Breaking News
Home / मराठी तडका / हा मराठी सुपरस्टार परततोय छोट्या पडद्यावर, उद्यापासून सुरु होणार मालिका

हा मराठी सुपरस्टार परततोय छोट्या पडद्यावर, उद्यापासून सुरु होणार मालिका

मनोरंजन विश्वात असे काही कलाकार आहेत, ज्याचं नुसतं नाव जरी घेतलं तरी चेहऱ्यावर स्मित हास्य येतं. अनाहूतपणे जरी कोणी विचारलं, कि त्यांच्या सुप्रसिद्ध कलाकृती कोणत्या, तरीही त्यांच्या काही कलाकृती सहज सांगता येतात. झटपट आणि पटापट हे परवलीचे शब्द असणाऱ्या या जगात, कलाकार आणि कलाकृतींनी सदैव स्मरणात राहावं हे त्या कलाकारांचं श्रेय. या मांदियाळीतील एका लोकप्रिय अभिनेत्याला आपण २५ ऑक्टोबर पासून आपल्या मालिका विश्वात पुन्हा एकदा अभिनय करताना बघणार आहोत. या नवीन मालिकेच्या निमित्ताने, या लोकप्रिय आणि अनुभवी अभिनेता, निर्माता असलेल्या कलाकाराच्या, कलाप्रवासाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न.

हि नवीन मालिका आहे, ‘सुखी माणसाचा सदरा’ आणि ते लोकप्रिय कलाकार आहेत, ‘भरत जाधव’. महाराष्ट्राची लोकधारा, सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत, जत्रा, ऑल द बेस्ट, शिक्षणाच्या आयचा घो, पछाडलेला, बकुळा नामदेव घोटाळे या आणि अशा अनेक लोकप्रिय कलाकृतींमधून ज्यांनी प्रेक्षकांना सदैव आनंद दिला असे भरत जाधव. भरतजींचा अभिनय प्रवास हा काही दशकांचा. कॉलेजमधील एकांकिका ते करत असत. पण महाराष्ट्राची लोकधारा मधून सुरु झालेल्या प्रवासाने त्यांना अभिनेता म्हणून घडवलं, असं म्हंटलं तर सर्वथा योग्यच. शाहीर साबळे यांच्या देखरेखीत त्यांनी आपल्या अभिनय कलेला पैलू पाडले. त्यांच्या या प्रवासात त्यांना शाहिरांचे नातू आणि आत्ताचे लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे आणि लोकप्रिय अभिनेते अंकुश चौधरी यांची सदैव साथ लाभली आहे. पुढे या तिघांनीही मनोरंजन क्षेत्र गाजवलं. ऑल द बेस्ट हे नाटक केलं, जे खूप तुफान चाललं. भरतजींचं हे पहिलं व्यावसायिक नाटक. त्यांच्या इतरही काही लोकप्रिय कलाकृती वर नमूद केलेल्या आहेतच. या कलाकृती प्रामुख्याने नाटक आणि सिनेमा क्षेत्रांतील आहेत. काहींचे तर दोन्ही माध्यमांतून प्रयोग झाले आहेत. श्रीमंत दामोदर पंत आणि सही रे सही मधील गलगले हि त्यांची उदाहरणं. या दोन्ही व्यक्तिरेखा, भरतजींनी अजरामर केल्या आहेत. तब्बल अठरा वर्षांहून अधिक काळ सही रे सही चालू आहे, तरीही त्याची जादू ओसरलेली नाही. श्रीमंत दामोदर पंत यांतील दामू आणि त्याचा नाचही तसाच लोकप्रिय. ‘गोड गोजिरी लाज लाजरी’ हे गाणं ऐकल्यावर भरतजींनी नाटकात केलेल्या स्टेप्स हमखास आठवतात.

या दोन कलाकृतींसोबतच त्यांनी अनेक नाट्यकृतींमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आनंद दिला आहे. ‘ऑल द बेस्ट’ हे त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांतील अगदी प्रसिद्ध नाटक. नजीकच्या काळात त्यांनी काही जुन्या नाटकांचे नव्याने प्रयोगही केलेत. मोरूची मावशी, सौजन्याची ऐशीतैशी हि त्यातली दोन नावं. मोरूची मावशी हे स्वर्गीय विजय चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध केलेलं नाटक आणि मोरूची मावशी हि व्यक्तिरेखा. विजय चव्हाण यांच्या नंतर हि लोकप्रिय व्यक्तिरेखा साकारण्याचा मान भरतजींना मिळाला. एवढंच नव्हे तर विजय चव्हाण यांनी स्वतः भरतजींना या नाटकाच्या तालमींच्यावेळी, मोरूची मावशी पुन्हा साकारताना मदत केली होती. या प्रमाणे ढॅन्टॅ ढॅण, भरत आला परत, मास्तर ब्लास्टर हि त्यांची नाटकंसुद्धा गाजली. नाटकांप्रमाणे त्यांनी सिनेमातही विपुल काम केलंय. अग्ग बाई अरेच्च्या २, खो खो, पछाडलेला, जत्रा, माझा नवरा तुझी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, मुंबईचा डबेवाला, शिक्षणाच्या आईचा घो, येड्यांची जत्रा, वन रूम किचन, झिंग चिक झिंग, क्षणभर विश्रांती, या आणि अशा अनेक सिनेमांची नावं घेता येतील. या प्रत्येकात भरतजींनी वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकार केल्या आहेत.

