मराठी गप्पाच्या टीमने सदैव, सुप्रसिद्ध मालिका, सिनेमे यातील कलाकारांच्या कारकीर्दीविषयी लेख लिहिले आहेत. यापैकी एका सिनेमातल्या कलाकारांविषयी वाचकांना जास्त उत्सुकता दिसून आली. त्यांच्या वरील लेखांना अमाप प्रतिसाद मिळाला आहे. हा सिनेमा म्हणजे ‘सैराट’. मराठी सिनेसृष्टीला पडलेलं एक स्वप्न. आज काही वर्षानंतरही सैराटची जादू प्रेक्षकमनावर कायम आहे हे नक्कीच दिसून येतं. मराठी गप्पाच्या टीमने आजपर्यंत या सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, कलाकार आकाश ठोसर, रिंकू राजगुरू, अरबाज शेख, तान्हाजी गळगुंडे, अनुजा मुळे यांच्याविषयी लेख लिहिले होते. त्यांना खूप उत्तम प्रतिसाद मिळाला. या सगळ्यांच्या त्यात सकारात्मक भूमिका होत्या.
पण या सिनेमात अजून एक व्यक्तिरेखेचा अंतर्भाव होता, जी होती खलनायकाची. खलनायक किंवा खल नायिकेशिवाय कोणत्याही गोष्टीतील नायक नायिकेला महत्व येत नाही. सैराट मधली ही खलव्यक्तिरेखा म्हणजे प्रिन्स दादा. बरं, प्रिन्स ही भूमिका नकारात्मक असली तरीही ती साकारणारा अभिनेता गुणी आहे. त्याने सैराट व्यक्तिरिक्त ही अभिनय केलेला आहे. त्याच्या कारकीर्दीची ही ओळख वाचकांना व्हावी म्हणूनच हा लेखप्रपंच. ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या गुणी अभिनेत्याचं नाव आहे सुरज पवार. सैराट हा त्याचा दुसरा सिनेमा. सैराट मध्ये नकारात्मक भूमिका साकारणारा सुरज फँड्री या सिनेमातही होता. फँड्री मधील जब्याच्या जिगरी दोस्ताची भूमिका त्याने निभावली होती. सहायक कलाकार आणि खलनायक अशा दोन भूमिका त्याने व्यावसायिक सिनेमातून साकार केल्या आहेत. पण अजून एका कलाकृतीसाठी त्याला थेट राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. फँड्री आणि सैराट यांत असलेला एका समान दुवा या कालाकृतीतही आहेच. हा समान दुवा म्हणजे नागराज मंजुळे आणि ही कलाकृती म्हणजे ‘पिस्तुल्या’.
नागराज मंजुळे यांचा हा पहिला लघुपट. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून त्यांनी या लघुपटासाठी काम केलं. यातील अभ्यास करण्यासाठी धडपडणाऱ्या पिस्तुल्याची मध्यवर्ती भूमिका सुरज याने साकार केली होती. या लघुपटातील भूमिकेसाठी त्याला बाल कलाकार म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी राष्ट्रपतीपदी असणाऱ्या प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सुरज याला हा पूरस्कार प्रदान करण्यात आला होता. सुरज हा लहानपणापासून नागराज मंजुळे यांच्यासोबत राहिला आहे. त्यामुळे नागराज यांच्यासोबत त्यांचा सिनेप्रवास त्याने अगदी जवळून पाहिला आहे. किंबहुना तो स्वतः या प्रवासाचा भाग राहिला आहे. पण यातही त्याला मेहनत चुकलेली नाही. कारण व्यक्तिरेखेसाठी कलाकार निवडताना, नागराज आणि त्यांची टीम हे नेहमी सतर्क असतात. त्यामुळे केवळ एखादी व्यक्ती ओळखीची आहे म्हणून नागराज यांच्या कलाकृतीत अभिनय करण्यास संधी मिळत नाही.
तसंच काहीसं सूरज याच्या बाबतीतही झालं. त्याला फँड्रीमध्ये काम करण्याची इच्छा होती. पण त्या व्यक्तिरेखेएवढं त्याचं वजन नव्हतं, तो बारीक दिसे. तसेच संवादांसाठी मेहनत घ्यावी लागणार होती. सुरजने दोन्ही गोष्टींवर अगदी मन लावून मेहनत घेतली असं त्याने एका प्रथितयश वृत्तसमूहाशी बोलताना एकदा नमूद केलेलं होतं. पुढे सैराट निमित त्याने पुन्हा एकदा सिनेमात काम केलं. यातील नकारात्मक भूमिकेमुळे काही प्रेक्षकांच्या रोषाला त्याला सामोरं जावं लागलं होतं. पण त्याने मात्र समंजसपणे त्यावर वागणं पसंत केलं होतं असं कळतं. पिस्तुल्या होत असताना, त्यातल्या अभिनय गुणांची चमक दिसली होतीच. पण प्रत्येक सिनेमागणिक त्यातला अभिनेता प्रगल्भ होत गेलेला आपल्यास पहावयास मिळतो. तसेच व्यक्ती म्हणूनही त्याचं समंजस वागणं, त्याच्या अत्यल्प उपलब्ध मुलाखतींतून दिसून येतंच. एका युट्युब चॅनेलला मुलाखत देत असताना त्यांच्या साध्या राहणीमानाबद्दल त्याला विचारलं असतां, त्याला तसंच राहायला आवडतं असं नमूद केलं होतं.
सुरजचा बालकलाकार ते सिनेमात काम करणारा कलाकार हा प्रवास अगदी तीन कालाकृतींतून झाला आहे. पण त्यातील प्रगती लक्षणीय आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. येत्या काळातही तो अशीच प्रगती करत रहावा आणि पूढील आयुष्यातही उत्तम यश संपादन करत राहावा या मराठी गप्पाच्या टीमकडून त्याला शुभेच्छा ! आपण हा लेख वाचलात त्याबद्दल धन्यवाद. सैराट मधील इतर कालाकारांविषयी मराठी गप्पावर उपलब्ध लेख वाचायचे असल्यास वर असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. सर्च ऑप्शनमध्ये जाऊन सैराट असं लिहिल्यास तुम्हाला उपलब्ध लेख मिळतील. मराठी गप्पाचे नियमित वाचक असल्याबद्दल धन्यवाद !
(Author : Vighnesh Khale)