मराठी गप्पावर आपण मनोरंज क्षेत्रातील विविध बातम्या जशा वाचत असता, त्याप्रमाणेच विविध वायरल व्हिडियोज विषयीसुद्धा आपण सातत्याने वाचत असता. असाच एक वायरल व्हिडियो आमच्या टीमच्या नजरेस आला, ज्याविषयी लिहावं असं मनापासून वाटलं. कारण यातून माणुसकीचं आणि भूतदयेचं दर्शन घडलं होतं, जे आमच्या वाचकांसमोर यावं असं आम्हाला वाटलं. हा वायरल व्हिडिओ आहे थायलंड मधील. थायलंड म्हणजे हत्तींचा देश. अनेकांनी थायलंड असं लिहिलेलं आणि हत्तीचा फोटो असलेला टी शर्ट अनेक वेळा पहिला असेल किंवा घातलाही असेल. तर अशा या हत्तींची लक्षणीय संख्या असलेल्या देशाच्या उत्तर भागातील चंताभुरी या परगण्यात एका हत्तीच्या अतिशय लहान पिल्लाची आणि एका मोटरसायकलची धडक झाली.
या धडकेत मोटरसायकलस्वार हा रस्त्यावर पडला होता, त्याला धक्का बसला होता पण त्यामानाने त्याची हालत ठीक होती. पण दुसरीकडे धडक बसलेल्या पिल्लाची अवस्था वाईट होत होती. त्याच सुमारास परिचारक म्हणून काम करणारे माना हे सुट्टीनिमित बाहेर पडले होते. पण हा अपघात पाहून त्यांनी तडक पाऊलं उचलायला सुरवात केली. त्यांचे सहकारी त्या मोटरसायकस्वाराला सांभाळत होते. तर माना स्वतः त्या हत्तीच्या पिल्लाजवळ होते. त्यांनी त्याला सी.पी.आर. देण्यास सुरुवात केली. खरं तर त्यांच्या २६ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच एखाद्या हत्तीवर सी.पी.आर.चा प्रयोग त्यांनी केला, असं त्यांनी विविध प्रथितयश वृत्तवाहिन्यांना नंतर सांगितलं. हा काळ केवळ दहा मिनिटांचा होता. पण जवळूनच त्या पिल्लाच्या कळपाचा आवाज येत होता. त्यामुळे भीतीयुक्त वातावरणात माना यांना हा काळ युगासारखा वाटला असल्यास नवल वाटू नये. पण त्या छोट्या हत्तीचा जीव वाचवण्याचं आपलं कार्य त्यांनी सुरूच ठेवलं. मानवी शरीरातील हृदयाची जागा आणि हत्तींविषयीच्या युट्युब व्हिडीओ ची मदत घेत त्यांनी सी.पी.आर देणं चालू ठेवलं.
त्यांच्या या कामाला यश आलं. १० मिनिटात ते पिल्लू हालचाल करू लागलं. झाल्या प्रकाराने भावनाविवश झालेल्या माना यांना अश्रू अनावर होईनात. मग त्या पिल्लाला काही काळ दुसरीकडे नेण्यात आलं आणि त्याला बाकी काही दुखापत नाही ना, हे पाहण्यात आलं. या चाचण्या पूर्ण झाल्यावर त्याला घटनास्थळी पुन्हा सोडण्यात आलं, जेणेकरून त्याची आई आणि कळप त्याला पुन्हा भेटावा. तसंच झालं. आता अपघातातून सावरलेल्या त्या पिल्लाची साद ऐकून त्याचा कळप तेथे आला आणि त्याला घेऊन गेला. झाल्या प्रकाराचा व्हिडिओ थायलंड आणि सध्या इंटरनेटवर प्रसिद्ध होतो आहे. त्या पिल्लाला वाचवणारे माना हे या घटनेमुळे लोकप्रिय होत आहेत. आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, नक्की पहा.
बघा व्हिडीओ :