व्यवसाय करणं आणि तो टिकवणं हे सर्वार्थाने कसोटीचं काम. कारण, इथे काम करणाऱ्याला सुट्टी नसते, कामची जोखीम आणि वरून ग्राहकांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याचं टेन्शन. पण काही जण आनंदानं हे काम करतात. आपले काही मराठी सेलिब्रिटीजसुद्धा त्यात मागे नाहीत बरं का.
चला तर मग जाणून घेऊयात, कला क्षेत्रात मुशाफिरी करताना, स्वतः मधल्या व्यावसायिकाला वाव देणाऱ्या कलाकार मंडळींना.
तेजाज्ञा : नावावरून तुम्ही अंदाज लावला असेलंच. होय. हा ब्रँड आहे तेजस्विनी पंडितचा. आणि तिला साथ द्यायला अभिज्ञा भावे आहेच. अभिज्ञा आधी एयर होस्टेस होती आणि मग अभिनय क्षेत्रात तिने पदार्पण केलं. या दोघींची मैत्री झाली आणि पुढे दोघींनी मिळून आपला डिजायनर कपड्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली. दोघींच्या नावाचे मिळून एक नवीन नाव तयार केले, तेजाज्ञा. आणि हे नाव दिले त्यांच्या नव्याकोऱ्या व्यवसायाला.
या ब्रँड अंतर्गत, डिजायनर वेअर ला खासकरून प्रमोट केलं जातं. सध्या सगळ्यात जास्त चर्चा त्यांच्या मास्क ची आहे. कारण यात जवळ जवळ ३-४ प्रकार त्यांनी विक्रीस ठेवले आहेत. फेसबुक वर त्यांच्या पेज ला भेट दिल्यास तुम्हाला या विषयी अधिक माहिती मिळू शकेल. फेसबुक वर त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या लवकरच २०,००० वर पोहोचेल. आणि इंस्टाग्राम वर तर त्यांनी ५६,००० चा टप्पा पण पार केला आहे.
हंसगामिनी : डिजायनर कपड्यांचा विषय निघाला आहे तर अजून एक ब्रँड ची ओळख करून घेऊया. हा आहे हंसगामिनी. साड्यांचा ब्रँड. सध्या अग्ग बाई सासूबाई मधून आपलं मनोरंजन करणाऱ्या, आपल्या लाडक्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा हा ब्रँड आहे. विविध साड्यांचे प्रकार या ब्रँड अंतर्गत लोकांना निवडता येतात. निवेदिताजी स्वतः अनेक साड्यांचं डिजाईन करतात. त्यांच्याशी बोलल्यानंतर हे जाणवतं कि फक्त ब्रँड ला प्रमोट त्या करत नाही. तर यातील तांत्रिक बाबी सुद्धा त्यांनी अवगत करून घेतल्या आहेत. या वरून त्यांची त्यांच्या ह्या व्यवसायाप्रती असलेली श्रद्धा दिसून येते. त्यांनी घेतलेल्या मेहनतीचं कौतुक वाटतं.
हा ब्रँड सुरु होण्याची पण एक वेगळीच कथा आहे. काही वर्षांपूर्वी ब्रह्मपुत्रा नदीला पूर आला होता. त्या वेळी तिथल्या कारागिरांना मदत करण्याच्या उद्देशाने त्यांनी तेथील साड्या कोणत्याही पैशाची अपेक्षा न करता विकण्यास मदत केली. हळू हळू त्यांना या व्यवसायाबत माहिती घ्यावसं वाटू लागलं. आपल्या मैत्रिणीसोबत त्यांनी या व्यवसायाबद्दल माहिती घेतली. मग या व्यवसायाची सुरुवात केली, ती आजतागायत.
पिझ्झा बॉक्स : लॉकडाऊन असो व नसो. पिझ्झा म्हटलं कि तोंडाला पाणी सुटतच. तर अशा या पिझ्झाचा एक ब्रँड काही वर्षांपूर्वी सुरु केला तो एका मराठमोळ्या गायिकेने, वैशाली सामंत यांनी. आपल्या इतर तीन मैत्रिणींसोबत त्यांना या व्यवसायाची कल्पना सुचली. आपल्या मुलांना शाळेत सोडण्यानिमित्त त्यांची मैत्री झाली आणि पुढे व्यवसायात भागीदारी. शाळा कॉलेज मधल्या मुलांना डोळ्यासमोर ठेऊन पदार्थ केले गेले असले तरी, पिझ्झा म्हटलं कि सगळे आपोआप लहान होतातच. म्हणूनच पिझ्झा बॉक्स या नावाने लोकप्रिय असनाऱ्या त्यांच्या ब्रँडला खवय्ये आणि अनेक सेलेब्रिटीजनीसुद्धा वाखाणलं आहे.
द बॉम्बे फ्राईज : खाण्याचा विषय असेल आणि फ्राईजचा उल्लेख नसावा. कसं शक्य आहे. द बॉम्बे फ्राईज या नावाने ओळखला जाणारा ब्रँड तयार केला आहे एका मराठमोळ्या जोडीने. हि जोडी आहे शंतनू मोघे आणि प्रिया मराठे. हि जोडी आपल्याला नुकत्याच संपन्न झालेल्या झी मराठी वरील शूरवीर संभाजी या मालिकेत दिसली होती. यात, शंतनू यांनी प्रदीर्घ अशी शहाजी राजे यांची भूमिका उत्तम वठवली होती, तर प्रिया या सुद्धा काही काळासाठी या मालिकेचा एक भाग होत्या. या जोडीचा हा एक कॅफे असून, प्रसिद्धी मिळवतो आहे. प्रसिद्धीचं कारण म्हणजे विविध प्रकारचे फ्राईज आणि कॅफेच्या आतील सजावट. दोन्हीही उत्तम असून भेट देणाऱ्यांना या अंतर्गत आकर्षक सजावटीमुळे फ्राईज खाण्याची मजा अजून लुटता येते.
आईच्या गावात : आता एवढं सगळं वाचून तुम्हांला हेच म्हणावसं वाटेल कारण बऱ्याच जणांना याची कल्पना हि नसेल. पण हि केवळ प्रतिक्रिया नाहीये. हे होतं हॉटेलचं नाव. पुण्यामध्ये शशांक केतकर या आपल्या लाडक्या अभिनेत्याने आपलं खूप वर्षांपूर्वीच स्वप्न म्हणून हे हॉटेल सुरु केलं. सुमारे तीन ते चार वर्ष चालवलं. त्यात घरच्यांचीसोबत होतीच. पण काही अपरिहार्य कारणांमुळे हे हॉटेल त्याला बंद करावं लागलं.
(Author : Vighnesh Khale)