मित्रांनो, महाराष्ट्रातील दोन महान व्यक्ती, एक म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचा बादशाह दादा कोंडके. असं म्हणतात कि दोन महान व्यक्ती शक्यतो एकत्र राहत नाही, परंतु ह्या दोन दिग्गजांची मैत्री मात्र ह्या गोष्टीला अपवाद ठरली. दोघेही आपल्यापल्या क्षेत्रात अव्वल. एकाने आपल्या भाषणाने कित्येक सभा गाजवल्या तर दुसर्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना हसून हसून लोळवले. दोघांचे खास वैशिष्ट्ये म्हणजे भाषेवर असलेली पकड आणि हजरजबाबीपणा. तर आजच्या लेखात आपण पाहणार आहेत केव्हा दादा बाळासाहेबांना भेटले, कोणत्या घटनेमुळे दादा आणि बाळासाहेब मित्र बनले आणि कसे दोघांनी आपली हि मैत्री शेवटपर्यंत जपली. दादांचे ‘विच्छा माझी पुरी’ करा हे नाटक प्रचंड गाजले. नाटकात काम करता करता त्यांनी ‘तांबडी माती’ ह्या चित्रपटांतून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. चित्रपटांत काम करत असतानाच त्यांनी स्वतः चित्रपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. सत्तरचे दशक होते. त्याकाळी हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त इतर भाषिक चित्रपट खूपच कमी चित्रपटगृहात लागायचे.
थिएटरमालक सुद्धा हिंदी भाषिक चित्रपटांनाच जास्त प्राधान्य द्यायचे. अश्यावेळी दादांनी त्यांचा पहिलाच चित्रपट म्हणजे ‘सोंगाड्या’ बनवला. दादांना ह्या चित्रपटासाठी थिएटर मिळेनासे झाले. चित्रपटनिर्मितीचा पहिलाच अनुभव असल्यामुळे त्यांना ह्या अगोदर चित्रपट प्रदर्शित करण्याचा कोणताच अनुभव नव्हता. त्यांच्याकडे इतका पैसाही नव्हता कि त्या जोरावर ते चित्रपटमालकांना सांगून चित्रपट प्रदर्शित करू शकतील. त्याचदरम्यान ‘तीन देविया’ हा हिंदी भाषिक चित्रपट प्रदर्शित झाला होता. दादांना त्यावेळी मुंबईतील कोहिनुर चित्रपटगृहाच्या मालकाने ‘सोंगाड्या’ चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला होता. कोहिनुर थिएटरमध्ये ‘तीन देविया’ हा चित्रपट लागला होता. आपला पहिलाच चित्रपट आणि त्याला थिएटर नाही, ह्यामुळे दादा बैचेन झाले. त्यांनी खूप प्रयत्न केले परंतु काही झाले नाही. आता आपला चित्रपट मधोमध फसणार कि काय ह्याची भीती दादांना वाटू लागली. त्याकाळी मुंबईमध्ये शिवसेना जोर धरत होती. ‘मराठी माणूस’ मुद्द्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला शिवसेना आपली वाटू लागली होती. मराठी माणसांसाठी असलेली जवळीकता आणि ओढ ह्यामुळे बाळासाहेब सुद्धा लोकप्रिय होत होते. आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे आलेल्या टेन्शनमुळे दादांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची भेट घेतली.
दादांनी त्यांना घडलेला संपूर्ण किस्सा सांगितला. त्यावर मराठी चित्रपट मुंबईमध्ये प्रदर्शित करण्यासाठी थिएटरमालक कसा काय नकार देऊ शकतो हीच गोष्ट बाळासाहेबांना खटकली. त्यांना दादांना दिलासा दिला कि आता हि गोष्ट आमच्यावर सोडा आम्ही बघतो तो थिएटरमालक कसा मराठी चित्रपट प्रदर्शित होऊ देत नाही ते. बाळासाहेबांनी कोहिनूरच्या थिएटर मालकाला आदेश दिला आणि खडसावून सांगितले कि जर ‘सोंगाड्या’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही तर ह्यापुढे कोहिनुरमध्ये कोणताच चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. बाळासाहेबांच्या ह्या आदेशानंतर ‘सोंगाड्या’ हा चित्रपट जरी डबल मिनिंग असला तरी कोहिनूरच्या थिएटर मालकाने तो प्रदर्शित केला. त्यानंतर महाराष्ट्रभर हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि ‘सोंगाड्या’ तुफान गाजला. तेव्हापासून मग दादांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या लोकप्रियतेचा आणि यशाचा आलेख दिवसेंदिवस वाढतच गेला. मराठी चित्रपटरसिकांना सुद्धा दादांचे चित्रपट खूप आवडले. चित्रपटातील त्यांची वेशभूषा, त्यांची गुढघ्यापर्यंत येणारी अर्धी पॅन्ट, त्यांच्या विनोदी भूमिका आणि त्यांचे डबल मिनिंग डायलॉग खूप लोकप्रिय होत होते. प्रेक्षकांनी सुद्धा दादांना भरभरून प्रेम दिले.
