येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका दाखल झाली आणि म्हणता म्हणता प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय बनली. काही कलाकृती अगदी थोड्या वेळात प्रेक्षक पसंतीस उतरतात, याचं नजीकच्या काळातलं उदाहरण म्हणजे ही मालिका. या मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांना आवडत आहेत. यातील मुख्य नायक आणि नायिका साकार करणाऱ्या अनुक्रमे शाल्व किंजवडेकर आणि अन्वी फलटणकर यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे लेख मराठी गप्पाच्या टीमने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते. त्या लेखांना मिळत असलेल्या अमाप प्रतिसादाबद्दल धन्यवाद ! आजच्या लेखातून आपण या मालिकेतील अजून एका उभारत्या कलाकाराविषयी जाणून घेणार आहोत.
हा कलाकार आहे अर्णव राजे. मालिकेतील स्वीटू चा भाऊ म्हणजे चिन्या आणि ही व्यक्तिरेखा साकार करणारा तरुण अभिनेता म्हणजे अर्णव. अर्णव मूळचा मुंबईचा आहे. मुंबईच्या सुप्रसिद्ध अशा पाटकर विद्यालयातून त्याचं शालेय शिक्षण झालं. लहानपणापासून कलाक्षेत्राची प्रचंड आवड. यात अभिनय, संगीत या कला शाखांची विशेष आवड. त्याच्या सोशल मीडिया पोस्ट्स मधून त्याने महेश काळे यांच्या सोबत एक वर्कशॉप केलेलं दिसतं. तसेच ट्रीनिटी कॉलेज ऑफ म्युझिक, लंडन येथून संगीताचे धडे घेतलेले दिसतात. सोबतच अभिनय स्पर्धांमधून त्याने स्वतःच्या शाळेचं प्रतिनिधित्व करत शाळेसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा पारितोषिकं जिंकली होती. तसेच काही वर्षांपूर्वी एका वेब सिरीज मध्येही त्याने काम केलेलं होतं. सध्या अर्णव हा ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. तसेच मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स मधून त्याचे महाविद्यालयीन शिक्षणही चालु आहेच.
अभिनय आणि संगीत यांच्यासोबतच त्याला क्रिकेटची ही प्रचंड आवड असून महेंद्र सिंग धोनी हा त्याचा आवडता खेळाडू होता. सध्या त्याने या मालिकेवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. या मालिकेतील त्याच्या अभिनयाची आणि व्यक्तिरेखेचीही चर्चा होते आहे. येत्या काळात अर्णव मालिकेतील चिन्याची व्यक्तिरेखा अजून फुलवेल आणि अजून लोकप्रिय करेल, यात शंका नाही. या उदयोन्मुख कलाकाराला मराठी गप्पाच्या टिमकडून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! तसेच वरील लेखात येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील अन्विता फलटणकर आणि शाल्व किंजवडेकर ह्या कलाकारांच्या नावांचा उल्लेख झालेला आहे. तर तुम्हांला त्यांच्याविषयी सुद्धा वाचायचं असल्यास, आपले मराठी गप्पावर सर्च ऑप्शनमध्ये त्यांचे नाव टाकून लेख वाचू शकता. तुम्ही दिलेल्या वेळेसाठी खूप खूप आभार.