काही दिवसांपूर्वीच, मराठी गप्पावर एक लेख प्रसिद्ध झाला. तरुण आणि नव्या दमाचा अभिनेता आशुतोष गोखले याच्याविषयी. त्या लेखाला असंख्य वाचक लाभले. तुम्ही जो उत्तम प्रतिसाद दिलात त्याबद्द्दल धन्यवाद. लेख लिहित असताना, आशुतोषचं एक वाक्य लक्षात राहीलं ते म्हणजे त्याच्या भावाविषयीचं. त्याने जे वाक्य लिहिलं होत कि त्याचा आशय असा होता कि, नाट्यक्षेत्रातला त्याच्या भावाचा यशाचा रेट हा एका कसलेल्या फलंदाजाच्या रनरेट इतका सर्वोत्तम आहे. त्याचं हे म्हणणं खरं ठरेल अशी परिस्थिती आहे, असंही आपण म्हणू शकतो. कारण, त्याचा भाऊ आहे, ‘अद्वैत दादरकर’. आपल्या सगळ्यांचा लाडका, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधला सौमित्र. हि व्यक्तिरेखा आली आणि मालिकेत वेगळीच जान आली. या व्यक्तिरेखेप्रमाणे कोणत्याही कलाकृतीत स्वतःचा उत्साह आणि उर्जा पूर्णपणे वापरणारा अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, सूत्रसंचालक असा हा आजचा आघाडीचा कलाकार. आज त्याच्या कलाप्रवासाचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करूयात.
अद्वैत मुळचा मुंबईचा. आडनावाप्रमाणे खऱ्या अर्थाने दादरकर. त्याचं शालेय शिक्षण झालं बालमोहन विद्यामंदिर मध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण झालं ते डी.जी.रुपारेल कॉलेजमध्ये. त्याला कलाक्षेत्रातील घरचा वारसा आहेच. शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना, त्याने अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आणि हा वारसा पुढे चालू ठेवला. एकांकिका करता करता तो व्यावसायिक नाटकांकडे वळला. या माध्यमांतून त्याने अनेक दिग्गज कलाकारांसोबत जसा अभिनेता म्हणून रंगमंचावर वावर ठेवला, तसाच त्यांना दिग्दर्शितही केलं आहे. लीना भागवत, मंगेश कदम, रमेश भाटकर, विक्रम गोखले, कविता लाड-मेढेकर, प्रशांत दामले हि यांतील काही नावं. त्याच्या दिग्दर्शन कौशल्यामुळे अनेक अनुभवी कलाकारांनी वेळोवेळी त्याची पाठ थोपटली आहेच. त्याची गाजलेली नाटकं म्हणजे ‘दादा एक गुड न्यूज आहे’, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘डोंट वरी बी हॅप्पी’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘गोष्ट तशी गमतीची’, ‘जावई माझा भला’ आणि बऱ्याच एकांकिका. त्याच्या काही नाटकांचे, परदेशातही दौरे झालेले आहेत.
नाटकांत काम करता करता, त्याने मालिकाक्षेत्रांकडे स्वतःचा होरा वळवला. त्यातील, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ हि सध्या चालू असलेली आणि खूप गाजलेली मालिका. यातील सौमित्र या व्यक्तिरेखेने, राधिका या व्यक्तिरेखेच्या बाजूने कथेचं पारडं झुकावण्यास मदत केली. नुकताच, ‘पिंकी’, ह्या व्यक्तिरेखेत रूप बदललेला सौमित्र दिसला होता. त्याने या मालिकेप्रमाणेच, या ‘तू माझा सांगाती’ मालिकेतही अभिनय केलेला आहे. ‘दिल दोस्ती दोबारा’ मालिकेचं त्याने दिग्दर्शनही केलं होतं. मालिकांप्रमाणेच, तो रियालिटी शोजचा सुद्धा एका महत्वपूर्ण भाग राहिलेला आहे. त्याने ‘चला हवा येऊ द्या’ च्या शेलीब्रिटी पॅटर्न मध्ये प्रेक्षकांना खळाखळा हसायला लावणारे, जोशपूर्ण असे स्कीट्स सादर केले आहेत. त्याने सादर केलेलं विवाह कार्यालयांचं स्कीट, अंतिम सोहळ्यात अवतरलेला जिनी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात नक्की असणार. तो जसा उत्तम अभिनेता आहे, तसाच उत्तम सूत्रसंचालक सुद्धा. सध्या चालू असलेल्या ‘डान्सिंग क्वीन’ च्या नवीन पर्वाचा तो सूत्रसंचालक आहे. आपल्या खेळीमेळीने संवाद साधण्याच्या शैलीत, तो स्पर्धकांना, त्यांच्या नकळतपणे मनमोकळेपणाने बोलतं करतो. त्यांच्याशी गंमती जंमती करून, वातावारण हसतं खेळतं ठेऊन उत्तम सूत्रसंचालक म्हणून प्रेक्षक पसंतीस पात्र ठरतो.
अभिनय, सूत्रसंचालन याव्यतिरिक्त, तो आपल्या कुटुंबांसमवेत ‘अळीमिळी गुपचिळी’ या रियालिटी शोमध्ये दिसला होता. त्याच्या कुटुंबातून या कार्यक्रमात त्याची पत्नी आणि मुलगी सहभागी झाले होते. त्याची पत्नी, भक्ती देसाई हि सुद्धा उत्तम अभिनेत्री आहे. तिच्या अरुंधती, अमरप्रेम, अंजली ह्या मालिका खूप गाजल्या. नाटक, मालिका यांच्यासोबत अद्वैत जाहिरातीतही झळकला आहे. वोडाफोन आणि आयडिया यांच्या संयुक्त जाहिरातीत, तो आणि राधिका ची भूमिका करणाऱ्या अनिता दाते झळकले होते. नाटक, मालिका, जाहिराती यांचा लेखन, दिग्दर्शन करता करता, अद्वैतने सुरु केलेला त्याचा कलाप्रवासात त्याने खूप मोठी मजल मारली आहे. यासाठी, त्याचं प्रत्येक काम नाविन्य, कलात्मकता आणि सातत्याने सादर केल्याचं दिसतं. येत्या काळातही, हे तीनही घटक त्याच्या पुढील कलाकृतींमध्ये दिसतील आणि त्याच्या यशाचा आलेख सदैव चढता राहील हे नक्की. त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून त्याला खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)