दादांच्या चित्रपटासाठी लोकं इतकी गर्दी करत कि दादांचा पांडू हवालदार हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर इतका सुपरहिट झाला कि त्यावेळी रिलीज झालेला ‘जेम्स बॉण्ड’ चित्रपट महाराष्ट्रात फ्लॉप गेला होता. इतकंच काय राज कपूर ह्यांना दादांचा ‘एकटा जीव सदाशिव’ प्रदर्शित झाल्यामुळे ऋषी कपूरचा बॉबी हा चित्रपट पाच महिने उशिरा प्रदर्शित केला. बाळासाहेबांच्या आदेशाने सोंगाड्या कोहिनुरला झळकला, त्या दिवसापासूनच दादा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नातं खूप घट्ट झाले. इतकं कि जेव्हा बाळासाहेब नाराज असत तेव्हा त्यांच्या खोलीत फक्त एकाच व्यक्तीला प्रवेश असे. आणि ती व्यक्ती म्हणजे दादा कोंडके. त्यावेळी दादा शिवसेनेच्या प्रचारासाठी भाषणे सुद्धा आपल्या खास शैलीने द्यायचे. त्यांचे भाषणे ऐकण्यासाठी खूप गर्दी जमायची. चित्रपटांप्रमाणेच ते ह्या भाषणांत देखील अनेक नेत्यांची खिल्ली उडवत. परंतु दादांनी कधीच बाळासाहेबांच्या विरुद्ध एकदाही एक शब्द देखील उच्चारला नाही. त्यांना एकदा एका राजकीय नेत्यांनी राजकारणावर टीका करा असे सांगितले होते. तेव्हा दादांनी त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले होते कि मी कोणावरही टीका करू शकतो, परंतु शिवसेना आणि बाळासाहेबांवर केव्हाच टीका करणार नाही.
दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात युतीचे सरकार सत्तेत आले. बाळासाहेब पक्षप्रमुख असल्यामुळे अनेक मंत्र्यांनी बाळासाहेबांकडे मंत्रिपद मिळावे ह्यासाठी गर्दी केली. बाळासाहेबांनी आपल्या विश्वासू आणि जवळच्या व्यक्तींना ह्याबाबत विचारले. त्यांनी दादांनाही बोलावले. जवळजवळ अर्धा तास दादांना मंत्रिपदासाठी विचारले गेले. बाळासाहेबांना दादांनी सांस्कृतिक मंत्री व्हावे अशी मनापासून इच्छा होती. त्यांनी दादांना विचारले कि तुम्हांला कोणते मंत्रिपद हवे आहे. दादांनी क्षणाची विलंब न लावता हजारजबाबीपणे बाळासाहेबांना प्रतिप्रश्न केला कि तुम्ही कोणते मंत्रिपद घेणार आहात. बाळासाहेबांनी सांगितले कि मला कोणते मंत्रिपद नाही नकोय. मी शिवसेनाप्रमुखच राहणार. त्यावर दादांनीही सांगितले कि मलाही कोणते मंत्रिपद नको. मी हि शिवसैनिकच राहणार. बाळासाहेबांनी दिलेली हि मंत्रिपदाची ऑफर दादांनी नम्रपणे नाकारली. दादा कट्टर शिवसैनिक होते. ते बाळासाहेबांसोबत अनेकदा प्रचाराला जात. त्यांची भाषणे तुफान गाजत. दादांच्या भाषणात वाक्यावाक्याला दुहेरी अर्थ लपलेला असायचा. शोधणाऱ्याला तो अर्थ चटकन सापडायचा. दादा आपल्या खास शैलीत राजकीय नेत्यांची खिल्ली उडवत. त्यामुळे राजकारणात त्यांचे अनेक शत्रू निर्माण झाले होते.
त्यामुळे दादा ज्यांच्याविरुद्ध प्रचार करत ते दादांच्या विरुद्ध काही षडयंत्र वैगेरे तर रचणार नाहीत ना ह्याची चिंता दादांचे मित्र नेहमी बाळासाहेबांकडे करत. त्यामुळे दादांच्या सुरक्षिततेची जबाबदारी शिवसैनिकांनी घेतली होती. दादा घरातून बाहेर पडल्यापासून ते घरी सुखरूप परतेपर्यंत जुळजवळ ५० शिवसैनिकांचा ताफा दादांच्या दिमतीला असायचा. दादा शेवटपर्यंत बाळासाहेबांचे मित्र आणि कट्टर शिवसैनिक राहिले. बाळासाहेबांनी सुद्धा आपली हि मैत्री शेवटपर्यंत सांभाळली. त्यांनीही शेवटपर्यंत दादांना साथ दिली. इतकंच काय दादा हे जग सोडून गेल्यानंतरही बऱ्याच वर्षांनी जेव्हा शिवतीर्थावर बाळासाहेब भाषण करत होते. त्या भाषणात सुद्धा त्यांनी दादांची आठवण काढली होती. ते बाळासाहेबांचे शेवटचे भाषण होते. आजच्या घडीला दादा आणि बाळासाहेब दोघेही आपल्यात नाही. परंतु जेव्हापण दोघांपैकी एकाची जरी आठवण आली तरी दुसऱ्या मित्राची आठवण निघाल्याशिवाय राहत नाही. तर मित्रांनो कसा वाटलं आजचा हा लेख, तुम्ही नक्की सांगा.