स्टार प्रवाह आणि सुप्रसिद्ध मराठी मालिका हे जणू एक समीकरणच बनलं आहे. गेला बराच काळ स्टार प्रवाह वरील मालिका या लोकप्रियतेची नवनवीन शिखरे गाठत आहेत. या मालिकांमध्ये आता एका नवीन मालिकेची भर पडणार आहे. या मालिकेच्या प्रोमोजनी प्रेक्षकांमधील या मालिकेविषयीची उत्सुकता वाढली आहे. आज या मालिकेतील नायिकेची व्यक्तिरेखा साकार करणाऱ्या अभिनेत्रीच्या कारकीर्दीचा आढावा आपण घेणार आहोत. या नवीन मालिकेचं नाव आहे ‘स्वाभिमान शोध अस्तित्वाचा’. पूजा बिरारी ही उदयोन्मुख अभिनेत्री पुन्हा एकदा मालिकेतून नायिकेच्या भूमिकेत झळकताना दिसेल. पूजा मूळची पुण्याची. तिचं बालपण आणि शिक्षण पुण्यात झालं. लहानपणापासून तिला अभिनयात गती होतीच.
तिचं शिक्षण आणि कलाक्षेत्रातील वावर यांना तिच्या घरून पाठिंबा होताच. मूलतः असणारी आवड यामुळे ज्या ज्या संधी तिला मिळत गेल्या त्यांचं तिने सोनं केलं. ती अभिनय क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत होण्याअगोदर मॉडेलिंग करत असे. सकाळ समूहाच्या वतीने आयोजित स्पर्धेत तिने विजेतेपद पटकावले होते. अनेक प्रथितयश वृत्तपत्रांनी तिची दखल घेतली होती. इतरही स्पर्धांमधून तिचा वावर दिसून आला. विजेतेपदासोबतच तिने इतर अनेक किताबाही जिंकले. याच काळात तिला तिची पहिली मालिका करण्याची संधी मिळाली. या संधीचं तिने सोनं केलं. ‘साजणा’ ही ती मालिका. या मालिकेतील रमा ही मुख्य व्यक्तिरेखा तिने साकार केली. प्रताप आणि रमा ही जोडी हिट ठरली. नंतर ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिकाही तिने केली. तसेच ‘टॅग’ या शॉर्ट फिल्मचाही ती एक महत्त्वाचा भाग होती. अभिनेत्री असण्यासोबतच पूजा ही उत्तम नृत्यांगना आहे.
सध्या पूजा ही स्वाभिमान या तिच्या नवीन मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. आजपर्यंत तिने भाग घेतलेल्या स्पर्धामध्ये हमखास दमदार कामगिरी केली आहे. काम करत असताना सर्वोत्तम काम करायचं असा तिचा कल दिसून येतो. तिच्या नवीन मालिकेतूनही ती उत्तमच अभिनय करेल यात शंका नाही. तिच्या या नवीन मालिकेला आणि तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा ! त्याच सोबत मराठी गप्पाला तुम्ही देत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. आपल्या वेबवरील इतर मराठी कलाकारांचे लेख त्याचसोबत वायरल व्हिडीओज विषयी वाचायला आणि प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.