चला हवा येउ द्या या कार्यक्रमाने गेल्या काही वर्षात आपल्या मनात अशी काही जागा बनवली आहे की त्यांचाशिवाय मनोरंजन अपुरं वाटतं. अर्थात याचं सगळं श्रेय जातं ते डॉ. निलेश साबळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला. लय भारी या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सुरू झालेला हा प्रवास इतक्या दीर्घकाळ चालेल याची त्यावेळी कोणाला कल्पना ही आली नसावी. पण या टीमची मेहनत आणि उत्तम विनोदनिर्मिती यांमुळे आज आपण त्यांचं हे यश पाहू शकतो. या वाटचालीत काही जण नव्याने ही दाखल झाले. अंकुर वाढवे हे त्यातलंच एक नाव. चला हवा येऊ द्या मधील कोणतीही भूमिका असो, अंकुर वाढवे यांनी प्रत्येक भूमिकेला उत्तम न्याय दिलेला आहे. आज त्यांचं यश पाहून भारावून जायला होतं. पण हे यश एकाएकी मिळालेलं नाही. त्यासाठी त्यांनी बराच काळ संघर्ष केलेला आहे, भूमिकांसाठी नकार पचवले आहेत.
पण हिंमत न हारता, त्यांनी आपला हा प्रवास चालूच ठेवला आणि आज ते लोकप्रियता मिळवत आहेत. त्यांच्या या संघर्षाची एक झलक त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्ट मध्ये बघायला मिळाली. या पोस्ट मध्ये अंकुर हे एका स्टीलच्या ताटावर नाव कोरताना दिसले. एरवी त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट मधून गंमतीदार कंटेंट बघायला मिळत असतो. प्रहसनात्मक काही असतं. पण या वेळी तसं नव्हतं. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना यात उजाळा दिला होता. या पोस्ट मध्ये ते म्हणतात की एक काळ असा होता की भांड्यांवर नाव कोरण्याचं काम ते करत असत. त्यावेळी एका भांड्यामागे त्यांना २ रुपये मेहनताना मिळत असे. या जोरावर दिवसाला ते १०० रुपये कमवत असत. एरवी त्यांच्या मुलाखतींतून त्यांच्या या खडतर दिवसांविषयी जास्त बोललं जात नाही. पण त्यांच्या या पोस्ट मधून त्यांनी किती कष्टाने आपलं आयुष्य उभं केलं आहे हे कळून येतं.
त्यांनी एका लहान गावातून आपला प्रवास सुरु केला. त्या गावाची लोकसंख्या केवळ ३००० च्या आसपास असावी. अतिशय लहान वयापासून कलाक्षेत्राविषयी त्यांना आकर्षण होतं. पुढे त्यांनी आपलं कलाक्षेत्रातील शिक्षण ही पूर्ण केलं. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट्स मधून त्यांच्या या काळातील काही आठवणींना उजाळा मिळतो. या काळात त्यांनी कित्येक नाट्यकृतींतून अभिनय केलेला आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोन वर्षात त्यांनी जवळपास ४८ नाट्यकृतींतून अभिनय केला होता. यात पथनाट्य, एकांकिका यांचा समावेश होतो. यावरून त्यांचा झपाटा लक्षात यावा. पुढे यथावकाश त्यांनी व्यावसायिक नाटकांतूनही अभिनय केला. सर्किट हाऊस, गाढवाचं लग्न, करून गेलो गाव, निम्मा शिम्मा राक्षस, सूट बूट मैं आया कन्हैय्या, आम्ही सारे फर्स्टक्लास ही त्यांनी अभिनित केलेली नाट्यसंपदा. अभिनयासोबतच ते एक उत्तम लेखक ही आहेत. गाढवाची लाथ, डायरेक्ट सरकारात हे लोकनाट्य त्यांनी लिहिलं आहे. तसेच ते सातत्याने कविता लेखन ही करत असतात.
त्यांच्या सोशल मीडियावरून या कवितांचं वाचन करता येतं. त्यामुळे अंकुर वाढवे म्हणजे मनोरंजनाचं पूर्ण पॅकेज आहे असं म्हणायला हरकत नाही. सध्या ते चला हवा येऊ द्या मध्ये व्यस्त आहेत. येत्या काळात ते इतरही अनेक कलाकृतींतून आपल्याला ते दिसतील हे नक्की. या लेखाच्या निमित्ताने या अष्टपैलू कलाकाराला आमच्या मराठी गप्पा टीमकडून मानाचा मुजरा आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!
आपल्याला हा लेख आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्या वाचकांना कोणत्या विषयांवर लेख वाचायला आवडतील हे आमच्या मराठी गप्पा टीमच्या डोक्यात सतत घोळत असतं. त्यातून नवनवीन विषय पुढे येतात आणि त्यावर उत्तम असे लेखही लिहिले जातात. यात वाचक म्हणून आपला वाटा अतिशय महत्वाचा. कारण आपण आमचे लेख शेअर करता, लेखांवर सकारात्मक कमेंट्स करता आणि त्यातून आम्हाला हुरूप मिळतो. प्रोत्साहन मिळतं. तेव्हा आपला हा पाठिंबा आमच्या टीमसाठी कायमस्वरूपी असू द्या. लोभ असावा. धन्यवाद !!