आपल्या आजूबाजुला आपण अनेक व्यक्ती अशा पाहतो ज्या कोणतीही भीडभाड न बाळगता आयुष्याचा आनंद घेत असतात. याचा अर्थ ती कशीही वागतात अस होत नाही. पण इतरांच्या मानाने ही माणसं जरा जास्त दबंग असलेली असतात. तसेच जीवनाचा आनंद घेताना तो पुरेपूर घ्यावा याकडे त्यांचा कल असतो. आज हे सगळं पुन्हा एकदा आठवलं कारण आपल्या टीमने आज एक व्हिडियो पाहिला. तो पाहून आपल्या टीमचं तर मनोरंजन झालंच सोबतच आपल्या वाचकांना याविषयी वाचायला आवडेल याची आपसूक खात्री पटली. चला तर मग वेळ न दवडता, या व्हिडियो विषयी जाणून घेऊयात.
हा व्हिडियो आहे एका शालेय शिक्षकांचा आणि त्यांनी केलेल्या डान्सचा. या शाळेत प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना सादर होणाऱ्या कार्यक्रमाचा भाग म्हणून हे गुरुजी डान्स करताना दिसतात. बरं त्यांचा लूक सुद्धा अगदी दबंग म्हणावा असाच असतो. डोळ्यावर गॉगल लावून अगदी आत्मविश्वासाने हे गुरुजी डान्स करताना दिसून येतात. त्यांच्या डान्सची खासियत म्हणजे ते करत असलेली डान्स स्टेप.
गाण्यातलं कोणतंही कडवं असू दे, एक हात उजव्या बाजूच्या कंबरेवर आणि दुसरा हात हवेत मिरवत आणि कंबर हलवत हलवत हे गुरुजी नाचत असतात. गाणं बदलतं, तसे त्यांचे सूर, ताल, लय बदलते, पण डान्स स्टेप एकच राहते. त्यात बदल झालाच तर एवढाच की हातवारे होणं आणि गुरुजींनी स्वतःची दिशा बदलून डान्स करणं. पण एक मात्र खरं की ते ज्या जोमाने ही स्टेप करत राहतात त्यामुळे प्रत्येक वेळी हशा पिकत असतो. त्यांच्या बाजूला खाली बसलेली लहान मुलं तर हसून हसून त्यांचा डान्स बघत असतात. त्यांचा आत्मविश्वास बघून, त्यांच्या समोर बसलेले प्रमुख अतिथी ही अवाक झालेले असतात. प्रत्येक वेळी जेव्हा, ‘अ-क्सीडेंट हो गया रब्बा रब्बा’ या ओळीच्या वेळी तर ही स्टेप करताना त्यांना जो उत्साह येतो त्याबद्दल तर विचारुच नका. त्यांच्या उत्साहामुळे हा दोन मिनिटांचा व्हिडियो ही अगदी लक्षात राहतो. व्हिडियोचा शेवटही अगदी थाटात करतात. ते स्वतःच गाणं गात असतात. त्यामुळे स्वतः गाणं थांबवून आणि टाळ्या वाजवत ते मेजापाशी जायला निघतात. अगदी राजाच्या थाटात. त्यांच्या या दबंगाईच हसू ही येतं आणि थोडंसं कौतुक ही वाटतं.
कौतुक यासाठी की इतर लोक काय म्हणतील याचा लवलेश त्यांच्या देहबोलीत दिसून येत नाही. जेव्हा अशी मानसिकता असते तेव्हाच आयुष्याचा आनंद घेता येतो अन्यथा स्वतःशीच चरफडत बसावं लागत. अर्थात त्यांनी ज्या प्रसंगी हा डान्स केला तो प्रसंग आणि जागा जर बदलता आली असती तर जास्त संयुक्तिक वाटलं असतं. असो. जे झालं ते झालं. पण त्यामुळे क्षण दोन क्षण का होईना मनोरंजन झालं हे नक्की. आपण हा व्हिडियो पाहिला असेल तर अगदी मनापासून हसला असाल. जर नसेल पाहिला तर नक्की पहा, आपल्याला आवडेल.
सोबतच आपल्या टीमने जो हा लेख लिहिला आहे तो ही आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा. त्यातून मिळणारं प्रोत्साहन आम्हाला नवनव्या विषयांवर लेखन करण्यास सतत ऊर्जा देत राहतं आणि यापुढे ही देत राहील. आपलं प्रोत्साहन हे नेहमी मिळत राहू दे, बस्स ! तर चला मंडळी निरोप घेण्याची वेळ झाली. पुढच्या वेळी अजून एका छान लेखासहित भेट होईलच. तोपर्यंत हा लेख मोठ्याप्रमाणात शेअर करत राहा. धन्यवाद !!
बघा व्हिडीओ :