वर्षांपूर्वीहि त्यांनी एक मालिका केली होती, जी महेश कोठारे यांच्याच निर्मिती संस्थेची म्हणजे कोठारे विजनची होती. त्यांची कारकीर्द जशी प्रदीर्घ तशीच वैविध्यपूर्ण भूमिकांनी नटलेली आहे. या मालिकेत त्यांनी नंदिनी म्हणजेच ‘माई’ही व्यक्तिरेखा साकारली आहे.
अशा या चतुरस्त्र अभिनेत्रीला आयुष्यात खंबीर साथ लाभली ती त्यांच्या पतीची. त्यांचे पती म्हणजे, अजय शर्मा. अजयजी हे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रविशंकर शर्मा यांचे सुपुत्र आहेत. वर्षाजींचा मनोरंजन विश्वातील प्रवास चालू असताना, त्यांच्या पतीराजांनी मात्र प्रसिद्धी पासून दूर राहणेच पसंत केले. यंदा या जोडीच्या लग्नाला वीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त या जोडीचं मराठी गप्पाच्या टीमकडून प्रथमतः अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
२. मंदार जाधव :
मंदार जाधव या गुणी अभिनेत्याने गेल्या काही वर्षांत विविध भूमिका करून आपली स्वतःची अशी ओळख निर्माण केली आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेत त्याने दत्त गुरूंची त्या मालिकेतील मध्यवर्ती भूमिका केली होती. त्याने मराठी सोबतच हिंदीतही काम केले आहे. अभिनेता म्हणून त्याचे एक वैशिष्ठ्य म्हणजे जेव्हा मालिकेत त्याच्या व्यक्तिरेखेला स्टंट करावे लागतात तेव्हा तो ते स्वतः करतो. तसेच स्वतःच्या फिटनेसकडे त्याचं अगदी काटेकोरपणे लक्ष असतं. असा हा नव्या दमाचा आणि नव्या युगाचा अभिनेता. या मालिकेत त्याने जयदीप ही प्रमुख भूमिका साकारली आहे.
त्याने लग्न गाठबांधली ती मितिका शर्मा हिच्याशी. दोघांचं अरेंज्ड मॅरेज आहे. पण त्यांच्यातलं प्रेम पाहता त्यांचा प्रेम विवाह असावा, असं वाटतं. मितिका ही सुद्धा एक उत्तम अभिनेत्री आहे. तिने ‘देवो के देव महादेव’ आणि ‘ख्वाहिश’ या गाजलेल्या मालिकांमध्ये अभिनय केलेला आहे. या गोड जोडीला दोन गोंडस मुलं सुद्धा आहेत. लग्नाच्या या चार वर्षांत त्यांनी एकमेकांना एकदम भक्कम साथ दिली आहे. यापुढेही ते एकमेकांना अशीच भक्कम साथ देत राहतील हे नक्की. त्यांच्या पुढील यशस्वी वाटचाली साठी मराठी गप्पाच्या टीमकडून त्यांना खुप खुप शुभेच्छा!
३. मीनाक्षी राठोड :
मीनाक्षीने या मालिकेत देविका ही खलनायिकी भूमिका उत्तमरीतीने साकारली आहे. गेल्या काही काळात वेगवेगळ्या भूमिकेतून आपल्या भेटिस आली आहे. पण तिचा हा प्रवास काही आत्ताचा नाही. गेली काही वर्षे ती आणि तिचा नवरा कलाक्षेत्रात सातत्याने आपलं योगदान देत आले आहेत. तिच्या नवऱ्याचं नाव कैलास वाघमारे. कैलासला आपण अनेक शॉर्ट फिल्म्स साठी ओळखतो. तसेच ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहोल्ला’ या नाटकासाठी ओळखतो . नुकताच त्याने तान्हाजी या सिनेमात महत्वपूर्ण काम केलं होतं. खरं तर भूमिका लहान होती, पण कैलासची अभिनय क्षमता बघून भुमिकेची लांबी वाढवली गेली. अभिनयासोबत कैलास उत्तम लिहितो, दिग्दर्शनही उत्तम करतो. त्याच्या कॉलेजमध्ये तो त्याच्या याच हरहुन्नरी स्वभावामुळे प्रसिद्ध होता.
किंबहुना त्याच्या कविता ह्या, मिनाक्षीला आवडायच्या आणि आजही आवडतात. कैलास तिला कॉलेज मध्ये सिनियर. दोघांची ओळख त्या कॉलेज दिवसांत झाली. पुढे प्रेमात रूपांतर झालं. पुढे कामानिमित्त मुंबईला राहणं झालं आणि यथावकाश लग्नही. आज दोघेही उत्तम कलाकार म्हणून लोकप्रिय होत आहेत. प्रेक्षक पसंती आणि पुरस्कार मिळवत आहेत. विविध कलाकृतींमधून ते सतत आपल्या भेटीस येत असतात. त्यांच्या कलाकृती, व्यक्तिरेखा या मनोरंजन तर करतातच सोबत विचार करायलाही भाग पडतात. अशा या कलंदर जोडीला मराठी गप्पा कडून पुढील यशस्वी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा !
४. माधवी निमकर :
मराठी मनोरंजन विश्वातील अभिनय आणि फिटनेस याबतीत सदैव जागरूक असणारी एक आघाडीची अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर. तिचा यशस्वी पण खडतर प्रवास आपण मराठी गप्पाच्या एका लेखात वाचला आहेच.
या खडतर प्रवासात माधवी ला भक्कम साथ लाभली आहे ती तिच्या नवऱ्याची. त्यांचं नाव विक्रांत कुलकर्णी आहे. खरं तर अभिनयाचं क्षेत्र म्हंटलं की शूटिंग, प्रवास यांची दगदग होते. पण या सगळ्या गोष्टी सांभाळताना त्यांना मदत होते ती नवऱ्याची. या दोघांना एक मुलगा सुद्धा आहे. त्याचं नाव रुबेन. सध्या सुखं म्हणजे काय असतं या मालिकेत माधवी यांची प्रमुख खलनायिका अशी भूमिका आहे. व्यक्तिरेखेचं नाव शालिनी असं आहे. या सुप्रसिद्ध मालिकेच्या शूटिंग मध्ये त्या सध्या व्यस्त आहेत. पण तरीही मुलाला देण्यासाठी दोघेही आठवणीने वेळ काढतात. या प्रगतिशील आणि प्रेमळ जोडप्याला मराठी गप्पाच्या टीम कडून पूढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)