मराठी माणसांच्या मनोरंजनाच्या आवडी निवडीत नाटक, क्रिकेट यांचा हमखास समावेश होतो. यांच्यासोबत गेल्या काही काळापासून या यादीत मालिका या माध्यमाची ही भर पडली आहे. आभाळमाया, दामिनी या दर्जेदार मालिकांनी या सगळ्या प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात केली. पुढे वादळवाट, अवंतिका, चार दिवस सासूचे या मालिकांनी ही धुरा अतिशय समर्थपणे सांभाळली. हाच प्रवास पुढे चालवत आताच्या काळातील असंख्य मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यात नावं तर अनेक घेता येतील. पण प्रेक्षकांना सगळ्यांत जास्त आवडणाऱ्या मालिका कोणत्या हा प्रश्न मनाला कधी ना कधी स्पर्शून जातोच. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं BARC या संस्थेच्या वेबसाईटवर. ही संस्था मालिकांच्या टी.आर.पी. चे निरीक्षण करते आणि दर आठवड्याला आपले निकष प्रसिद्ध करत असते. यात २२ मे ते २९ मे या आठवड्याचे निकष पाहता आपल्याला प्रेक्षकांच्या मनाचा काहीसा अंदाज घेता येऊ शकेल. या निकषांवर आधारित मालिकांची नावे खाली देत आहोत.
५. स्वाभिमान शोध अस्तित्वाचा :
हि मालिका टीआरपीमध्ये सध्या क्रमांक ५ वर आहे. शिक्षणाचं महत्व ओळखलेली आणि त्यासाठी धडपड करणारी मुलगी म्हणजे पल्लवी. या व्यक्तिरेखेला मध्यवर्ती ठेवत ही मालिका आपला प्रवास करते आहे. या मध्यवर्ती भूमिकेत पूजा बिरारी हिने अप्रतिम अभिनय केलेला आहे. तिच्या सोबत आकाश कोठारी हा गुणी अभिनेता आपल्याला शंतनु या व्यक्तिरेखेत दिसून येतो. नेहमीप्रमाणे तो या भूमिकेतही छाप पाडून जातो. या सगळ्यांसोबतच प्रेक्षकांच्या लाडक्या आसावरी जोशी यासुद्धा आपल्याला आदिती या भूमिकेतून दिसतात.
४. सांग तू आहेस का :
एक वेगळ्या धाटणीची मालिका म्हणजे सांग तू आहेस ना. सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरी या तिघांनी यात मध्यवर्ती भूमिका साकार केलेल्या आहेत. सिद्धार्थ याने साकार केलेला स्वराज जसा लोकांना आवडतो आहे, तसाच सोनिया आणि शिवानी यांच्या भूमिकाही लोकप्रिय ठरत आहेत. सध्या हि मालिका क्रमांक ४ वर आहे.
३. फुलाला सुगंध मातीचा :
सध्या हि मालिका क्रमांक ३ वर आहे. शुभम आणि कीर्ती या जोडीला पसंत करणाऱ्या प्रेक्षकांची संख्या लक्षणीय आहे. तसेच या मालिकेतील कथानकाने घेतलेल्या रंजक वळणामुळे मालिकेत रंजकता निर्माण झाली आहे. सुप्रसिद्ध अभिनेता हर्षद अतकरी याने शुभम आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री समृद्धी केळकर हिने कीर्ती ही व्यक्तिरेखा साकार केली आहे. तसेच या सगळ्यांसोबत लक्षात राहतात त्या जिजी अक्का. लोकप्रिय अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्मात्या आदिती देशपांडे यांनी जिजी अक्का या ठसकेबाज व्यक्तिरेखेत रंग भरले आहेत.
२. रंग माझा वेगळा :
हर्षदा खानविलकर, आशुतोष गोखले, रेश्मा शिंदे आणि अनघा भगरे यांच्या मुख्य व्यक्तिरेखांनी नटलेली ही मालिका. आशुतोष आणि रेश्मा यांच्या अनुक्रमे कार्तिक आणि दीपा या भूमिका गाजल्या आहेत. तसेच कथानकात आलेल्या बदलामुळे श्वेता या व्यक्तिरेखेचं पितळ ही उघडं पडलं आहे. यात श्वेता ही व्यक्तिरेखा साकार केली आहे अनघा भगरे हिने आणि अर्थातच हर्षदा खानविलकर यांनी नेहमीप्रमाणे एकदम दमदार अशी भूमिका साकार केली आहे. ह्या मालिकेने टीआरपीमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे.
१. सुख म्हणजे नक्की काय असतं :
टीआरपी मध्ये सध्या बाजी मारली आहे ती सुख म्हणजे नक्की काय असतं ह्या मालिकेने. जयदीप आणि गौरीची ही कहाणी प्रेक्षकांच्या सगळ्यांत जास्त पसंतीस उतरली आहे असं दिसून येतं. या सुंदर जोडीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणावर तयार झालेला आपण सोशल मीडियावर पाहतोच आहोत. मंदार जाधव यांनी रंगवलेली जयदीप ही व्यक्तिरेखा आणि गिरीजा प्रभू या उदयोन्मुख अभिनेत्रीने रंगवलेली गौरी म्हणजे सगळ्यांच्या कौतुकाचा विषय. या मालिकेतील कथानकात फोडणी घालण्यासाठी शालिनी या भूमिकेत माधवी निमकर आहेतच. त्यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने या मालिकेतील खल व्यक्तिरेखा उत्तमरीतीने साकार केली आहे.
तर अशा या पाच मालिका ज्या २२ मे ते २९ मे या आठवड्यात पहिल्या पाचांत स्थान मिळवणाऱ्या मालिका होत. लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे या पाचही मालिका या एकाच वाहिनीवर बघायला मिळतात. ही वाहिनी म्हणजे ‘स्टार प्रवाह’ वाहिनी. गेल्या बऱ्याच काळापासून स्टार प्रवाह वाहिनी स्वतः आणि या वाहिनीच्या मालिका या पहिल्या पांचात नेहमीच असतात. अतिशय सातत्याने त्यांनी केलेली ही घोडदौड अगदी कौतुकास्पद. येत्या काळातही त्यांचा क्रम कोणत्या स्थानावर राहतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. आपली टीम वेळोवेळी याविषयीचे अपडेट्स आपल्याला लेखांतून देत राहील. तेव्हा आपल्या टीमने लिहिलेल्या लेखांना नियमित वाचत चला. केवळ मालिकाच नाहीत तर त्यातील कलाकारांविषयी सुद्धा आपली टीम सातत्याने लिहीत असते आणि लिहीत राहील. तेव्हा हे लेखही नक्की वाचा. लेख शेअर करत राहा आणि आम्हाला प्रोत्साहन देत राहा. आपल्या प्रोत्साहनामुळे विविध विषयांवर लेख लिहिण्यास आम्हाला स्फूर्ती येते. तेव्हा लोभ कायम असावा. धन्यवाद !!!