एरवी विनोदी नायकाची भूमिका करणाऱ्या भरतजींनी, बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमात खलनायकाची भूमिका वठवली होती. जी प्रेक्षकांच्या पसंतीसहि उतरली होती. तसेच विनोदी भूमिकांप्रमाणेच गंभीर भूमिकाहि उत्तम रीतीने साकारण्यात भरतजींचा हातखंडा आहे. याची दोन उदाहरणं म्हणजे शिक्षणाच्या आईचा घो आणि वन रूम किचन. शिक्षणाच्या आईचा घो मध्ये विद्यार्थी, बदलती शिक्षण आणि समाज व्यवस्था आणि पालक यांच्यातल्या नात्यावर भाष्य केलं गेलं होतं. वन रूम किचनमधील त्यांच्या भूमिकेचंहि प्रेक्षकांनी कौतुक केलं होतं. तसेच जत्रा हा तर कधीही आणि कितीही वेळा बघितला तरीही सदैव हसवून हसवून करमणूक करणारा सिनेमा. यात विजय चव्हाण, प्रिया बेर्डे, क्रांती रेडकर, सिद्धार्थ जाधव, उपेंद्र लिमये, संजय खापरे, कुशल बद्रिके यांच्या सुद्धा भूमिका होत्या. काही काळापूर्वी कुशल यांच्या अभिनयप्रवासाचा आढावा मराठी गप्पावर घेतला गेला होता. त्या लेखात, जत्रा सिनेमातील एका जुन्या फोटोने प्रेक्षकांच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या.

नाटक, सिनेमा करता करता भरतजींनी मालिका विश्वातही काम केलंय. त्यांचा या माध्यमांतील वावर हा लक्षात राहावा असा असला तरीही त्यामानाने कमी आहे. त्यांनी हसा चकटफू या विनोदी मालिकेतून प्रेक्षकांना खळखळून हसायला लावलं होतं. यात त्यांना साथ लाभली होती ती पंढरीनाथ कांबळे, सिद्धार्थ जाधव आणि अतिशा नाईक यांची. तसेच साहेब, बिवी आणि मी हि मालिकासुद्धा खूप गाजली. यात गिरीश ओक आणि नीलम शिर्के या कसलेल्या कलाकारांसोबत भरतजींनी विनोदाची चौफेर उधळण केली. मधल्या काळात, कलर्स मराठी वाहिनीवरील ‘आली लहर, केला कहर’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्यांनी केलं होतं आणि आता ते ‘सुखी माणसाचा सदरा’ या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा कलर्स या वाहिनीसोबत आणि दिग्दर्शक म्हणून केदार शिंदे यांच्या सोबत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास तयार झाले आहेत. या मालिकेच्या प्रोमोज आणि प्रमोशनमधून आजकालच्या धकाधकीच्या आणि अनिश्चिततेच्या काळात, प्रेक्षकांच्या मनावर फुंकर घालणारी हि मालिका असेल असं दिसतं. यात रोहिणी हट्टंगडी यांनी भरत जाधव यांच्या आईची भूमिका साकार केलेली आहे.

अभिनयाप्रमाणेच एक यशस्वी कलाकार म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं गेलंय. त्यांच्या या यशामुळे ‘सुपरस्टार’ असं पद त्यांना प्रेक्षकांकडून दिलं गेलं. मराठी मनोरंजन विश्वातली पहिली वॅनिटी वॅन त्यांनी घेतली होती. तसेच अभिनेता म्हणून कारकीर्द घडवताना, त्यांनी भरत जाधव एन्टरटेन्मेंट या नाट्यनिर्मिती संस्थेची स्थापनाहि केली. या संस्थेमार्फत त्यांनी काही उल्लेखनीय नाटकं रंगमंचावर सादर केली आहेत. नुकताच त्यांनी एक फोटो सोशल मिडीयावरती शेअर केला होता. ज्यात, त्यांच्या निर्मिती संस्थेची बस दिसत होती आणि त्यांचे आई वडील त्या बस समोर उभे होते. आपले आई-वडिल आणि प्रेक्षक यांच्याविषयी यानिमित्ताने त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली होती. त्यांनी अनेक मुलाखती, सोशल मिडिया पोस्ट यांच्या माध्यमांतून आपले आई वडील आणि अर्धांगिनी यांनी केलेल्या योगदानाविषयी नेहमीच कृतज्ञता व्यक्त केली आहे.

भरत जाधव यांचा हाच मनाचा निर्मळ आणि सच्चेपणा प्रेक्षकांना भावतो. याच स्वभावामुळे, लॉकडाऊनच्या काळात ते आपलं सुपरस्टारपद न मिरवता त्यांच्या पत्नीसोबत शेतीतही रमतात. त्यांचा हाच साधेपणा त्याच्या प्रत्येक कलाकृतीतून उमटतो आणि प्रेक्षकांना त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून सदैव आनंद मिळत राहतो. त्यांनी अभिनेता आणि निर्माता म्हणून सादर केलेल्या प्रत्येक कालाकृतींशी आपल्या काहीना काही आठवणी निगडीत असतीलच. एवढ्या त्या व्यक्तिरेखा आणि कलाकृती भरतजींनी जिवंत केल्या आहेत. हे करताना त्या कलाकृतींत, तेवढाच साधेपणा आणि निरागसपणा टिकून राहील हे सुद्धा पाहिलं आहे. सुखी माणसाचा सदरा हि मालिकासुद्धा यास अपवाद नसणार हे नक्की. या मालिकेनिमित्त, पुन्हा टेलीविजनवर अभिनय करणाऱ्या भरत जाधव यांना मराठी गप्पाचा मानाचा मुजरा ! तसेच भरत जाधव आणि ‘सुखी माणसाचा सदरा’च्या संपूर्ण टीमला या नवीन मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.