सैराट हा सिनेमा आला, त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं, सर्वाधिक पैसे कमावणारा सिनेमा झाला आणि कायमस्वरूपी लक्षात राहिला. २०१६ साली तो प्रदर्शित झाला तरीही त्याच्या आठवणी, प्रेक्षकांच्या मनात आजही ताज्या आहेत. आत्ता पर्यंत आपण सैराट विषयी मराठी गप्पावर वाचलं आहेच. नुकतेच प्रदर्शित झालेले तानाजी गळगुंडे आणि अरबाज शेख यांच्यावरचे लेखही वाचले असतीलच. या दोघांनी भूमिका केली होती ती अनुक्रमे प्रदीप आणि सल्याची. म्हणजेच, परश्याच्या मित्रांची. जसे ते पराश्याचे मित्र होते तशीच आर्चीची एक जिवलग मैत्रीण ‘अनि’ सुद्धा त्या सिनेमात दाखवली होती. आज या अनि विषयी थोडंसं.
तर, या अनिचं खऱ्या आयुष्यातील नाव आहे अनुजा मुळे. ती राहणारी पुण्याची. तिचं शिक्षण पुण्यात झालय. जेव्हा सैराट प्रदर्शित झाला तेव्हा ती पुण्यातील एका कॉलेजमध्ये कायद्याचं शिक्षण घेत होती. तिला अभिनयाची आवड होतीच. पुणं आणि कलाक्षेत्राचं काही गहिरं नातं आहे बघा. मराठीतले अनेक कलाकार हे पुण्यातून आलेले असतात. हा ट्रेंड अगदी नव्याने दाखल झालेल्या अभिनेते आणि अभिनेत्रींच्या फळीतही दिसतोच. अनेक गाजलेल्या सिनेमांमधील नवकलाकार हे पुण्याचे असतात. यातील एक महत्वाचं कारण म्हणजे पुण्यात जपली गेलेली नाट्य स्पर्धांची परंपरा. प्रायोगिक, व्यावसायिक, आंतरमहाविद्यालयीन अशा अनेक नाटकांची रेलेचेल असते पुण्यात. एकांकिका स्पर्धा भरवल्या जातात. त्यातील पुरुषोत्तम करंडक हि मानाची स्पर्धा. सन १९६३ पासून ती चालू आहे.
या मानाच्या स्पर्धेत, अनुजा भाग घेत असे. तिला आणि तिच्या कलाकारांच्या ग्रुपला यासाठी पारितोषिकेही मिळाली आहेत. पण, नाट्य स्पर्धांमधून भाग घेतला तरीही तिने अभ्यास सांभाळून आपली आवड जोपासली. या पुण्यातील एकांकिका स्पर्धांसोबतच, तिने एका प्रथितयश वृत्तपत्राने आयोजित केलेल्या नाट्य स्पर्धेत तिने भाग घेतला होता. असं म्हणतात कि तिथून तिला नागराज मंजुळे यांनी सैराट साठी निवडलं. आधीच्या लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे नागराज हे कलाकार निवडीबाबत अजिबात हयगय करत नाहीत. त्यांच्या मनाला एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तिरेखेसाठी योग्य आहे, असं पटेपर्यंत निवड होत नसते. पण अनुजाच्या अभिनयाच्या अनुभवाचा फायदा येथे झाला असावा. तिनेही झालेली निवड अगदी योग्य कशी आहे हे दाखवून दिलं होतंच. शहरात बालपण गेल्याने गावाकडची भूमिका थोडी कठीण जाऊ शकली असती. पण तिने तसं कधी जाणवू दिलं नाही, हे तिच्या अभिनयाचं कसब म्हणायला पाहिजे.
अनुजा जशी अभिनय आवडीने करते तसचं तिचं स्वतःच्या अभ्यासाकडेही लक्ष आहेच. त्यामुळे, अभिनय करता करता अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून तिने सैराट नंतर नवीन सिनेमे घेणं टाळलं. खरं तर एखाद्या हिट सिनेमाचा भाग असल्यावर आणि त्यातही अभिनयाची आवड असल्यावर सरसकट सिनेमे ती करू शकली असती. परंतु, तिने योग्य वेळी योग्य गोष्टी करण्याला प्राधान्य दिल्याचं दिसतं. तिच्यासारखंच सैराटचे इतर कलाकारही आपापला वेळ आपलं शिक्षण पूर्ण करण्यात घालवताना दिसतात. पण तरीही मध्यंतरीच्या काळात, काही कलाकृतींमधून ते आपल्याला भेटत राहिले होते. पण अनुजा मात्र काही काळापूर्वीच पुन्हा एकदा माध्यमांसमोर आली.
कारण होतं ते, तिच्या सार्वजनिक ठिकाणी दिलेल्या भेटीचं. तिला एका ग्रामसंवादाला प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आलं होतं. तिथे उपस्थित सगळ्यांना तिने शिक्षणाचं महत्व पटवून दिलं. तसचं गावाच्या विकासासाठी सैराट व्हा असा संदेशही दिला. तसेच तिच्या झालेल्या स्वागताचही खूप कौतुक केलं. या व्यतिरिक्त तिने एका महाविद्यालयातही तिला प्रमुख पाहुणी म्हणून बोलावलं होतं. तिथेही शिक्षणाचं महत्व तिने अधोरेखित केलंच. त्याचसोबत तिने तरुणाईच्या उत्साहाचा वापर चांगल्या कामासाठी तरुणांनी केल्यास त्यांचा स्वतःचा आणि गावचा विकास होईल म्हणजेच पर्यायाने देशाचाही विकास होईल असा संदेश दिला. अभिनयाची आवड जोपासता जोपासता अभ्यासही सांभाळणारी अनुजा नवअभिनेते आणि नवअभिनेत्री यांच्यासाठी कसं वागावं याचं एक उत्तम उदाहरण आहे. येत्या काळासाठी या गुणी अभिनेत्रीला मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)