गेल्या काही दिवसांपासून आपण मराठी गप्पावर सैराटच्या रिंकू राजगुरू, तानाजी गळगुंडे, अरबाज शेख, आर्चीची मैत्रीण अनुजा मुळे यांचाविषयी वाचलं आहेच. त्यांच्यावरील लेखांना मिळालेल्या प्रतिसादाबद्दल मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप धन्यवाद. आज आपण या अतिशय लोकप्रिय ठरलेल्या आणि अगदी अटकेपार मराठी सिनेमाचा झेंडा रोवणाऱ्या सिनेमातील नायकाविषयी जाणून घेणार आहोत. होय, आज आपण आकाश ठोसर याच्या कलाप्रवासातील वाटचालीबद्दल जाणून घेणार आहोत.
आकाश हा मुळचा सोलापूरचा. त्याचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झालं पुण्यात. पुणे युनिवर्सिटी मधून त्याने पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याला लहानपणापासून इतरांप्रमाणे सिनेमे पाहायला आवडतं. परंतु आपण कधी सिनेमात दिसू, कॅमेऱ्यासमोर काम करू, असं त्याला वाटलंही नव्हतं. अमिताभ बच्चन हे त्याचे आवडते कलाकार. त्यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखा त्याला आवडत असत. तो सैराटच्या अगोदर कुस्ती खेळत असे. कुस्ती खेळण्याच्या आवडीपायी कुस्तीसाठी चांगले आखाडे असलेल्या गावात मुक्काम केला होता. नागराज मंजुळेहे सुद्धा या गावचे रहिवासी. तो त्यांना गावातही पहात असे, पण बोलण्यास कचरत असे. त्याला नागराज मंजुळे यांच्या फँड्री सिनेमा खूप आवडला होता. एके दिवशी तो एके ठिकाणी बसला असताना त्याला नागराज यांच्या छोट्या भावाने पाहिलं. त्यावेळेस सैराटसाठी मुलांची निवड करणं चालू होतं. त्यांनी आकाशला अभिनय करण्यासंदर्भात आणि ऑडिशन देण्यासंदर्भात विचारलं.
आकाशला थोडी कल्पना होती कि सैराटचं शुटींग काही काळाने सुरु होणार आहे. त्याने चटकन ती ऑडिशन दिली. पुढच्या अवघ्या दोन दिवसांत त्याची निवड झाल्याचं त्याला कळलं. पुढे लुक टेस्ट होऊन त्याच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झालं आणि प्रेक्षकांना त्यांचा लाडका परश्या मिळाला. परश्या हा तसा सामान्य मुलगा. आकाश त्याआधी कुस्ती खेळत असे. त्यामुळे या भूमिकेसाठी अवघ्या काही दिवसांत वजन कमी करायचं होतं. आकाशनेही अगदी मनावर घेतलं आणि वजन कमी केलं. तसेच अभिनय करताना नागराज मंजुळे यांनी सांगितल्याप्रमाणे त्याने सर्व काम केलं. पुढे घडला तो इतिहास आहे. दिग्दर्शकाच्या मतानुसार वागायचं हे तेव्हापासूनचं त्याचं तत्व असावं, असं वाटतं. कारण अगदी ‘एफ. यु.’ म्हणजे फ्रेन्डशिप अनलिमिटेड या सिनेमातही त्याने महेश मांजरेकर सांगतील त्यानुसार काम केलं होतं, असं तो एका मुलाखतीत म्हणाला होता.
फ्रेन्डशिप अनलिमिटेड या सिनेमात त्याने शहरी मुलाची भूमिका बजावली होती. सैराटच्या व्यक्तिरेखेच्या अगदी उलट. पण जे काम करायचं त्यात शंभर टक्के योगदान द्यायचं, असा स्वभाव असलेल्या आकाशने यातही उत्तम योगदान दिलं. सिनेमासोबतच त्याने ‘ल स्ट स्टोरीज’ या अनुराग कश्यप यांच्या वेबसिरीज मध्ये काम केलं होतं. आपल्याच प्रोफेसरच्या प्रेमात पडणारा विद्यार्थी अशी ती भूमिका होती. राधिका आपटेसारख्या गाजलेल्या अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी त्याला मिळाली. नावाजलेला दिग्दर्शक, नावाजलेली अभिनेत्री असताना आकाशनेही स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली. या तीन मोठ्या प्रोजेक्ट्स नंतर मात्र तो काहीवेळ थांबला. मधल्या काळात रणवीर सिंग सोबत त्याची एक जाहिरात प्रसिद्ध झाली. पण बाकी मोठ्ठ असं काही काम नव्हतं असं वाटत असताना ‘झुंड’ या सिनेमाचा टीजर ट्रेलर आला तो जानेवारी २०२० मध्ये. नागराज मंजुळे यांचा हा सिनेमा. यात खुद्द अमिताभ बच्चन यांनी काम केलं आहे.
त्यामुळे झुंड चित्रपटात आकाशला त्याच्या सगळ्यात आवडत्या कलाकारासोबत काम करायला मिळालय. यानिमित्ताने त्याने स्वतःचा सगळा अनुभव पणाला लाऊन अभिनय केला असणार. या सिनेमाची अजून एक जमेची बाजू म्हणजे रिंकू राजगुरू हि सुद्धा या सिनेमात पुन्हा एकदा दिसेल. म्हणजेच आर्ची – परश्याच्या चाहत्यांसाठी पुन्हा एकदा पर्वणी. या सिनेमासोबतच आकाशचे नवीन काही प्रोजेक्ट्स येत्या काळात प्रदर्शित होतील, असं त्याच्या सोशल मिडिया पोस्ट्सवरून वाटतं. हे तर झालं त्याच्या अभिनयाबाबत. पण अभिनयासोबतच तो स्वतःच्या लुक्सवरही प्रचंड मेहनत घेताना दिसतो. तसेच अभिनायातल्या बारकाव्यांसाठी त्याने स्वतःचं वाचन आणि सिनेमे बघणं हि वाढवलं आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्याने लॉकडाऊनच्या काळात ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हि कादंबरी वाचली असं त्याने नमूद केलं होतं.
ह्यासर्व गोष्टींसोबतच आकाश व्यायामावरही खूप मेहनत घेत आहे. त्याने नियमित व्यायाम करून आपले शरीर पिळदार बनवलं आहे. वाचन, व्यायाम या व्यतिरिक्त जर मोकळा वेळ मिळाला तर अगदी शेतातही तो काम करताना दिसला होता. एकूणच, त्याच्या प्रवासाचा सारांश काढायचा झाल्यास असं म्हणू शकतो कि, त्याचा अभिनयाचा प्रवास हा काहीही कल्पना न देता सुरु झाला. पण याच क्षेत्रात करियर करायचं असं ठरल्यावर मात्र आकाशने अगदी झोकून देऊन प्रत्येक काम केलं आहे. त्याने स्वतःच्या भूमिकेनुसार भाषेवर, लुक्सवर मेहनत घेतली आहे. तसेच कोणत्याही यशस्वी अभिनेत्यासाठी आवश्यक वाचनही तो करतो आहे. तसेच निवडक पण उत्तम प्रोजेक्ट्स तो निवडतो आहे. त्यामुळे येत्या काळात त्याच्या विविध आणि लोकप्रिय ठरतील अशा भूमिका आपल्याला विविध माध्यमांतून भेटीस येतील हे नक्की. त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)