म्हणता म्हणता २०२० साल संपत सुद्धा आलं. या वर्षात फारसं काहीसं आनंदी झालंय, असे क्षण फारच कमी आले असतील. पण गेल्या काही काळात अनलॉक झाल्यानंतर अनेकांनी आपले पूर्वनियोजित साखरपुडे आणि लग्नं उरकून घेतले. त्यामुळे अनेकांनी या मंगलसोहळ्यांच्या निमित्ताने आनंदाचे क्षण अनुभवले. असेच काही आनंदाचे क्षण आपल्या लाडक्या सेलिब्रिटीजनी सुद्धा अनुभवले. चला तर पाहुयात कोणकोणते सेलिब्रिटीज आहेत, ज्यांनी या वर्षात लग्नगाठ बांधली आहे.
नेहा पेंडसे :
आरस्पानी सौंदर्य, देखणं व्यक्तिमत्व, तेवढाच देखणा अभिनय आणि यांचा एकत्र मेळ असलेली अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. मराठी, हिंदी, दक्षिण भारतातील सिनेसृष्टी, मालिका अशा विविध माध्यमातून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि प्रेक्षकपसंती मिळवली. अशी ही लोकप्रिय नेहा, या २०२० च्या जानेवारी महिन्यात लग्नबंधनात अडकली. तिचे पती म्हणजे शार्दूल सिंघ. ते पेशाने व्यावसायिक आहेत.
अर्चना निपाणकार :
सिंगिंग स्टार हा कार्यक्रम काही काळापूर्वी संपला. यातील काही कलाकारांनी त्यांच्या गाण्याने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेलं होतं. यातील एक अभिनेत्री गायिका म्हणजे अर्चना निपाणकार. तिने घेतलेलं गाण्याचं शिक्षण आणि तिची संगीत साधना तिच्या गोड स्वरांतून कळून येत होती. अशी ही सुप्रसिद्ध कलाकार या वर्षी विवाह बंधनात अडकली आहे. पार्थ रामनाथपुर यांच्याशी तिचा विवाह झालेला आहे. पार्थ यांना भटकंतीचा छंद आहे. तसेच फिटनेसकडेही त्यांचं विशेष लक्ष असतं. अशी ही मेड फॉर ईचअदर जोडी जुलै महिन्यात विवाह बंधनात अडकली आणि त्याआधी या वर्षाच्या सुरवातीला त्यांनी साखरपुडा केलेला होता.
शर्मिष्ठा राऊत :
बिग बॉस मराठी मधील एक बहुचर्चित नाव म्हणजे शर्मिष्ठा राऊत. तिने या वर्षी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे. काही सामायिक मित्र मैत्रिणींच्या मार्फत तिची ओळख तिच्या पतीशी म्हणजे तेजस देसाई यांच्याशी झाली. सुरुवातीला एकमेकांचे मित्र होण्याच्या उद्देशाने ते एकमेकांशी बोलले. हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मग त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात त्यांनी लग्नगाठ बांधली.
करण बेंद्रे :
गेल्या काही काळात लग्न झालेल्या सेलिब्रिटीज मध्ये अभिनेत्रींचा भरणा अधिक असला तरी त्यात एक अभिनेताही होता ज्याने आपल्या दशकभराहून अधिक काळ मैत्रीण असणाऱ्या निकिता नारकर सोबत लग्नगाठ बांधली. शॉर्ट फिल्म, सिनेमा, मालिका यांतून अभिनय करणारा करण हा एक उभारता कलाकार आहे. त्याची पत्नी ही नौदलात एच.आर. विभागात कार्यरत आहे. तसेच अनेक उत्तम कंपन्यांसाठी तिने काम केलेलं आहे. करण सारखीच तीही उत्तम कलाकार असून उत्तम कलारसिकही आहे. चित्रकला आणि संगीत हे तिचे दोन आवडते कलाप्रकार.
सई लोकूर रॉय :
ह्या वर्षी अजून एका बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीचे लग्न झाले, ती अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक आघाडीची नायिका. तिचं या वर्षी लग्न झालं. अगदी झट मंगनी पट ब्याह या पद्धतीने हे लग्न झालं. एका लग्न जुळवणाऱ्या वेबसाईतमार्फत तिची ओळख तिर्थदीप रॉय याच्याशी झाली. कामानिमित्त दक्षिण भारतात राहत असलेला तिर्थदीप या वेबसाईट द्वारे सईला भेटला. एकमेकांचे विचार जुळले. एकमेकांच्या घरी माहिती दिली गेली. एक दोनदा भेटही झाली आणि म्हणता म्हणता काहीच महिन्यात साखरपुडा आणि लग्न झालं. अनेक प्रथितयश माध्यमांनी या बहुचर्चित लग्नसोहळ्याचं वृत्तांकन केलं होतं.
तेजपाल वाघ :
सध्या तेजीत चालू असलेल्या आणि यापूर्वीही लोकप्रिय झालेल्या अनेक मालिकांच्या पाठी एक नाव खंबीरपणे उभं होतं. हे नाव म्हणजे तेजपाल वाघ या गुणी कलाकारांचं. अभिनय, लेखन, दिग्दर्शन या बहुविध पातळ्यांवर चमकदार कामगिरी करणारा तेजपाल वाघ म्हणजे मनोरंजन क्षेत्रातील एक हुकुमी एक्का. लागिरं झालं जी, कारभारी लय भारी या त्याच्या गाजलेल्या मालिका. असा हा कलाकार काही काळापूर्वी लग्नबंधनात अडकला. किरण घाडगे हिच्याशी त्याचा विवाह पार पडला. मोजक्या उपस्थितांच्या मांदियाळीत त्यांचा विवाह वाई येथे पार पडला होता. या प्रसंगी त्यांच्या विविध कालाकृतींमधले कलाकार उपस्थित होते.
शुभांगी सदावर्ते आणि आनंद ओक :
उत्तम अभिनेत्री आणि तेवढीच उत्तम गायिका म्हणजे शुभांगी सदावर्ते. संगीत देवबाभळी या नाटकातील तिच्या अभिनय आणि संगीत कौशल्याचं खूप कौतुक झालं. या संगीत नाटकाने जसं तिला प्रेक्षकांच्या हृदयात स्थान दिलं तसंच जीवनसखा ही दिला. या संगीत नाटकाचे संगीत संयोजक म्हणजे आनंद ओक. या नाकादरम्यान दोघांच्या मनाच्या तारा जुळल्या होत्याच. या अनलॉक च्या काळात या प्रेमभावनांना लग्नबंधांची किनार लाभली. आज दोघांनी एकत्र येऊन श्रीपाद फूड्स हा नवीन व्यावसायिक उपक्रम चालू केला आहे. या अन्वये आनंद ओक यांच्या मातोश्रींनी जतन करलेल्या अनेक पाककृती आणि पदार्थ ग्राहकांना चाखायला मिळतात. त्यांच्या या नवीन उपक्रमाचे खूप कौतुक झाले असून अनेक प्रथितयश वृत्तसंस्थानी यावर वार्तांकन केलेले आहे.
शाश्वती पिंपळीकर :
बालक पालक ह्या चित्रपटातून नावारूपाला आलेली अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर हिने सुद्धा वर्षाच्या शेवटच्या काही दिवसांमध्येच लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या आदल्या दिवशीच म्हणजे १६ डिसेंबरला मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तिचा साखरपुडा सोहळा पार पाडला. त्यानंतर १७ डिसेंबरला राजेंद्र करमरकर ह्याच्याशी तिचा विवाह संपन्न झाला. राजेंद्र हा व्यावसायिक फोटोग्राफर असून त्याने इंटिरियर डिझायनिंगचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. तसेच शाश्वती हिने बालक पालक चित्रपटाव्यतिरिक्त ‘मधू इथे आणि चंद्र’ ह्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. तसेच तिने शेजारी शेजारी पक्के शेजारी, सिंधू, चाहूल ह्या मालिकेत काम केलेले आहे.
हे तर झाले २०२० साली लग्न झालेले सेलिब्रिटीज. यात काही सेलिब्रिटीजनी पुढील वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोण आहेत ते हे ही हातासरशी पाहून घ्या.
सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर :
सिद्धार्थ आणि मिताली म्हणजे सध्याची सगळ्यात जास्त चर्चित जोडी. गेल्या वर्षी त्यांनी साखरपुडा केला होता. यावर्षी ते लग्नही करणार होते आणि करोनाची माशी शिंकली. त्यामुळे प्रेक्षकप्रिय जोडीने आपलं लग्न २०२१ साली करण्याचा निर्णय घेतला. नुकताच या जोडीचं केळवण त्यांच्या मित्रमंडळींनी केलं होतं त्यामुळे ही जोडी पुन्हा चर्चेत आली होती.
मानसी नाईक आणि परदीप खरेरा :
अभिनय आणि नृत्य यात पारंगत असणाऱ्या मानसी हिने नोव्हेंबर महिन्यात आपल्या साखरपुड्याचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते. परदीप हा आंतरराष्ट्रीय बॉक्सर आहे तसेच मॉडेल म्हणूनही कार्यरत आहे. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात मानसीने तिच्या आणि परदीप हिच्या रिलेशनशिपची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यामुळे त्यांचा झालेला साखरपुडा हा त्यांच्या चाहत्यांसाठी या वर्षी अजून एक सुखद धक्का होता. पण त्यात अजून भर पडली जेव्हा तिच्या लग्नाची तारीख जाहीर झाली होती. तिचं लग्न २०२१ च्या जानेवारी महिन्यात १८-१९ तारखेला होणार आहे. यात सुरवातीला मेहेंदी आणि संगीत समारंभ होईल आणि आग हळदी आणि लग्नाचा कार्यक्रम होइल.