Breaking News
Home / मराठी तडका / हे आहेत टीव्ही मालिकांमधील महाराष्ट्राचे टॉप १५ फेव्हरेट ‘मोस्ट डिझायरेबल मेन’ अभिनेते

हे आहेत टीव्ही मालिकांमधील महाराष्ट्राचे टॉप १५ फेव्हरेट ‘मोस्ट डिझायरेबल मेन’ अभिनेते

मनोरंजन विश्वात नवनवीन कलाकृती येत असतात. त्यानिमित्ताने नवनवीन कलाकारही आपल्या भेटीस येत असतात. काही जुन्या कलाकारांची नव्याने ओळख होत असते. आपण हे सगळं पाहत असतो. आपल्या आवडी निवडी नोंदवत असतो. कोणती कलाकृती आवडली, हे मांडत असतो. कोणता/ती कलाकार कोणत्या भूमिकांतून आवडले, हे ही चर्चेचे विषय असतातच. पण बहुतांश वेळेस हे सगळं नेहमीच्या गप्पा आणि सोशल मीडियावरील पोस्ट्स मधून होत असतं. त्यामुळे ढोबळमानाने एक चित्र आपल्यासमोर उभं राहतं. पण जेव्हा ‘टाइम्स ऑफ इंडिया’ सारखी प्रथितयश वृत्तसंस्था याविषयीचा जनतेचा कौल आपल्यासोबत शेअर करते तेव्हा मात्र याबाबतच चित्र अजून स्पष्ट होतं, असं आपण म्हणू शकतो. टाइम्स ऑफ इंडिया तर्फे दरवर्षी काही कलाकारांची यादी तयार केली जाते. या यादीतून प्रेक्षकांना कोणकोणते कलाकार जास्त आवडले, हे आपल्याला कळू शकतं. यात ‘मोस्ट डिझायरेबल मेन’ ही यादी असते. यावर्षीही काही काळापूर्वी ही यादी जाहीर झाली. यात मराठीतील १५ अभिनेत्यांची यादी तयार करण्यात आली होती. ती यादी संक्षिप्त स्वरूपात आपण आपल्या प्रेक्षकांसाठी देत आहोत.

क्रमांक ११ ते १५ :

या यादीतील ११ व्या स्थानावर आपल्याला दिसून येतो तो यशोमन आपटे. देखणं व्यक्तिमत्व, उत्तम अभिनय आणि कामात सातत्य यांमुळे यशोमन हा नेहमीच लोकप्रिय ठरत आलेला आहे. शालेय, महाविद्यालयीन जीवनात अभिनय क्षेत्रात प्रवेश करणारा आणि नंतर अभिनयाच्या जोरावर थेट युनिव्हर्सिटी लेव्हल ची पारितोषिकं मिळवणारा हा तरुण अभिनेता मोस्ट डिझायरेबल लिस्ट मध्ये ११ व्या स्थानावर आहे. त्यानंतर क्रमांक लागतो तो आरोह वेलणकर याचा. नजीकच्या काळातील लाडाची मी लेक गं आणि त्यापूर्वीच्या मराठी बिग बॉस सारख्या लोकप्रिय कार्यक्रमाचा तो एक महत्वपूर्ण भाग राहिलेला आहे. यानंतर १३ व्या स्थानावर येतो तो हर्षद अटकरी. दुर्वा ते फुलाला सुगंध मातीचा या त्याच्या प्रवासात त्याने स्वतःला अभिनेता म्हणून तावून सुलाखून घेतलं आहे. त्याने केलेली प्रत्येक भूमिका ही लोकप्रिय ठरली आहे. त्याच्या अभिनयासोबत त्याचं रुबाबदार व्यक्तिमत्व ही त्याला या लिस्ट मध्ये मान मिळवून देतं.

१४ व्या स्थानी येतो तो विराजस कुलकर्णी. नाटकांत रमणारा, विविध नाट्य प्रयोग करणारा हा अष्टपैलू कलाकार टीव्हीच्या पडदयावर दाखल झाला आणि अल्पावधीतच लोकप्रिय ठरला आहे. त्याने रंगवलेली आदित्य ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना किती आवडली आहे हे वेगळं सांगणे न लगे. १५ व्या स्थानावर आहे सायंकित कामत. तुझं माझं ब्रेकअप, रात्रीस खेळ चाले यांसारख्या प्रसिद्ध मालिकांचा एक महत्वाचा भाग म्हणजे सायंकित. मालिकांसोबतच त्याने नाटकांतुनही उत्तम अभिनय केलेला आहे.

क्रमांक ६ ते १० :

या लिस्ट मध्ये ६ व्या स्थानावर विराजमान झाला आहे राज हंचनळे. तुझ्यात जीव रंगला यातील त्याच्या भूमिकेचं कौतुक झालं आहेच. सोबतच त्याने चला हवा येऊ द्या या लोकप्रिय कार्यक्रमात विविध प्रहसनातूनही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली होती. त्यानंतर ७ व्या क्रमांकावर आहे एक असा अभिनेता ज्याने गेल्या काही काळात दोन अव्वल मालिकांतून महत्वपूर्ण भूमिका साकार केल्या आहेत. या दोन मालिका म्हणजे तुला पाहते रे आणि रंग माझा वेगळा. बरोबर ओळखलंत. सातव्या क्रमांकावर आपल्या सगळ्यांचा आवडता आशुतोष गोखले निवडला गेलेला आहे. नायक आणि खलनायक या दोन्ही व्यक्तिरेखा तेवढ्याच तडफेने निभावणारे अभिनेते त्या मानाने कमी असतील. अशा या मोजक्या अभिनेत्यांच्या यादीतील एक महत्वाचं नाव म्हणजे शशांक केतकर. शशांकने ह्या यादीत आठवे नाव आहे. शशांक याने रंगवलेले नायक हे जितके लोकप्रिय ठरले आहेत, तितकाच तो रंगवत असलेला ‘पाहिले न मी तुला’ मालिकेतील खलनायक हा भाव खाऊन जातो आहे.

याच मालिकेतील नायकाची भूमिका साकार करणारा, आशय कुलकर्णी या गुणी आणि देखण्या अभिनेत्याने या लिस्ट मध्ये ९ वं स्थान पटकावलं आहे. भूमिका खलनायकाची असो वा नायकाची, आशय प्रत्येक भूमिकेत समरसून काम करतो. त्याने गेल्या काळात केलेल्या आणि सध्या करत असलेल्या दोन मालिकांतून हे सिद्ध होतं. यानंतर येतो तो १० वा क्रमांक आणि यावर विराजमान झाला आहे, सुयश टिळक. का रे दुरावा, शुभमंगल ऑनलाईन, दिल दोस्ती दुनियादारी यासारख्या लोकप्रिय मालिकांचा तो एक महत्त्वपूर्ण भाग होता. यंदा त्याने खाली पिली या चित्रपटातून बॉलिवूड मध्येही पदार्पण केलेलं आहे. क्रमांक ६ ते १५ या क्रमांकांवर कोण कोण विराजमान झाले आहेत हे आपण पाहिलंच. आता वेळ आहे ती पहिल्या पाचमध्ये कोण आहे ते बघण्याची. चला तर मग सुरू करूयात क्रमांक ५ पासून

क्रमांक १ ते ५ :

या लिस्ट मधला पाचवा क्रमांक पटकावला आहे स्वीटूचा ओंकार अर्थात शाल्व किंजवडेकर. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेने घराघरात पोहोचलेला हा चॉकलेट बॉय हिरो आज तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्याने साकार केलेली ओंकार ही व्यक्तिरेखा अतिशय लोकप्रिय ठरली आहे. यानंतर ४थ्या क्रमांकावर येतो तो सिद्धार्थ चांदेकर. नाटक, सिनेमा, मालिका असं कुठंचही माध्यम असू द्या. सिद्धार्थ हा प्रत्येक भूमिकेत तेवढ्याच आत्मीयतेने एकरूप होऊन काम करतो. देखणं व्यक्तिमत्व, त्याला साजेसा असा स्मार्टनेस आणि अर्थात उत्तम अभिनय यांच्या बळावर तो आज ४थ्या स्थानी पोहोचला आहे. तिसऱ्या स्थानावर आहे विशाल निकम. मिथुन या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा हा अभिनेता गेल्या काही काळात घराघरात पोहोचला आहे ते ज्योतिबा देवाची भूमिका केल्याने. ‘दख्खनचा राजा जोतिबा’ या मालिकेत त्याने जोतिबा देवाची मध्यवर्ती भूमिका साकार केलेली आहे.

यानंतर येतात ते पहिले दोन क्रमांक. यात दुसऱ्या क्रमांकावर आहे गेल्या काही काळात ज्याची व्यक्तिरेखा टीकेचा धनी बनली होती, पण।ज्याच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं असा आशुतोष पत्की. अग्गं बाई सुनबाई मालिकेतील बबड्या ही व्यक्तिरेखा लोकप्रिय करण्यात तो यशस्वी ठरला होता. यासोबतच शा हि द भा’ई को’तवाल आणि अकल्पित हे त्याने अभिनित केलेले चित्रपट ही गाजले होतेच. आता वेळ आहे ती पहिल्या क्रमांकाची. या पाहिल्या स्थानावर विराजमान झालेला अभिनेता आहे अजिंक्य राऊत. विठू माऊली या मालिकेतील आपल्या लाडक्या विठुरायाची भूमिका साकार करणारा हा अभिनेता. अवघ्या चोविसाव्या वर्षी त्याला ही ऐतिहासिक भूमिका करायला मिळाली आणि त्यानेही ती तितक्याच तन्मयतेने केली. येत्या काळात तो टकाटक २ या चित्रपटाद्वारे आपल्या भेटीस येईल.

तर अशी ही मोस्ट डिझायरेबल मराठी अभिनेत्यांची लिस्ट. आपल्या वाचकांपर्यंत यावी आणि प्रत्येक अभिनेत्या विषयी अगदी थोडक्यात माहिती व्हावी हा आपल्या टीमचा प्रयत्न होता. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमें’ट्स मधून कळू द्या. तसेच आमचे प्रत्येक लेख वाचत राहा, शे’अर करा ! आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *