मनोरंजन क्षेत्रात अनेक अभिनेते आणि अभिनेत्री येतात. त्यातील काही निवडक कलाकार हे आपल्याला सातत्याने विविध कलाकृतींमधून दिसत राहतात. त्यांचा वावर आपल्याला सुखावून जातो. तसेच त्यांच्या अगदी जुन्या नवीन प्रत्येक कलाकृतीविषयी आपल्याला सतत कौतुक वाटत राहतं. आपण कळत नकळतपणे त्यांचे चाहते होऊन जातो. या अशा निवडक कलाकारांपैकी एक असलेल्या अभिनेत्रींविषयी आपण जाणून घेणार आहोत. सध्या तिचा पैठणी मधला लूक हा अतिशय वायरल होतो आहे. तसंच ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात अगदी खुमासदार सूत्रसंचालन करतानाही दिसत असते. यानिमित्ताने तिच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याचा आमच्या टीमने केलेला प्रयत्न.
त्या मराठमोळ्या अभिनेत्रीचे नाव आहे प्राजक्ता माळी. प्राजक्ता हि मुळची पुण्यातली. आई गृहिणी आणि वडील पोलीस दलात कार्यरत. प्राजक्ताच्या आईला आपल्या लेकीने उत्तम नृत्यांगना आणि अभिनेत्री व्हावं असं मनापासून वाटे. पण केवळ या वाटण्यावर त्या विसंबून राहिल्या नाहीत. त्यांनी प्राजक्ताने शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवण्यासाठी प्रोत्साहन दिलं. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी तिने हे शिक्षण सुरू केलं आणि महाविद्यालयात जाईतोपर्यंत विशारद ही पदवी मिळवली सुद्धा. नृत्याचे शिक्षण घेतल्यानंतर तिने नृत्याच्या विविध कार्यक्रमातुन सहभाग नोंदवला. यातील एका हिंदी नृत्यस्पर्धेचा व्हिडियो तिने आपल्या सोशल मीडिया नुकताच शेअर केला होता. ज्यात सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या हस्ते तिला पारितोषिक मिळालं होतं. तसेच प्राजक्ता दमली होती आणि सोनालीजींनी तिला चॉकलेट दिल्याची आठवणही तिने यानिमित्ताने शेअर केली होती. या काळात तिने ललित कलाकेंद्रातून स्वतःचं अभिनयाचं शिक्षण पूर्ण केलं. तसेच सातत्याने अभिनय आणि नृत्याचे कार्यक्रम चालू होते. तिचं काम पाहून तिला पुढील कामं मिळत गेली. ‘तांदळा’ हा चित्रपट तिला असाच मिळाला. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने तिला झी मराठी वरील सकाळी प्रदर्शित होणाऱ्या एका कार्यक्रमाची सुत्रसंचालिका होण्याची संधी मिळाली.
पुढे मग मालिकांतून आणि सिनेमांतूनही तिचा अभिनय प्रवास होत राहिला. या प्रवासातील दोन कलाकृती आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. एक म्हणजे ललित प्रभाकर याच्या समवेत केलेली मालिका म्हणजे ‘जुळून येती रेशीमगाठी’. तसेच ‘खो खो’ हा केदार शिंदे यांचा सिनेमा. या दोहोंतील तिच्या भूमिका गाजल्या. खासकरून मालिकेतील तिच्या मेघना या व्यक्तिरेखेने तिला ओळख, लोकप्रियता मिळवून दिली. तसेच ‘एका पेक्षा एक अप्सरा आली’ च्या पर्वातही ती होती. पण ही प्रसिद्धी, अमाप प्रेम प्राजक्ताने कधी डोक्यात घालून घेतलं नाही. तिने तिचा अभिनय सुरू ठेवला. सिनेमा, मालिका यांच्यासमवेत ती नाटकांतूनही अभिनय करती झाली. त्या माध्यमातही तिने स्वतःचा ठसा उमटवला. प्लेझंट सरप्राईज हे तिचं एक गाजलेलं नाटक. तसेच गेल्या काही काळापासून तिच्यातील सूत्रसंचालिका आपल्याला सातत्याने भेटत आली आहे. मग ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ असो वा ‘मस्त महाराष्ट्र’ असो. तिच्या कोणत्याही कृत्रिमतेशिवाय आणि मनमोकळे पणाने केलेल्या सुत्रसंचालनावर प्रेक्षक आपसूक भाळतात.
तसे ते तिच्या सौंदर्यावरही भाळतातच. तिच्या अनेक सोशल मीडिया पोस्ट्स मधून तीसुद्धा विविध पेहरवातून आपल्या समोर येत असते. मग ते सध्याचा पारंपरिक लूक असो वा मॉडर्न लूक. तिचे हे लुक्स तिच्या युट्युब चॅनेल वरून आपल्याला दिसत असतातच. तिने मध्यंतरी एका वेब चॅनेलच्या माध्यमातून अभिनय केला होता. एकूणच काय मनोरंजन क्षेत्रातील जवळपास प्रत्येक क्षेत्र तिने अनुभवलं आहे आणि त्यात आपली छाप सोडली आहे, हे नक्की. तिचा हा प्रवास हा दशकभराहुन जास्त काळाचा आहे. पण अभी तो ये शुरुआत हे, असं वाटावं इतका प्रसन्नपणा तिच्या कलाकृतींमध्ये आणि तिच्या वागण्यात दिसून येतो. येत्या काळातही हा प्रसन्नपणा टिकवून ठेवत प्राजक्ता सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहील, हे नक्की. तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !
View this post on Instagram