Breaking News
Home / खेळ / ह्या तीन भारतीय गोलंदाजांनी घडवला इतिहास

ह्या तीन भारतीय गोलंदाजांनी घडवला इतिहास

कोलकाता, कराची, किंगस्टन… या तीन शहरांबाबत जर सध्या जर कुणाला साम्य विचारलं तर एका क्षणाचाही विलंब न करता उत्तर येईल(अर्थात याबाबत ज्ञान असेल तर)- या तिन्ही शहरातील क्रिकेट ग्राऊंडवर आपल्या भारतीय गोलंदाजांनी हॅट्ट्रिक काढल्या आहेत. खरतरं या तीनही ठिकाणाकडे पाहिलं तर असं लक्षात येईल की एकता कपूरला जसं सिरीयल हिट करण्यासाठी ‘K’ या अक्षराची गरज लागते, तसंच भारतीय गोलंदाजांची हॅट्ट्रिक होण्यासाठी ‘K’अक्षराची गरज लागते की काय असंच वाटु लागलंय. गमतीचा भाग, योगायोग सोडूया पण खरंच तीनही हॅट्ट्रिक आपापल्या जागी खास आहेत याबद्दल कुणाचंही दुमत नसेल. हरभजन सिंग, इरफान पठाण, आणि काल जसप्रीत बुमराह ह्या तिघांनी आत्तापर्यंत हॅट्ट्रिक घेतलीये. यापुढे निश्चितच वाढ होईल. सगळ्यात पहिली टेस्ट हॅट्ट्रिक बघायला आपल्याला ६९ वर्ष वाट पाहावी लागली. कोलकत्ता टेस्ट. २००१ साल. ऑस्ट्रेलिया २५२/४ अशा मजबूत स्थितीत होते. क्रीजवर पॉंटिग आणि स्टीव वॉ होते. डावातील बहात्तरावी व स्वतःची सोळावी ओवर टाकण्यासाठी आलेल्या हरभजनने आपला ‘जिगरी’ दोस्त रिकी पॉंटिगला एलबीडब्ल्यू आऊट केले. पुढच्याच बॉलला गिल क्रिस्टलासुध्दा त्याच पध्दतीने आऊट केले. पण या विकेटमध्ये हरभजनपेक्षा अंपायर श्याम बन्सल यांचा वाटा अधिक होता. कारण बॉलचा टप्पा लेग स्टंपच्या बाहेर तर पडलाच होता शिवाय चेंडू बॅटची कड घेऊन गिलक्रिस्टच्या पॅडला लागला होता. त्याकाळी डीआरएस असतं तर ही हॅट्ट्रिक झालीच नसती असो… गिलक्रिस्ट गेल्यानंतर शेन वॉर्न हॅट्ट्रिक बॉल खेळण्यासाठी स्ट्राईकवर आला. फिल्डरनी वॉर्नच्या भोवती गराडा घातलाय. हरभजनने टाकलेल्या फुलटॉसला लेग साईडला तटवण्यचा प्रयत्न करण्याच्या नादात रमेशच्या हातात कॅच देऊन बसला. अंपायर कॅचबद्दल समाधानी नव्हते. त्यांनी थर्ड अंपायर समीर बांदेकरांकडे दाद मागितली. सगळे सोपस्कार झाले. आऊटचा निर्णय झाला. इडनवर नुसता जल्लोष सुरू झाला होता. या बांदेकरांनी पैठणी नाही तर हॅट्ट्रिक दिली होती. हरभजन सिंग भारतीय क्रिकेटमधला हॅट्ट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला होता.

पुढची हॅट्ट्रिक साठी फार वाट पाहावी लागली नाही. पाच वर्ष.. आणि आली ती पाकिस्तानची आधीची राजधानी कराचीत. हिरवळ असलेल्या पीचवर चौथ्याच चेंडूवर सलमान बट्टने बाहेर जाणाऱ्या बॉलला बॅट लावण्याचा अयशस्वी प्रयत्न करत पहिल्या स्लिपला उभ्या असलेल्या राहुल द्रविडला कॅच देऊन माघारी परतला. चौथ्या बॉलवर युनुस खानला लेट स्विंग झालेल्या चेंडूवर पायचीत करत त्याने दुसरा धक्का दिला. त्या सिरीजमध्ये युनुस खान आणि मोहम्मद युसुफ ह्या दोघांनी आपल्याला जाम ठोकला होता.. आऊटच लवकर व्हायचे नाहीत. युनुसनंतर युसुफच आला होता.. पण त्याला सुध्दा इनस्विंगवर फसवत बोल्ड केला. पाकिस्तानने एकही रन न करता ३ विकेट गमावल्या होत्याच पण इकडे इरफानची हॅट्रिक झाली होती. भारताकडुन तसेच पहिल्याच ओवरला हॅट्रिक घेणारा दुसरा गोलंदाज ठरलाय.. आपला हा आनंद फार काळ टिकला नाही कारण ती मैच आपण ३४१ रन्सनी हरलो होतो. असो…

पुर्वी एखादा इरफान, झहीर, हरभजन वगैरे असं काहीतरी बाप करून जायचे. पण आता परिस्थिती बदललीये. आता कधीकधी आपलं बॉलिंग डिपार्टमेंट बॅटिंगपेक्ष सरस वाटतं. आज आपली बॉलिंग घातक वाटतेय. बेंच स्ट्रेंग्थसुध्दा चांगलीये. इशांत, शमी, भूवी, जडेजा, अश्विन, उमेश चांगलं करतातच आहेत. पण या सगळ्यांमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवतोय तो म्हणजे जसप्रीत बुमराह. टेस्ट डेब्यू पासुन तो भारतात टेस्ट खेळलाच नाही, त्यामुळे सगळ्या विकेट्स त्याच्या परदेशी भूमीवरच आहेत. इंग्लंड, आफ्रिका, ऑस्ट्रेलियाची मैदानं गाजवल्यावर विंडीज वाल्यांना नाचवणं त्याला फार काही कठीण नव्हतंच आणि ते त्यानी सिध्दही केलंय. वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या इनिंगला डॅरेन ब्राव्हो, ब्रुक्स, चेस या तिघांची विकेट घेऊन हॅट्रिक तर घेतलीच पण आत्तापर्यंत १२ विकेट्स सुध्दा घेतल्यात. सध्याचा बेस्ट बॉलर ही टर्म सातत्याने प्रुव्ह करतोय तो. कुठल्याही बैट्समनसाठी शतक, द्विशतक, त्रिशतक जवळचं असतं तसंच बॉलरला हॅट्रिक जवळची असते.. या तिन्ही हॅट्रिक प्रतिस्पर्धी संघाच्या पहिल्या डावात आल्या आहेत. प्रत्येक हॅट्रिकमध्ये ‘काहीतरी खास’ आहे त्यामुळे तुलना करणं निश्चित चुकीच ठरेल. आत्ता फक्त (८९ वर्षात) तीनच झाल्या आहेत. यामध्ये आणखीन वाढ होवो हीच शुभेच्छा..
– वरद सहस्रबुद्धे

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *