अनलॉक होत असलेल्या काळात, विवाहांना काही अटी शर्ती घालून परावानगी देण्यात आली होती. तरीही या काळात असंख्य लग्न झाली. यात सेलिब्रिटीज ही होतेच. त्यांच्याविषयी आपण सविस्तर लेख मराठी गप्पावर वाचले आहेतच. पण या सगळ्या लग्नसोहळ्यांत एक लग्न सोहळा गेल्या काही आठवड्यांत एकदम चर्चेचा विषय ठरला होता. कोणत्याही सेलिब्रिटीचं हे लग्न नव्हतं, कोणतंही मीडिया कव्हरेज त्या दिवशी नव्हतं, पण नंतर ते मिळालं. कारण या लग्नात खुद्द नवरीनेच लग्नमंडपात केलेला भन्नाट डान्स. ‘मेरे सैय्या सुपरस्टार’ असं म्हणत जुन्नर तालुक्यातली श्वेता ताजणे हिने आपल्याच लग्नात ठेका धरला आणि म्हणता म्हणता तिच्या डान्सचा व्हिडियो एवढा वायरल झाला की काही विचारता सोय नाही.
अगदी ही बातमी देणाऱ्या न्यूज चॅनेल्सच्या युट्युब व्हिडियोजनाही लाखलाखांहून लाईक्स मिळाले आहेत. हा लेख लिहीत असताना झी २४ तास यांनी या विषयावर केलेल्या बातमीला २५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिलेलं आहे. यावरून या वायरल व्हिडिओची कल्पना यावी. या विषयी अनेकांनी श्वेता आणि तिचा नवरा संकेत शिंदे यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यात श्वेता असं म्हणते की लग्नाअगोदर काही दिवस काम करत असताना तिने हे गाणं ऐकलं. लग्न हे एकदाच होतं, त्यामुळे त्या सोहळ्यात सगळी हौसमौज करण्याची तिची इच्छा होती. तसेच संकेत यांच्यावर तिचं खूप प्रेम. गाणं ऐकल्यानंतर आपण त्यांच्यासाठी डान्स करावा असं तिच्या मनाने घेतलं. पण सोबतच ही बाब एक सुखद धक्का असावी असा तिचा मानस होता. म्हणून मग तिने आई आणि मोजक्या घरच्यांना याची कल्पना दिली. अर्थात संकेत याबाबतीत अनभिज्ञ असणार होते. पण त्यांचा श्वेताला पाठिंबा देण्याचा स्वभाव पाहून तिने हे धाडसी पाऊल उचललं.
धाडसी यासाठी की कोण कशा प्रतिक्रिया देईल हा मुद्दा होताच. पण आपल्या लग्नात पूर्ण मज्जा करायची आणि संकेत यांना चकित करायचं, हे ठामपणे ठरवून तिने मंडपात आल्यावर डान्स करायला सुरुवात केली. बरं हा डान्स व्हिडियोत कैद केला जाईल, याचीही तिला कल्पना नव्हती. ती मनसोक्त नाचली. मंडपात आल्यापासून ते लग्नामंचकावर जाई पर्यंत ती नाचली. संकेत यांना आश्चर्याचा धक्का बसलाच पण आपल्या दबंग बायकोचा स्वभाव बघून त्यांनाही राहवलं नाही. त्यांनी डान्स संपताच तिला नजर लागू नये, म्हणून हातवारे केले. एकूणच झाल्या प्रकाराने संपूर्ण मंडपात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. तसेच व्हिडियो वायरल झाल्यानंतर या जोडीचा आनंद अजूनच द्विगुणित झाला. श्वेता हिने नुकतंच स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं असल्याचं तर संकेत हा पेशाने इंजिनीअर असून एका कंपनीत कार्यरत असल्याचं कळतं. तसेच त्याने प्रोफेशन फोटोग्राफी आणि त्यातही वेडिंग फोटोग्राफी केल्याचं कळतं. श्वेता ने केलेल्या डान्स मुळे त्यांचं लग्न चर्चेचा विषय बनलं आहे आणि त्यांच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. मराठी गप्पाची टीमही यात सामील आहे.
आपल्या मनमोकळे पणाने लोकांचं मन जिंकणाऱ्या या जोडीला मराठी गप्पाच्या टीमकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ! श्वेता आणि संकेत यांच्या लग्नाप्रमाणे या काळात अनेक लग्न झाली. वर वाचल्याप्रमाणे यात सेलिब्रिटीज आघाडीवर होते. तर काही सेलिब्रिटीज पुढील वर्षी लग्नबंधनात अडकतील. या सगळ्या विषयांवर मराठी गप्पाच्या टीमने केलेले लेख आपण वाचू शकता. त्यासाठी वर उपलब्ध असलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात लग्न असं लिहून सर्च केल्यास आपल्याला लेख वाचता येतील. तसेच अशाच काही वायरल लग्नाच्या बाबतीत वाचायचं असल्यास त्याच सर्च ऑप्शनमध्ये नंतर, ‘वायरल’ असं लिहून सर्च केल्यास आपल्याला ते लेखही मिळतील. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !
बघा व्हिडीओ :