Breaking News
Home / माहिती / ह्या दोन राजघराण्यातील व्यक्तींनी बदलला भारतीय क्रिकेटचा इतिहास, अजूनही ह्यांच्या नावावर खेळवल्या जातात स्पर्धा

ह्या दोन राजघराण्यातील व्यक्तींनी बदलला भारतीय क्रिकेटचा इतिहास, अजूनही ह्यांच्या नावावर खेळवल्या जातात स्पर्धा

भारताला स्वातंत्र्य मिळत असताना अनेक संस्थानं, स्वतंत्र भारतीय संघराज्यात विलीन झाली. यातील एक संस्थान म्हणजे नवानगर. या संस्थानाचे वैशिष्ठ्य असे कि या संस्थानाने दोन नावाजलेले क्रिकेट खेळाडू आपल्याला दिले. त्यांच्या खेळाची छाप परदेशातील खेळाडूंवरहि पडली आणि त्यांच्या खेळाची तिथे प्रशंसा झाली. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर क्रिकेट या खेळाचा प्रसार भारतात झपाट्याने झाला. आज त्याची व्याप्ती किती वाढली आहे ते आपण पाहत आहोतच. या व्याप्ती वाढलेल्या खेळातील सर्वोच्च स्थान म्हणजे भारत देशासाठी खेळणं. पण त्याआधी प्रत्येक खेळाडूला अनेक स्पर्धांमधून स्वतःला सिद्ध करत राहावं लागतं. यातील दोन महत्वाच्या स्पर्धांना नवानगर संस्थानच्या राजघराण्यातील वर उल्लेखलेल्या दोन खेळाडूंची नावे दिली गेली आहेत. या स्पर्धा आजही स्वतःचं अस्तित्व टिकवून आहेत. आजच्या लेखाच्या माध्यमांतून या राजघराण्यातील या दोन्ही सन्माननीय व्यक्तींच्या आयुष्याचा धावता आढावा घेण्याचा प्रयत्न.

सर रणजितसिंहजी विभाजी जडेजा :


नवानगर संस्थांनाचे, महाराजा जाम साहेब म्हणून १९०७ ते १९३३ या काळात यांनी कारभार पाहिला. पण या काळापूर्वी त्यांनी परदेशात एक उत्तम क्रिकेटपटू म्हणून नावलौकिक कमावलेला होता. त्यांना शाळेत असताना क्रिकेट आणि टेनिस या खेळांची आवड होती. हळू हळू टेनिस कडे कल वळत होता. पण नियतीच्या मनात काही वेगळ असावं. त्यांचा कल क्रिकेटकडे वळला. सुरुवातीला महाविद्यालयीन स्तरावर खेळता खेळता त्यांनी इंग्लंडमधील कौंटी क्रिकेटही खेळण्यास सुरुवात केली. त्यात उत्तम कामगिरी बजावली. धावांचा पाउस पडेल अशी त्यांची आक्रमक शैली होती. त्याकाळी अशा शैलीकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं गेलं. पण मग मात्र त्यांच्या शैलीची चर्चा होऊ लागली. त्यांच्या लेग ग्लान्स या फटक्याची विशेष चर्चा होत असे. पुढे त्यांनी कसोटी क्रिकेटमध्येही आपलं नाव गाजवलं.

पुढे ते नवानगर संस्थानात आले आणि क्रिकेट थोडं दूर गेलं. पण त्यांच्या नावे असलेली एक स्पर्धा आजही भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवताना मानाची समजली जाते. सुज्ञ वाचकांनी ओळखलं असेलंच. रणजी हि ती स्पर्धा. या स्पर्धेची सुरुवात केली ती पटीयालाचे महाराज भूपिंदर सिंह यांनी केली. पुढे १९३५ साली त्यांनी सर रणजितसिंहजी विभाजी जडेजा यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेला रणजी हे नाव दिले गेले. ४ नोव्हेंबर १९३४ साली या स्पर्धेचा पहिला सामना खेळला चेपॉक स्टेडीयमवर खेळला गेला. या वर्षी हि मानाची स्पर्धा स्वतःचं ८७ व्या वर्षात पदार्पण करेल आणि येत्या तेरा वर्षात शतक.

कुमार श्री दुलीपसिंहजी :

रणजी क्रिकेट स्पर्धेसोबत अजून एक स्पर्धा अनेक वर्ष क्रिकेट खेळाडूंसाठी महत्वाची मानली गेली ती म्हणजे दुलीप ट्रॉफी किंवा दुलीप करंडक हि होय. या स्पर्धेला कुमार श्री दुलीपसिंहजी यांच्या नावाने सन्मानित करण्यात आलं ते त्यांच्या कसोटी आणि कौंटी क्रिकेटमधील योगदानामुळे. या स्पर्धेचा ढाचा हा रणजी स्पर्धेपेक्षा वेगळा. रणजी स्पर्धेत प्रत्येक राज्याचे अथवा शहरांचे संघ असतात. तर दुलीप करंडक स्पर्धेत पाच झोन केलेले आहेत. नॉर्थ, साउथ, ईस्ट, वेस्ट आणि सेंन्ट्रल असे. तसेच या स्पर्धेची सुरुवात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केलेली आहे.

सर रणजितसिंहजी विभाजी जडेजा हे दुलीपसिंहजी यांचे काका. आपल्या काकांप्रमाणेच दुलीपसिंह यांनी कौंटी आणि कसोटी अशा दोन्ही पातळ्यांवर उल्लेखनीय कामगिरी केलेली होती. त्यांच्या फलंदाजीचं कौतुक त्यावेळी दिग्गज क्रिकेटर्सनीही केलं होतं. विकीपीडीया वरील माहितीचा आधार घेतल्यास, त्यांनी ससेक्स या परगण्यासाठी म्हणजे कौंटीसाठी खेळताना एका दिवसातच तब्बल ३३३ धावांचा रतीब ओतला होता. यावरून त्यांच्या आक्रमक फलंदाजीचा अंदाज यावा. त्यांचा कसोटी क्रिकेटमधील एवरेज हा ५८.५ इतका होता.

पुढे क्रिकेटसोबतच त्यांनी राजनैतिक पातळीवरही भरीव काम केलेलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथील हाय कमिशनर हे पद त्यांनी भूषवलेले होते. या पदाचा त्यांचा अनुभव पाहता पुढे त्यांनी सौराष्ट्र राज्यातील महत्वाची पदे भूषवली.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.