Breaking News
Home / मराठी तडका / सुबोध भावे ह्यांची प्रेमकहाणी आहे खूपच फिल्मी, शाळेच्या वयातच झाले होते दोघांचे प्रेम

सुबोध भावे ह्यांची प्रेमकहाणी आहे खूपच फिल्मी, शाळेच्या वयातच झाले होते दोघांचे प्रेम

मराठी चित्रपटसृष्टीत सुबोध भावे ह्याचे नाव एक उत्कृष्ट अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून घेतले जाते. लोकमान्य, बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली, मी काशिनाथ घाणेकर ह्यासारख्या चित्रपटांमधील सुबोधचा अभिनय पाहून प्रेक्षकांनीही त्याच्या अभिनयाचे कौतुक केले. ‘तुला पाहते रे’ मालिकेत सुबोधने सुरुवातीला रोमँटिक भूमिका साकारली होती. परंतु केवळ चित्रपट किंवा मालिकांमध्ये सुबोध रोमँटिक नसून तो खऱ्या आयुष्यात सुद्धा तितकाच रोमँटिक आहे. त्याची प्रेमकहाणी वाचल्यानंतर तुम्ही सुद्धा हे मान्य कराल. सुबोध आणि मंजिरी ह्यांची पहिली भेट नाट्यसंस्कार कला अकॅडमी मध्ये झाली. सुबोधला बालपणापासूनच अभिनय करण्याची आवड होती. परंतु सुबोधला चांगला अभिनय येत नसल्यामुळे त्याला नाटकांमध्ये घेतले नव्हते. त्यामुळे तो बॅकस्टेज मध्ये काम करत होता. त्याचप्रमाणे मंजिरीला सुद्धा थोडंफार अभिनयाची आवड होती. त्यावेळी मंजिरी नाटकात काम करायची. जेव्हा मंजिरीला त्याने नाटकांत काम करताना पाहिले, तेव्हा तिला पाहताक्षणीच तो तिच्या प्रेमात पडला. सुबोध म्हणजे खूप बोलका त्याचा स्वभाव मनमिळावू होता, त्याच बरोबर तो सर्वांनाच समजून घ्यायचा. त्यामुळेच तो त्या अकॅडमीमध्ये सर्वांमध्ये जास्त नजरेत दिसत होता. त्याचे सर्वांमध्ये मिसळणे आणि बोलण्याची पद्धत पाहून पाहताच क्षणी तो मंजिराला आवडला होता. त्यावेळी मंजिरी शाळेत आठवीत शिकत होती. तर सुबोध दहावीत होता.

ह्या भेटीतूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. अगदी शाळेच्या वयापासूनच. तो तिला पाहण्यासाठी चौकात मित्रांसोबत जास्त वेळ उभा राहत असे. दोघांचीही शाळा वेगवेगळी असल्यामुळे त्यांची भेट खूपच कमी वेळेस होत असे. मंजिरीची शाळा सुटायच्या वेळी तो मित्रांसोबत एका नाक्यावर जाऊन रोज उभा राहायचा. त्यावेळी दोघांची नजरानजर होऊन फक्त एक स्मितहास्य होत असे. दोघांमध्ये नजरानजर होऊ लागली, हळूहळू ते एकमेकांशी बोलू लागल. सुबोध मंजिरीचा पाठलाग करू लागला. हळूहळू दोघांमध्ये मैत्री होत गेली. सुबोधचे हे वागणे पाहून मंजिरीच्या मैत्रिणीने तिला सावध केले. तिच्या मैत्रिणीने मंजिरीला सुबोध टपोरी आणि अस्सल मवाली दिसतोय, त्यामुळेच तू त्याच्यापासून दूर राहा, असे खडसावून सांगितले. परंतु मंजिरीच्या मनात सुबोधबद्दल एक वेगळ्याच प्रकारचा विश्वास होता. सुबोध हा अभ्यासात फारसा चांगला नव्हता, परंतु मंजिरी मात्र अभ्यासात खूप हुशार होती. त्यामुळेच तिला वाटले कि माझ्या मैत्रिणीला सुबोध अभ्यासात हुशार नसल्यामुळे कदाचित तो वाया गेलेला आहे असे वाटत असावे. पण असे काहीच नव्हते. हे सुबोधने नंतर सिद्ध करून दाखवले.

असं म्हणतात ना एखाद्या कलाकाराचे प्रेम आणि ते व्यक्त करण्याची पद्धत काही वेगळीच असते. अगदी तसंच सुबोधने केले. शाळेत असताना ऑटोग्राफ बुक मिळत असे. सुबोधने मंजिरीला आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी त्या ऑटोग्राफ बुकवर एक छानसं पत्र लिहिले. त्या पत्राच्या शेवटी स्वतःची स्वाक्षरी सुद्धा केली. त्याने त्या पत्रात लिहिलं होतं, ‘शुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट, इफ आय लव्ह यु, व्हॉट इज माय फॉल्ट’. सुबोधने हे पत्र तिच्या हातात दिले आणि विचारले तुझे उत्तर काय आहे. परंतु मंजिरी एक मुलगी होती. आणि मुली इतक्या लवकर होकार देत नाहीत. त्यामुळेच तिने थोडेसं भाव खायचे ठरवले. तिने मला थोडासा वेळ हवा आहे, असे सांगितले. आणि एखाद्या चित्रपटाला शोभेल अश्या स्टाईल मध्ये तिने सांगितले कि, जर का मी ह्या ठराविक दिवशी, ठराविक वेळी बालगंधर्वाच्या पुलावर आले, तर तू समजून जा कि माझे सुद्धा तुझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे सुबोधच्या मनात संभ्रम निर्माण झाला. त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली. मंजिरी बालगंधर्वाच्या पुलावर येईल का, कि येणारच नाही असा प्रश्न सतत त्याच्या मनात येऊ लागला. शेवटी तो क्षण आलाच, मंजिरीने सांगितलेल्या दिवशी आणि त्याच ठरलेल्या वेळी मंजिरी स्वतःहून त्या पुलाजवळ आली. शेवटी सुबोधच्या प्रेमाने तिला तिथे आणले होते. ती पुलाजवळ येऊन उभी राहिली. सुबोधने मंजिरी पुलाजवळ आलेली पाहताच तो तिच्या जवळ गेला. तिथूनच त्यांचे प्रेम सुरु झाले. ज्यावेळी त्यांचे प्रेम झाले त्यावेळी ते वयाने खूपच लहान होते. घरच्यांना प्रकरण माहिती पडू शकते, त्यामुळे सर्वासमोर त्यांचे भेटणं होणं खूपच कठीण होते.

त्यामुळे सुरुवातीला ते वेगवेगळ्या नाटकांच्या ग्रुप मध्ये, किंवा मग एखाद्या मित्रमैत्रिणीच्या वाढदिवसामध्ये भेटायचे. ते एकांतात भेटले ते म्हणजे मंजिरीची दहावी झाल्यानंतर. पुण्यामधील लोकप्रिय शैलेश रसवंतीगृहामध्ये त्यांनी उसाचा रस प्यायला. हि त्यांची दोघांची एकांतातील पहिली भेट होती. मंजिरीची दहावी झाली. बघता बघता मंजिरीची बारावी सुद्धा झाली. अचानक तिच्या कुटुंबाने कॅनडा मध्ये शिफ्ट व्हायचा निर्णय घेतला. परंतु त्याअगोदरच मंजिरी आणि सुबोध दोघांनीही आपापल्या घरी त्यांच्या प्रेमाबद्दल सांगितले होते. दोघांनीही तुमचे शिक्षण पूर्ण करा, त्यानंतर तुमचे करिअर बघा आणि त्यानंतरच प्रेमात पडा, तुम्ही प्रेम करण्यासाठी खूपच लहान आहात, अशी घरच्यांची भूमिका होती. त्यानंतर मंजिरी कॅनडाला निघून गेली. मंजिरीच्या जाण्याने सुबोध खूप चिडला होता, परंतु त्याच्या हातात काहीच नव्हते. परंतु मंजिरी कॅनडात राहत असताना सुद्धा तिचे सुबोधवरील प्रेम मात्र काही कमी झाले नाही. ती कॅनडातून सुबोधला पत्र लिहू लागली. सुबोधसुद्धा पत्राद्वारे तिच्याशी संपर्कात होता. सुबोधने लिहिलेले पत्र कॅनडामध्ये पोहोचल्यावर त्या पत्राचे उत्तर येण्यासाठी तब्बल २१ दिवसांचा कालावधी लागत असे. अनेकवेळा तर सुबोधने लिहिलेले पत्र पावसाच्या पाण्यामुळे त्यावरील पत्ता पुसला गेल्यामुळे, ती पत्रे पुन्हा त्याच्याकडेच परत आली होती. परंतु त्यांनी एकमेकांना पत्रे लिहिणे थांबवले नाही. त्यामुळे त्यांचे हे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप असलेले हे प्रेम अश्याप्रकारे चालू राहिले.

