आपल्या आयुष्यात कलेच अनन्यसाधारण महत्व आहे असं आपण सगळेच जण मानतो. पण अस का? हा प्रश्न विचारला तर सहसा दोन उत्तरं येतात. एक म्हणजे मनोरंजन आणि दुसरं म्हणजे स्वतःच्या मनातील भावना व्यक्त करता येण्यासाठी घेतलेला आधार होय. कलाकार असो वा चाहते असोत, दोघांना ही या दोन मूलभूत कारणांमुळे कालाक्षेत्र आणि विविध कला आपल्याश्या वाटतात हे नक्की ! यातील मनोरंजनाचा भाग नक्कीच आनंद देणारा असतो. वेळ उत्तम व्यतीत होतो.
पण त्याचवेळी ‘भावना व्यक्त करण्यासाठी’ म्हणून कलेचा वापर केला असता प्रेक्षकांना अनेकवेळा आपण अंतर्मुख व्हावं अस वाटू लागतं. त्यांना हे वाटणं हेच त्या त्या कलाकारांच्या सादरीकरणाला मिळालेली पोचपावती आहे असं आपण म्हणू शकतो. कारण मनोरंजन हे काही क्षणांत विस्मरणात जाऊ शकतं. पण जे सादरीकरण आपल्या मनाला साद घालत ते दीर्घकाळ लक्षात राहत. आज आपल्या टीमच्या बाबतीत ही असंच काहीसं घडलं. हे घडण्यास कारणीभूत ठरला हा व्हिडियो ! यातील सादरीकरण आपल्या मनाला भिडून जातं. बरं हे सादरीकरण करणारे कलाकार आपल्या समाजाचा एक महत्वपूर्ण भाग आहेत त्यामुळे अंतर्मुख होणं हा प्रकार अतिशय तीव्रतेने होतो. हे कलाकार म्हणजे आपले एक पोलीस दादा असतात.
ते आणि त्यांचे अन्य पोलीस सहकारी एके ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. हा प्रवास एका बस मधून होत असतो. या माहोलात हे दादा आपल्या समोर एक कविता सादर करून दाखवतात. ही कविता त्यांनी सादर केली असली तरी कवितेचा नायक हा एक पोलीस वडिलांचा मुलगा असतो. हे मुख्य पात्र पूर्ण कवितेच्या केंद्रस्थानी राहून त्यांच्याविषयी आपल्या भावना मांडत असतं. आता हीच कविता इतर कोणी सादर केली असती तरी आवडली असतीच. पण खुद्द एका पोलीस दादांनी ही सादर केल्याने ती आमच्या टीमच्या मनाला स्पर्शून गेली. बरं एरवी एखादी कविता वा गाणं ऐकून आपल्याला आनंद होतो. तर ही कविता त्या पलीकडे जाऊन आपल्याला अंतर्मुख करते. पोलीस दल आणि त्यांचं आयुष्य यांच्याविषयी थोडक्यात भाष्य करणारी अशी ही कविता आहे. त्यातून पोलीस दलाला आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबियांना भेडसावणाऱ्या प्रश्नांचा यात थोडक्यात आढावा घेतलेला आहे. याचं धृपद ऐकून ही यात असलेल्या एकूण विषयांची कल्पना यावी. ‘एकदा तरी पप्पा तुम्ही घरी या की सणाला’ अशा त्याच्या धृपदाच्या ओळी आहेत. आपण हा व्हिडियो बघितला किंवा यातील कविता ऐकली नसेल तरिही आपल्याला यातील करुण भाव कळून येतोच. आणि जे मांडलं गेलंय ते खरंच आहे.
आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या या सगळ्या पोलीस बांधव आणि भगिनींना आपण नेहमीच कामावर असलेलं पाहत असतो. इतरवेळी ही कामाला काळ वेळ नसतेच. पण कोणत्याही सणांच्या काळात तर यात भरच पडते. म्हणजे आपसूकच स्वतःच्या घराकडे पाठ करून ही मंडळी आपलं कर्तव्य निभावत असतात. आपल्या बाबतीत अस कधी झालं आणि आपल्या घरातील एखादी व्यक्ती कधी सणानिमित्त येऊ शकली नाही तर आपण फुरंगटून बसतो. पण पोलीस बांधवांच्या आणि भगिनींच्या बाबतीत तर हे प्रत्येक सणाला होत असत. त्यांनी काय करावं. पण तरीही ते आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून आपलं काम करत असतात. तसेच जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हाही हीच मंडळी आपल्या मागे उभी राहतात. अगदी दोन वर्षांपूर्वी आलेल्या करोना ने जवळपास सगळ्यांना घरी बसवलं होत. तो दणका इतका जबरदस्त होता की एका दिवसांत सगळे रस्ते आणि सगळ्या सार्वजनिक जागा सुनसान झाल्या होत्या. पण कोविड वॉरियर्स मात्र जिवाची बाजी लावून लढत होते आणि यांत पोलीस ही अगदी आघाडीवर होते. त्या काळात सगळंच अनिश्चित असतानाही ही मंडळी सगळी कायदा सुव्यवस्था उत्तम रहावी म्हणून झटत होती.
अनेक वेळा तर गाण्यांच्या माध्यमातून ही त्यांनी जनजागृती केली होती. आज पाहिलेल्या व्हिडियोच्या निमित्ताने या आठवणी सगळ्या पुन्हा ताज्या झाल्या. आमच्या टीमने पोलीस आणि त्यांनी वाचलेले जीव यांविषयी आमच्या टीमने वेळोवेळी लेख लिहिले आहेत. आजच्या या लेखातून पोलिसांच्या आणि खासकरून त्यांच्या कुटुंबियांच्या मनातील तळमळ आपल्या वाचकांपर्यंतही पोहोचावी म्हणून हा लेख लिहिला आहे. तसेच वर उल्लेख केलेला व्हिडियो ही आमच्या वाचकांना अनुभवता यावा म्हणून लेखाच्या शेवटी दिला आहे याची कृपया नोंद घ्यावी.
आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :