वायरल व्हिडियोज वरील लेख वाचणं हा तुमचा आनंद. हे लेख लिहिण्यासाठी अनेकविध वायरल व्हिडियोज बघणं, हा आमचा आनंद. यातूनच उत्तम उत्तम लेख बहरास येतात. पण अनेक वेळेस प्रश्न पडतो कि आता नवीन कशावर लिहायचं म्हणून. कारण प्रत्येक वायरल व्हिडियो काही शब्दांकन करण्याजोगा असतोच असा नाही आणि जरी तसा असला तरीही त्याविषयी लोकांना आज तेवढी आत्मीयता असेलच असं नाही. पण असे प्रसंग आले की त्यावर उतारा म्हणून एखादा तरी जुना पण एवरग्रीन म्हणावा असा वायरल व्हिडियो सापडतोच.
आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो आहे चार ते पाच वर्षे जुना. त्यावेळी या व्हिडियोची बातमी प्रथितयश वृत्तसंस्थानी दाखवल्याचं आपल्याला आठवत असेलच. हा व्हिडियो आहे दोन कब्बडी संघांचा आणि या संघातील खेळाडू आहेत काही आजीबाई. अगदी नऊवारी नेसलेल्या आजीबाई. एरवी मंगळागौर आणि काही समारंभांतून पारंपरिक खेळ खेळणाऱ्या.
आज त्यांना चक्क कबड्डीच्या खेळात बघून आनंद वाटतो. त्यासाठीचं मैदान असतं घरांसमोरील मोकळी जागा. त्यात एक पंच असतात. तर दुसऱ्या एक ताई कॅमेऱ्यामागून खेळाचं सूत्रसंचालन करत असतात. आजीबाईंना मार्गदर्शन करण्याचं कामही चालू असतं. मग कोणत्या काकूंनी समोरच्या टीमवर चालून जावं किंवा नाही हे त्या सांगत असतात. पण खरी गंमत आणि धमाल मस्ती चालत असते ती या खेळाडू आजींची. आपलं आयुष्य कष्टात गेलं. तेव्हा आराम नव्हता. पण या खेळाच्या निमित्ताने चार घटका मोकळेपणाने खेळता येतंय याचा आनंद त्यांच्या देहबोलीतून दिसून येत असतो. त्यात सर्व्हिस करायला गेल्यावर तर काय विचारू नका. खेळाची सवय नसल्याने अगदी गंमतीशीर पणे सर्व्हिस करणं सूरु असतं.
यात सगळ्यांत जास्त मजा येते ती शेवटी सर्व्हिस करायला आलेल्या आजींची. सुरुवातीला तर त्या यायलाच मागत नसतात. नको नकोच म्हणत असतात. पण बाकीच्यांचा आग्रह अगदी ठाम असतो. इतका, की प्रतिस्पर्धी संघातील एक आजीबाई येऊन आपल्या या मैत्रिणीला घेऊन जायला लागतात. कबड्डी खेळातील हा असा प्रसंग एखादाच असावा, जिथे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू दुसऱ्या संघातील खेळाडूला खेळ खेळण्यास प्रोत्साहन देत आहेत.
शेवटी कॅमेऱ्यामागून ही येतील त्या आजी अशी ग्वाही दिली जाते. आजी ही जातात. प्रयत्नही ही करतात. पण शेवटी प्रतिस्पर्धी संघाच्या मिठीत सापडतात. पण ही मिठी केवळ खेळा पूरती नसते. ही मिठी असते मैत्रीची. ही मिठी असते बऱ्याच काळानंतर स्वतः मैत्रिणींसोबत अनुभवलेल्या आनंदाची. व्हिडियो अगदी याच क्षणासोबत संपतो. एका अर्थाने या संपूर्ण व्हिडियोचं सार म्हणजे हा क्षण होय. कारण हा सामना असतोच मुळी आनंद मिळवण्यासाठी. त्यात हरणं जिंकणं यास दुय्यम महत्व असतं. तेच महत्वाचं. निदान या निमित्ताने तरी या आजीबाई एकत्र येऊ शकल्या आणि चार घटका आंनद मिळवू शकल्या हे छान आहे. या सामन्याची कल्पना ज्या व्यक्तीला किंवा व्यक्तींना आली असेल त्यांना मराठी गप्पाच्या टीमचा मानाचा मुजरा. तसेच सहभागी सगळ्या आजींना मनापासून नमस्कार !
हा व्हिडियो ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांना आवडला असणारच. सोबतच आपला हा लेख ही आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. मराठी गप्पाच्या नियमित वाचकांची आवड लक्षात घेऊन आपली टीम विषयांची निवड करत असते. लेखन करत असते. आपण जेव्हा हे विषय असलेले लेख शेअर करता तेव्हा आमच्या टीमला प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे लेख तर वाचत रहाच, सोबतच प्रोत्साहन ही देत राहा ही विनंती. कारण आपलं मनोरंजन हेच आमचे ध्येय आहे. लोभ असावा ! धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :