मराठी कलाकार आणि त्यांची कारकीर्द याबाबत आमच्या टीमने विपुल प्रमाणात लेखन केलेले आहे. या लेखांचा उद्देश असा की, मनोरंजन विश्वापलीकडेही कलाकारांनी केलेल्या प्रवासाची ओळख प्रेक्षकांना व्हावी. कारण अनेक वेळेस त्यांच्या कलाकृतींइतकाच त्यांचा प्रवास हा रंजक आणि खूप काही शिकवून जात असतो. यातील एक गोष्ट नेहमी जाणवते की या क्षेत्रात प्रत्येक क्षणी, प्रत्येक कलाकृतीत तुम्हाला कलाकार म्हणून १००% योगदान हे द्यावंच लागतं आणि यात सातत्य हे हवंच. या दोन्ही गोष्टी कसोशीने पाळणारे कलाकार स्वतःची कारकीर्द फुलवतात आणि दीर्घकालीन करतात हे नक्की. आज एक व्हिडिओ आमच्या टीमच्या हाती आला आणि त्यातून ही बाब अगदी प्रकर्षाने समोर आली. हा व्हिडीओ आहे, सोनाली कुलकर्णी हिचा. सोनाली सुपरिचित अभिनेत्री, नृत्यांगना आहे हे वेगळे सांगणे न लगे. तिने नृत्य केलेली अनेक गीतं लोकप्रिय झाली आहेत, सोबतच तिने अन्य गीतांवरही केलेली नृत्य बहारदार झाली आहेत.
या पैकी एका नृत्याची तालीम करतानाचा व्हिडीओ आमच्या टीमला दिसला. या व्हिडिओची शूटिंग ही सलग झालेली आहे. म्हणजेच यात कुठेही टेक घेऊन शूटिंग केलेलं नाहीये. या व्हिडिओत अथ पासून इतिपर्यंत आपल्याला सोनाली कुलकर्णीचा समर्थ नृत्याविष्कार दिसून येतो. सोबत कोरिओग्राफर्स आहेतच. पण ज्या तडफेने आणि ऊर्जेने सोनाली नृत्य सादर करताना दिसते ते केवळ लाजवाबच. या नृत्याची थीम ही लोकनृत्य आणि हिप हॉप यांचं फ्युजन असं आहे. यात पाच लोकगीतं समाविष्ट केलेली आहेत. सुरुवात होते ती ऐरणीच्या देवा या सुमधुर गीता पासून. पुढे मल्हारी देवाची स्तुती करणारी दोन गीतं असतात. मग येतं ते ‘काठीनं घोंगडं घेऊ द्या की’ हे सदाबहार गीत आणि मग हे नृत्य संपन्न करण्यासाठी ‘लल्लाटी भंडार’ हे गाणं सुरू होतं. या सगळ्या गाण्यांचा एकूण कालावधी काही मिनिटांचा आहे. यात नृत्य करणं हे काही वेळेस इतकं दमछाक करणारं असू शकतं की विचारू नका. पण सोनाली एकाच टेक मध्ये हे करताना दिसते. अर्थात या आधी तिने याची कसून तालीम केली असणारच.
पण यात दिसणारी तिची ऊर्जा ही अगदी एखाद्या शेवटच्या आणि स्टेज वर सादर केल्या जाणाऱ्या नृत्यासारखी असते. त्यात तालीम आहे म्हणून कुठेही हलगर्जीपणा दिसून येत नाही. तसेच ही गीतं फोन वर वाजवली जात असतात. मधेच एकदा नोटिफिकेशनची टोन ही वाजते पण या दरम्यान सोनाली आणि तिचे नृत्यदिग्दर्शक यांचं लक्ष जराही विचलित होताना दिसत नाही. काहींना कदाचित ही एखादी छोटी गोष्ट वाटू शकेल, पण कलाकृती सादर करणं असू दे वा त्याची तालीम, लक्ष विचलित झालं तर नंतर किती वेळ जाऊ शकतो हे सुजाण वाचकांना नक्कीच ज्ञात आहे. तसेच हे नृत्य संपतं आणि सोनाली शेवटची स्टेप करते आणि गाणं थांबल्यावर जागीच स्वतःला झोकून देते. या क्षणी नकळत आपणही तिच्याशी एवढे समरस झालेलो असतो की आपणाला तिच्या या मेहनतीचं कौतुक वाटल्याशिवाय राहवत नाही. तिचे नृत्यदिग्दर्शक आणि इतर सहकारीही तिचे टाळ्या वाजवून कौतुक करताना दिसतात.
वर उल्लेख केल्याप्रमाणे प्रत्येक वेळी आणि प्रत्येक कलाकृती सादर करताना १००% देणारे आणि यात सातत्य असणारे कलाकार दीर्घकाळ काम करत राहतात आणि लोकप्रियही ठरतात. सोनाली आज लोकप्रिय कलाकार का आहे याचं उदाहरण या व्हिडिओतून आपल्याला मिळतं. एरव्ही अगदी सहज सोप्पं वाटणारं हे क्षेत्र प्रत्यक्षात अतिशय मेहनत करणाऱ्या आणि त्यासाठी अक्षरशः तन मन धन झोकून देणार्यांचे क्षेत्र आहे, ह्याची खात्री पटते. आम्ही तो व्हिडीओ खाली देत आहोत, नक्की पहा. या व्हिडिओमुळे मराठी गप्पाच्या टीमचा सोनालीच्या मेहनतीप्रती असलेला आदर हा नक्कीच वाढला आहे. तिच्या या झोकून देऊन कलाकृती सादर करण्याचा वृत्तीला मराठी गप्पाच्या टीमचा सलाम !
बघा व्हिडीओ :