मालिका विश्व म्हंटलं की त्यात कथानकात येणारे बदल हे अपरिहार्य असतात. त्यातूनच तर मालिकेतील रंजकता टिकून राहते. या कथानक बदलात काही वेळेस नवीन पात्र मालिकेत दाखल होतात आणि काही जुन्या व्यक्तिरेखा निरोप घेत असतात. मग ते अगदी काही काळासाठी का होईना. पण काही वेळेस इतर काही कारणांनी कलाकारांना एखादया मालिकेस निरोप द्यावा लागतो. त्यावेळी मग त्यांच्या व्यक्तीरेखेसाठी अर्थातच नवीन कलाकारांची निवड होते. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया या व्यक्तिरेखेसाठी रसिका सुनील आणि ईशा केसकर या दोघींच्या बाबतीचा अनुभव आपण घेतला आहेच. असाच काहीसं एका मालिकेच्या बाबतीत झालेलं दिसून येतं. माझा होशील ना या मालिकेत सध्या शर्मिला बिराजदर ही व्यक्तिरेखा साकार करणाऱ्या सुलेखा तळवलकर या दिसत नाहीयेत. त्यांनी मालिकेतून ब्रेक घेतल्याचं कळतंय.
या मागचं कारण तसं अस्पष्ट असलं तरी, त्या त्यांच्या इतर प्रोजेक्ट्स मध्ये व्यस्त असल्याने त्यांनी ब्रेक घेतल्याचं कळतं. सुलेखाजी नसल्यामुळे सध्या मग शर्मिला बिराजदार ही व्यक्तीरेखा एक परिचयाच्या अभिनेत्री साकार करताना दिसताहेत. या अभिनेत्रिचं नाव आहे, वर्षा घाटपांडे. माझा होशील ना मालिकेत सध्या सुलेखा तळवलकर ह्यांच्या जागी आता सईच्या आईच्या भूमिकेत वर्षा घाटपांडे दिसत आहेत. अनेकांना हा प्रश्न पडला होता कि नक्की सुलेखा तळवलकर ह्यांनी कोणत्या कारणामुळे हि मालिका सोडली. तर सुलेखाजी सध्या ‘सांग तू आहेस ना’ ह्या मालिकेत देखील अभिनय करत आहेत. सध्याच्या को’रोनाच्या काळात एकाच वेळी ह्या दोन्ही मालिकेत काम करणं त्यांच्यासाठी अडचणीचं ठरत होते. त्यामुळे मग त्यांनी माझा होशील ना हि मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
वर्षाजींना आपण प्रामुख्याने त्यांच्या विविध मालिकांतील कामांसाठी ओळखतो. त्यांनी आजपर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांतून अभिनय केलेला आहे. ग्रहण, अल्टीत पल्टी सुमडीत कल्टी, हे मन बावरे, वर्तुळ या त्यांनी अभिनित केलेल्या काही मालिकांची नावे. मराठी मालिकांप्रमाणेच त्यांनी हिंदी मालिकांतूनही अभिनय केलेला आहे. सावधान इंडिया या प्रसिद्ध मालिकेचा त्या भाग होत्या. सगळ्याच मालिकांतील त्यांच्या कामाचं कौतुक झालेलं दिसून येतं. त्यांनी मालिकांसोबतच सिनेमा आणि वेब सिरीज मधूनही अभिनय केलेला आहे.
कोकणची माणसं झो आंबट गोड ही त्यांची गाजलेली वेब सिरीज. तसेच त्यांनी शारदा, बंदिशाळा या सिनेमांतूनही अभिनय केलेला आहे. सिनेमा, मालिका, वेब सिरीज या माध्यमांसोबत त्यांनी पी.एन.जी. ज्वेलर्स यांच्या जाहिरातीतही काम केलं आहे. ही जाहिरात ज्या वर्षी प्रदर्शित झाली, त्या वर्षीची सर्वोत्तम जाहिरात म्हणून इंडियन सिने फिल्म फेस्टिवल २०२० मध्ये मान मिळाला होता. वर्षाजी कलाक्षेत्रात गेला बराच काळ कार्यरत आहेत. या काळात त्यांनी उत्तमोत्तम कलाकृतींतून आपल्या समोर विविध व्यक्तिरेखा साकार केलेली दिसून येतात. येत्या काळातही त्यांच्या अनुभवाचा वापर करत, त्या विविध व्यक्तिरेखा अगदी उत्तमपणे साकार करतील हे नक्की. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !! तसेच सुलेखा जी जरी या मालिकेत दिसल्या नाहीत तरी त्या इतर कलाकृतींतून आपल्या समोर येतच आहेत.
तसेच त्यांच्या युट्युब चॅनेल मार्फत विविध सेलिब्रिटीज च्या मुलाखती त्या घेत असतात. तिथेही त्यांची भेट होतेच. त्यामुळे येत्या काळातही सुलेखाजी विविध कलाकृतींतून आणि त्यांच्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून आपल्या सतत संपर्कात राहतील हे नक्की. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टिमकडून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा !! आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला आपल्या कमेंट्स मधून नक्की कळू द्या. तसेच आपण आपले लेख आठवणीने शेअर करताय ना. कारण आपलं ठरलंय. आपल्या टीमने लिहिलेले लेख वाचत राहा, लेख शेअर करत राहा, आनंद वाटत राहा. आपल्या पाठींब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद. लोभ असावा.