लहानपणी शाळेत असताना आपल्याला निबंध हा प्रकार लिहावा लागायचा. बरं काहींना तो आवडत असे तर काहींची नाकं आपसूक मुरडली जायची. बरं अस असलं तरी काही विषय मात्र आपल्याला नेहमीच लिखाण करण्यास उत्सुक करायचे. माझी आई, माझं गाव, माझे आवडते शिक्षक वगैरे. याच मांदियाळीत ‘माझा भारत देश’ या विषयावर ही हमखास निबंध लिहावा लागे. आपणही अगदी आवडीने त्यावर लिखाण करत असू. त्यातील काही मुद्दे कायम असत, कदाचित आजही ते तेवढेच कायम आहेत. केवळ निबंधात नाही, तर प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा !
या मुद्द्यांतील अगदी आघाडीचा मुद्दा म्हणजे बंधुता ! आपला देश विविधतेने नटलेला असूनही एकमेकांविषयी बंधुप्रेम असणं ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे आणि राहील. या बंधूतेच सगळ्यांत मोठं आणि अभिमानास्पद उदाहरण म्हणजे आपली सगळी संरक्षण दलं होय. संरक्षण दलात सामील होणं ही कोणासाठी ही अभिमानास्पद गोष्ट असते आणि कायम असेल. एकदा का इथे भरती झालं की आपल्या मनातली भाषा, प्रदेश, जात आणि इतर बऱ्याच गोष्टी गळून पडतात. उरतं ते फक्त भारतीयत्व ! हे भारतीयत्व तसंही आपल्या सगळ्यांच्या मनात असतंच असतं. पण संरक्षण दलात गेल्यावर त्यास एक वेगळीच झळाळी मिळते.
तसेच संरक्षण दलांच्या ट्रेनिंग मधून, काम करण्याच्या पद्ध्तीतूनही बंधुत्व वाढीस लागतं. आपण संरक्षण दलातुन निवृत्त झालेल्या अनेक जवानांच्या मुलाखती ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. त्यांच्या बोलण्यातून अनेक वेळा ‘बडी’ असा शब्द ऐकू येतो. म्हणजे त्यांच्या सोबत काम करणाऱ्या इतर जवानांना तसं संबोधलं जातं. बरं हे केवळ काम एकत्र करणं नसतं. तर ते अक्षरशः एकमेकांचे पाठीराखे ही असतात. एकमेकांसाठी जीव देण्याची तयारी या जवानांनी केलेली असते आणि ते ती जिवापलीकडे जपतात. यातूनच मग आयुष्यभराची मैत्री तयार होते. ही मैत्री एवढी गहिरी असते की मुलाखतींतून अगदी तडाखेबंद उत्तरं देणारे जवान काही वेळा भावुक होतात. जर त्यांचे बडी आजही असतील तर मग भेटणं ही होतंच आणि त्यांचा विषय निघाला की या जवानांचा चेहरा ही खुलतो. आतापर्यंत पाहिलेल्या अनेक मुलाखतींतून ही काही निरीक्षण आपल्याला करता येतात. त्यांचा एकमेकांविषयी असलेला जिव्हाळा आपलं मन जिंकून जातो. रक्ताचे असो नसो, पण भारतीय म्हणून असलेले हे बंधुत्वाचे नाते समाधान देऊन जातं. काही वेळा हेच बंधुत्वाचे नाते आपल्याला पाहायला ही मिळते.
आज तो उत्तम योग एका व्हिडियो मुळे आमच्या टीमच्या नशिबात आला. आमची टीम संरक्षण दलातील जवानांच्या मुलाखती ऐकणं पसंत करते हे एव्हाना आपल्याला कळलं असेलच. यातूनच सोशल मीडियावर एक व्हिडियो समोर आला. हा व्हिडियो आपल्या दोन जवानांचा आहे. हे निश्चितच एखाद्या कार्यवाही वरून परतलेले वाटतात. एवढ्या ठामपणे वाटण्याचं कारण म्हणजे एका जवानांच्या उजव्या हाताच्या पंजाला गंभीर दुखापत झालेली दिसते. व्हिडियो सुरू होतो तेव्हा ते आपला हात निरखत असताना आपल्याला दिसतात. कदाचित नुकतीच मलमपट्टी केलेली असावी असा अंदाज बांधता येतो. बरं थेट पंजाला दुखापत झाली असल्याने हातात काहीही वस्तू पकडणं किंवा अगदी नुसतं जेवण जेवणे यावरही निर्बंध येतात. पण त्यांना मात्र काळजी करण्याचं काही कारण नसतं. कारण त्यांच्या समोरच दुसरे एक जवान बसलेले असतात. त्यांच्या हातात जेवणाचं ताट असतं आणि त्यात भाजी चपाती असते. बरोबर ओळखलंत ! ते जवान आपल्या जखमी सहकाऱ्यास एकेक करून घास भरवत असतात. यास बंधुत्व खेरीज दुसरा शब्द तो काय असावा ! हा व्हिडियो पाहिला, त्याचक्षणी बंधुत्व ही एकच संज्ञा मनात आली. म्हंटलं याविषयी लिहायला हवं. कारण एरवी आपण सगळेच भारतीय संरक्षण दलाचे चाहते असतोच.
त्यांचे अनेक व्हिडियोज पाहत असतो. अनेक शॉर्ट व्हिडियोज ही असतात. त्यातील ‘सिग्मा रुल’ दाखवणारे अनेक व्हिडियोज तर आपण आवडीने पाहतो आणि अभिमानाने शेअर ही करतो. म्हंटलं यानिमित्ताने या व्हिडियो विषयी ही आपल्या वाचकांना कळू दे. बरं या व्हिडियोची एडिटिंग करणाऱ्या व्यक्तीने ही, ‘याद करेगी दुनिया’ हे गाणं अगदी चपखल रीतीने वापरलं आहे. त्यामुळे त्याची परिणामकारकता अजून जाणवते. या अनभिज्ञ व्हिडियो एडिटरचं ही कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. असो.
वर उल्लेख केल्याप्रमाणे भारतीय संरक्षण दले हा आपल्या प्रमाणे आमचा ही आवडीचा विषय आहे. त्यामुळे लिहू तेवढं थोडं आहे. पण लेख लिहीत असताना थोडी मर्यादा पाळावी लागते त्यामुळे थांबणं क्रमप्राप्त आहे. तेव्हा आजच्या लेखात इथेच थांबतो. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :