जीवाला जीव देणारी मित्रमंडळी असली कि आयुष्यात कितीही मोठं वादळ येऊ देत, लढण्याची ताकद आपोआप निर्माण होते. असेच सच्च्या मैत्रीला वाहिलेल्या अनेक व्यक्तिरेखा आपण सिनेमा, नाटक, मालिकांमधून पाहिल्या आहेतच. त्यात अगदी नजीकच्या काळातलं उदाहरण म्हणजे सैराट आणि त्यातले पराश्याचे मित्र. परश्याची प्रेमकहाणी सफल व्हावी म्हणून झटणारे. त्यातल्या सल्याचं आणि प्रदीपचं तर कौतुक चहूबाजूंनी झालं. यातील, सल्याची भूमिका बजावली ती अरबाज शेख आणि प्रदीपची भूमिका बजावली ती तानाजी गळगुंडे यांनी. याधी आपण तानाजीच्या जीवनाबद्दल मराठी गप्पा वर वाचलं आहेच. आज जाणून घेऊयात, सल्या म्हणजेच अरबाज शेखविषयी.
सल्या म्हणजे अरबाज शेख हा राहणारा जेऊर सोलापूर येथील आहे. सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा तो शेजारी. नागराज यांना तो अण्णा म्हणतो. शेजारी असला तरीही त्याची सैराटसाठी निवड काही सहजासहजी झाली नाही. किंबहुना ती कशी झाली हा एक किस्साच आहे, जो त्यानेच काही वर्षांपूर्वी तो एका मुलाखतीत सांगितला होता. नागराज सिनेमा क्षेत्राशी निगडीत आहेत याची त्याला कल्पना होती. नागराज यांच्या एखाद्या सिनेमात आपणही काम करावं असं त्याच्या मनाने घेतलं होतं. तसं त्याने नागराज यांच्या घरी बोलून पण दाखवलं. पण कलाकार निवडीबाबत, नागराज एकदम काटेकोर असतात. भूमिकेसाठी योग्य वाटेपर्यंत ते कलाकाराला एखाद्या पात्रासाठी निवडत नाहीत. याचा अनुभव अरबाजलाही आला. त्याची काम करण्याची तयारी पाहून, त्याला इतर कलाकारांप्रमाणेच ऑडीशन देण्यासाठी सांगण्यात आलं. पण त्या ऑडीशनमध्ये नागराज यांनी त्याला नाकारलं. त्याला फार वाईट वाटलं. पण निश्चय तर पक्का होता कि सिनेमात काम करायचंच.
त्याने आपण कुठे चुकलो याचं परीक्षण केलं. पुन्हा तयारी केली आणि पुन्हा एकदा ऑडीशन दिली. यावेळेस मात्र त्याची निवड झाली. त्याने चुका सुधारल्याचा फायदा झाला. मग काही काळाने तो इतर कलाकारांना जाऊन पुण्याला भेटला आणि शुटींग चालू होण्याच्या साधारण एक महिना अगोदर हि मंडळी एकत्र वावरली. तिथे निवड झालेल्या या मुलांना एकत्र करून प्रशिक्षण दिलं गेलं कारण त्यांचा अभिनयाशी कधी संबंध आला नव्हता. वाक्य कशी बोलायची, देहबोली कशी असावी याच्याशी ओळख करून दिली गेली. याच कालखंडात अभिनयाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या मुलांची मैत्री खऱ्या आयुष्यातही जमली ती आजतागायत. ती मैत्री अजूनही घट्ट असल्याचं दिसूनही येतं, कारण अनेक वेळेस हि मंडळी एकमेकांना भेटतात, वाढदिवस साजरे करतात, तेव्हाचे ग्रुप फोटोज त्यांच्या त्यांच्या सोशल मिडिया अकाउंट वर पोस्ट करत असतात.
अरबाजला अभिनयाव्यतिरिक्त निसर्गाच्या सानिध्यात रमायला आवडतं. त्याच्या अनेक सोशल मिडिया पोस्ट्स मध्ये तो घराबाहेर निसर्गाच्या सानिध्यात फिरताना दिसे. सध्या लॉकडाऊनमुळे ते बंद झालं आहे. पण याचबरोबर तो एक पक्का खवय्या आहे. आणि नुसतं खायलाच नाही तर खिलवायलाही आवडतं. पण हि तर झाली अरबाजची वैयक्तिक आयुष्यातली ओळख. आपण त्याला त्याच्या अभिनयासाठी ओळखतो. पण काही महिन्यांपूर्वी त्याच्या व्यक्तिमत्वाचा वेगळा पैलू सगळ्यांसमोर आला. लॉकडाऊनमुळे जे झालंय, ते आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. या महामारीच्या संकटात सगळ्यात जास्त नुकसान जर कोणाचं झालं असेल तर ते झालंय, गरीबांचं. हाताला काम नाही किंवा कमी काम आणि बाहेर पडता येत नाही अशी परिस्थिती.
या परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्यांसाठी काही करावं म्हणून सोलापुरातील अजित अतकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत #WeWillHelp अशी मोहीम राबवली. ज्यांतर्गत सोशल मिडीयाचा वापर करून गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी मदत करू इच्छीणाऱ्या लोकांना जोडलं गेलं. त्यानिमित्ताने जे धान्य, खायच्या वस्तू आणि इतर सामान यांची मदत गरिबांना केली गेली. अरबाजनेही यात पुढाकार घेत जागो जागी जाऊन गरजवंतांना धान्य वाटप केले आहे. यासाठी प्रथितयश वृत्तसंस्थांनी त्याचं कौतुकही केलं आहे. साधेपणा जपत, मिळालेलं स्टारडम डोक्यात जाऊ न देता हा नव्या दमाच्या कलाकार सामाजिक कार्यात पुढाकार घेतो आहे. त्याच्या स्वभावातील या पैलूने त्याच्या अभिनयासारखीच सामान्य प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत हे नक्की. अशा या गुणी कलाकाराला, त्याच्या पुढील वाटचालीसाठी टीम मराठी गप्पाकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)