घरच्यांना असे वाटले होते कि एकमेकांपासून लांब गेल्यामुळे दोघेही एकमेकांना काही वर्षातच विसरून जातील. परंतु प्रत्यक्षात असं घडलं नाही, ते एकमेकांपासून खूप लांब असले तरी मनाने आणि हृदयाने एकमेकांच्या खूप जवळ होते. त्यामुळेच दोघांचे प्रेम चांगलं टिकलं होतं. आणि लांब असल्यामुळे एकमेकांना पाहण्याची ओढ असल्यामुळे त्यांचे प्रेम सुद्धा खूप वाढले होते. अश्याप्रकारे त्यांनी पाच वर्षे एकमेकांना न पाहताच काढल्या. सुबोधला मंजिरीला पाहण्याची इतकी ओढ लागली होती कि, तो भारताची कॅनडा मध्ये कोणतीही क्रिकेटची मॅच असली कि, तो रात्रभर जागून स्टेडियममध्ये मंजिरी दिसेल ह्या आशेने ती मॅच पाहत असे. आकाशातून कोणते विमान उडताना पाहिले कि मंजिरीच भारतात आली कि काय, असे त्याला वाटत असे. पाच वर्षात मंजिरीने कॅनडामधून इंजिनिअरिंग पूर्ण केले. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर ती पुन्हा एकदा भारतात परतली. ती पुन्हा आली ती फक्त आणि फक्त सुबोध साठीच. भारतात आल्यावर तिने सुबोधची भेट घेतली. दोघांनीही एकाच कंपनीत नोकरी करण्याचे ठरवले. त्यानुसार दोघांनीही पुण्यात एकत्र नोकरी केली. सुबोध सुद्धा करिअरच्या एका चांगल्या मार्गावर होता. तो मार्केटिंग क्षेत्रात काम करत होता. नोकरी करत असताना तो नाटकातही काम करत होता.

सुबोधने पुन्हा एकदा आपल्या घरी आपल्या प्रेमाविषयी सांगितले. त्यामुळे आता लग्नाचा निर्णय घेण्याची वेळसुद्धा आली होती. इथे मंजिरीने सुद्धा घरी स्वतःच्या प्रेमाविषयी सांगितले. त्यांना जितका अपेक्षित होता तितका विरोध घरच्यांकडून झाला नाही. दोघेही सुशिक्षित आणि चांगल्या घरातील असल्यामुळे दोघांच्याही घरच्यांनी हे प्रेम मान्य केले. त्यांच्या प्रेमाला लग्नाच्या नात्याचं नाव देण्याचा तो क्षण शेवटी आलाच. १२ जुलै २००१ रोजी सुबोध आणि मंजिरी विवाहबंधनात अडकले. दोघांच्याही नात्याला नवीन नाव मिळाले होते. दोघांच्या संसाराला सुरुवात झाली होती. त्यानंतर सुबोधने अनेक यशस्वी चित्रपट आणि मालिका दिल्या. त्याने ‘बालगंधर्व’, ‘लोकमान्य’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘आणि डॉ काशिनाथ घाणेकर’ ह्यासारखे असंख्य सुपरहिट चित्रपट त्याने मराठी प्रेक्षकांना दिले. सोबतच त्याची ‘तुला पाहते रे’ हि मालिका सुद्धा खूप लोकप्रिय झाली. सुबोधने आपल्या यशाचे श्रेय आपली पत्नी म्हणजेच मंजिरी हिला दिले. तो नेहमी सांगतो कि, मंजिरी पाठीशी असल्यामुळेच मी इथपर्यंत प्रवास करू शकलो. आता दोघांच्या लग्नाला १८ वर्षे पूर्ण झालेली असूनही त्यांचे प्रेम अजूनही तसेच आहे. सुबोध आणि मंजिरी ह्यांना दोन मुले, मल्हार आणि कान्हा असून त्यांचा सुखाचा संसार चालू आहे. आपल्या मराठी गप्पा कडून सुबोध आणि मंजिरी ह्यांना भावी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *