Breaking News
Home / मराठी तडका / ह्या अभिनेत्रीचे आई बाबासह संपूर्ण कुटुंब झळकलंय चित्रपटसृष्टीत, नवरा आहे सुपरस्टार

ह्या अभिनेत्रीचे आई बाबासह संपूर्ण कुटुंब झळकलंय चित्रपटसृष्टीत, नवरा आहे सुपरस्टार

आपल्या मनोरंजन विश्वाचा एक अतिशय महत्वाचा भाग म्हणजे मलिका. आपल्या जीवनात या मालिकांचा विशेष प्रभाव असतो. यातील सकारात्मक पात्र आपल्याला आपल्या घरातील वाटतात. सध्याच्या काळातलं असंच एक पात्र म्हणजे आसावरी. आधीच्या ‘अग्गं बाई सासूबाई’ आणि आताच्या ‘अग्गं बाई सूनबाई’ या लोकप्रिय मालिकेतील ही व्यक्तिरेखा. निवेदिता सराफ यांनी ही व्यक्तिरेखा अतिशय खुबीने उभी केली आहे. या दोन्ही मालिकांमध्ये या व्यक्तिरेखेच्या स्वभावात झालेले बदल आणि त्यामुळे वागण्यात झालेले बदल त्यांनी अगदी उत्तमरीतीने साकारले आहेत. त्यांचा अभिनय बघणं ही पर्वणीच. त्यांच्या अभिनय प्रवासाची सुरुवात लहान वयात झाली. तिथपासून ते आजतागायत त्यांनी अनेक अविस्मरणीय अशा भूमिका साकार केल्या आहेत. कलाक्षेत्राच बाळकडू त्यांना अगदी लहान वयात मिळालं होतं असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. अभिनेत्री निवेदिता जोशी ह्यांचे पती म्हणजेच अशोक सराफ हे अभिनेते आहेत, हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु फक्त पतीच नव्हे तर त्यांचे कुटुंबच चित्रपटसृष्टीशी निगडित आहेत. चला तर जाणून घेऊया.

निवेदिता जोशी ह्यांच्या आई विमल जोशी या त्या काळात आकाशवाणीवर कार्यरत होत्या. त्यांनी सादर केलेले कार्यक्रम हे मार्मिक आणि मनोरंजक असत. तसेच त्यांनी अनेक हिंदी नाटकांतूनही दिग्गज कलाकारांसोबत अभिनय केलेला होता. आकाशवाणीवरील त्यांची कारकीर्द ही तीन दशकांहून अधिक काळाची होती. निवेदिताजींचे वडील गजन जोशी हे सुद्धा कलाक्षेत्राशी निगडित होते. ते उत्तम अभिनेते म्हणून प्रसिद्ध होते. देखणं व्यक्तिमत्व आणि त्या जोडीला सुंदर अभिनय यांमुळे त्यांनी प्रत्येक भूमिकेतून स्वतःची अशी एक छाप पाडली होती. त्यामुळे निवेदिताजी आणि त्यांच्या मोठ्या बहीण मीनल यांच्यावर लहानपणापासून कलाक्षेत्राचे संस्कार झाले होतेच. पुढे या दोघींनीही या क्षेत्रात काम केलं. अर्थात, निवेदिताजींनी हे क्षेत्र कारकिर्दीसाठी निवडलं तर मीनलजींनी काही निवडक कलाकृतींतुन अभिनय केला आहे. ध्यासपर्व, कल का आदमी या कलाकृतींतून मीनलजी आपल्याला अभिनय करताना दिसल्या होत्या. पण त्याचं मूळ कार्यक्षेत्र हे शिक्षण क्षेत्र राहिलेलं आहे.

‘कौटिल्यीय अर्थशास्त्र’ या विषयावर त्यांनी पी.एच डी संपादन केली आहे. तसेच ‘फंक्शनल इंग्लिश’ हा कोर्स ही त्यांनी डिझाइन केल्याचं कळतं. या कोर्समार्फत विद्यार्थ्यांना अभिनव पद्धतीने इंग्रजी शिकवलं जातं. विकिपीडियावर असलेल्या माहितीनुसार या कोर्सला आंतरराष्ट्रीय मान्यता ही मिळालेली आहे. या व्यक्तिरिक्त मीनलजींना आपण मॅजेस्टिक गप्पांमध्ये निवेदिताजी आणि अशोकजींची मुलाखत घेतानाही भेटलो आहोतच.

आधी उल्लेख केल्याप्रमाणे अगदी लहान वयात निवेदिताजींनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. पुढे मराठी चित्रपट क्षेत्रातील एक आघाडीची नायिका म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. त्यांनी अभिनित केलेल्या चित्रपटांची यादी ही कितीतरी मोठी होईल. तरीही त्यातून काही निवडक चित्रपट नमूद करायचे म्हणजे नवरी मिळे नवऱ्याला, धूम धडाका, अशी ही बनवाबनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी,लपवा छपवी, देऊळ बंद हे होय. सोबतच त्या रंगभूमीवरही उत्तमोत्तम नाट्यकृतींचा भाग राहिल्या. मग्न तळ्याकाठी, वाहतो ही दुर्वांची जुडी, श्रीमंत, संगीत संशयकल्लोळ ही त्यातली काही आघाडीची उदाहरणं.

(फोटोत : डावीकडे निवेदिता जोशी ह्यांच्या मातोश्रीसह आणि बहीण मीनल जोशी परांजपे)

कलाक्षेत्रात मुशाफिरी करत असताना त्यांची आणि अशोकजींनी ओळख झाली. पुढे ओळखीचं रूपांतर प्रेमात आणि मग लग्नात झालं. या दोघांनी नेहमीच एकमेकांना सांभाळून घेत आपापली कारकीर्द बहरवली आहे. कलाक्षेत्रासोबतच निवेदिताजींनी आपली पाककलेची आवडही जोपासली. आज त्यांच्या युट्युब चॅनेल वरून आपल्याला त्यांनी तयार केलेल्या रेसिपीजचा दृश्य आस्वाद घेता येतो. हीच आवड त्यांच्या मुलातही आलेली दिसते. त्याचं नाव अनिकेत असं आहे. तो आज जागतिक कीर्तीचा शेफ म्हणून नावारूपास येतो आहे. यासोबतच निवेदिताजींनी स्वतःची एक साड्यांची नाममुद्रा तयार केली आहे. हंसगामिनी असं या नाममुद्रेचं नाव. या नाममुद्रेअंतर्गत अनेक उत्तमोत्तम प्रकारच्या दर्जेदार साड्यांचं कलेक्शन पाहता येतं. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो अग्गं बाई सुनबाई मालिकेत ज्या प्रमाणे त्या एक आघाडीच्या बिझनेसवुमन साकारतात, तशाच त्या खऱ्या आयुष्यातही आघाडीच्या बिझनेसवुमन आहेत.

(फोटोत : निवेदिता जोशी ह्यांचे वडील अभिनेते गजन जोशी)

तसेच त्यांच्या आयुष्याचा आढावा घेतल्यास त्यांनी किती विविध क्षेत्रात उत्तम काम केलेलं दिसून येतं. यापुढेही त्या विविध कलाकृतींतुन आणि विविध उपक्रमातून आपल्या समोर येत राहतील हे नक्की. त्यांच्या या प्रदीर्घ आणि विविधांगांनी नटलेल्या कारकिर्दीला आमच्या टीमचा मानाचा मुजरा आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

आजच्या या लेखातून त्यांच्याविषयी आपल्या वाचकांना थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न आपल्या टीमने केलेला आहे. आमच्या टीमचा हा प्रामाणिक प्रयत्न आपल्याला वाचक म्हणून आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपण नेहमीच आमच्या टीमला प्रोत्साहन देत असता. त्यातून नवनवीन लेख लिहिण्याचं प्रोत्साहन आम्हाला मिळत असतं. यापुढेही आपलं हे प्रोत्साहन आम्हाला मिळत राहील, हे नक्की. लोभ असावा. धन्यवाद !!!

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *