सध्या लॉकडाऊननंतर अनेक मालिकांचं शुटींग पुन्हा सुरु झालं आहे. यातील काही कलाकार लॉकडाऊन, करोना अशा कारणांमुळे पुन्हा शुटींगसाठी येऊ शकलेले नाहीयेत. त्यांच्या जागी नवीन कलाकार त्यांची जागा घेताना दिसताहेत. त्याची बातमी तुम्ही मराठी गप्पा वर वाचली असेलच. याच सोबत काही चेहरे ज्यांना आपण आधीपासून ओळखतो तेही मालिकांत नव्याने दाखल होत आहेत. असाच एक चेहरा म्हणजे संग्राम समेळ. सध्या लोकप्रिय असलेल्या हे मन बावरे या मालिकेत तो सम्राट तत्ववादी या भूमिकेतून आपल्या भेटीस आला आहे. याच निमिताने संग्राम याच्या अभिनयाच्या कारकीर्दीचा घेतलेला थोडक्यात आढावा. हे मन बावरे या मालिकेत तो शशांक केतकर आणि मृणाल दुसानीस यांच्यासोबत काम करताना दिसतो आहे. संग्राम याने शशांक केतकर याच्यासोबत या आधीही कुसुम मनोहर लेले या गाजलेल्या नाटकात काम केलेले आहे.
या नाटकासोबातच एकच प्याला या गाजलेल्या नाटकाच्या पुनरुज्जीवनानंतरच्या प्रयोगांत त्याने काम केले आहे. संन्यस्त ज्वालामुखी या नाटकातील स्वामी विवेकानंदांच्या त्याच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतुक केलं होतं. त्याची हि नाटकाची आवड अगदी लहानपणापासूनची. ती त्याच्या आई वडिलांकडून त्याला लाभली आहे. त्याचे वडील म्हणजे प्रख्यात लेखक, दिग्दर्शक, नाटककार अशोक समेळ. तसेच त्याची आई संजीवनी समेळ यासुद्धा संगीत आणि अभिनय क्षेत्राशी निगडीत. त्यामुळे अभिनय क्षेत्रात काम करण्याची संधी त्याला वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी मिळाली तेव्हा या दोघांनी संग्रामला पाठींबाच दिला. ते नाटक होतं “रायगडला जेव्हा जाग येते”. काही काळापूर्वी संग्राम याने त्याच्या सोशल मिडिया अकाउंट वरून या ऐतिहासिक नाटकाच्या आठवणींना उजाळा दिला होता. या नाटकांसोबतच त्याने तोच परत आलाय, वर खाली दोन पाय हि नाटकेसुद्धा केली.
किंबहुना, वर खाली दोन पाय या नाटकात संग्रामने त्याची पत्नी सुप्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी पाटील हिच्यासोबत काम केलं होतं. कौतुकाची गोष्ट म्हणजे दोघांनाही सदर नाटकातील अभिनयासाठी पुरस्कारही मिळवले होते. नाटक म्हणजे पहिलं प्रेम असलं तरीही इतर माध्यमांकडेहि संग्रामने दुर्लक्ष केलेलं नाहीये. त्याने काम केलेल्या मालिकाही गाजल्या आहेत. तो प्रथमतः अभिनेता म्हणून ज्या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात भरला ती म्हणजे “पुढचं पाउल”. पुढील काळात त्याने बापमाणूस, ललित २०५ या मालिकाही केल्या. तसेच त्याने सिनेमातही काम केलं आहे. लॉकडाऊनच्या आधी त्याचा स्वीटी सातारकर हा अमृता देशमुख सोबतचा सिनेमा प्रसिद्ध झाला होते. त्याआधी त्याने ब्रेव्हहार्ट या एका विलक्षण गोष्टीच्या सिनेमात काम केलं होतं. विक्की वेलिंगकर हा त्याचा अजून एक सिनेमा. सध्या मात्र तो “हे मन बावरे” या मालिकेत व्यस्त आहे. परंतु येत्या काळात हा अभिनेता त्याचं पाहिलं प्रेम असणाऱ्या नाटकांतून आणि मालिका, सिनेमे यातून आपल्या भेटीस येईल यात शंका नाही. त्याच्या पुढील वाटचालीस मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)