ट्राफिक कुणाला आवडतं लेका! पोरं कसली सुस्साट होऊन सुटतात राव. सिग्नल-बिग्नल बघायला येळ हाय का आपल्याला…, असं म्हणत आपल्या मायबाप सरकारनं नेमून दिलेल्या नियमांचा धुरळा करत ती निघतात. कुणी बुलेटवर कुणी बुकाटीवर कुणीतर या सगळ्या पलीकडं स्वार होऊन जात असतंयं. आई-बापाचा आशीर्वाद, असं मोठ्या अक्षरात लिहीतील खरी पण आईबापाकडं महिनाभर रडून गाड्या घ्यायला पैसे मागणारी पोरंही आपण पाहिलीयं. बरं तुम्ही असाल तुमच्या आई-बापाचं लाडकं, पण रस्त्यावरुन जाणाऱ्यांचं काय चूकलं हो… त्यांनाही जीव आहे (अर्थात तुम्हाला तुमच्या जीवाची पर्वा नसली तरी.)
या व्हीडिओतला आपला हीरो तर भारीच आहे. मोठ्ठा ट्राफिक लागला म्हणून त्यानं काय दोन पायानं गाडी मधून मधून बाहेर काढण्यासाठी कसरती केल्या नाही ना सिग्नल तोडला नाही. त्यानं तर पार अगदी जगावेगळीच कला दाखवलीयं. त्यानं केलेलं काम इतकं भारीयं की आत्ता हा पायंडा पडला तर आश्चर्य वाटायला नको.
रस्त्यावरची वर्दळीची वेळ… ट्राफिक काय काही मिनिटांवर जागचं हललं नव्हतं. मग काय करावं हा आपला पठ्ठ्या बाईकवर बसला व्हता. अन् मागून त्याच्या मित्रानं गाणं लावलं. “छम्मक छल्लो”वर हा पठ्ठ्या इतका भारी नाचला अन् सामाजिक संदेशही तितकाच महत्वाचा दिलायं. तुम्हाला आम्ही थेट सांगू ना की बाबांनो सिग्नल मोडू नका रे, तुम्ही ऐकणार का?, कोण ऐकेल. किती लोकं असलं काही सोशल मीडियावर बघतील शेअर करतील. म्हणून या पठ्ठ्यानं भन्नाट कल्पना शोधून काढलीयं. सिग्नल रेडचा ग्रीन होईपर्यंत आपला झक्कास डान्स सादर केला. त्यानंतर वरचा सिग्नल ग्रीन झाल्याचं दाखवलं. आपल्या बाईकवर बसलायं अन् निघूनही गेला. मग काय रेकॉर्ड झालेला व्हीडिओ इतका भारी व्हता की, सिग्नल तोडणारी पोरं स्वतःचं व्हीडिओ शेअर करू लागली. त्यांनाही कळून चुकलं असावं आपलं बी चूकतंयं गड्या. रस्त्यावर ट्राफिक सिग्नल आपल्यासाठीच असतोयं.. त्यांचं पालन करायलाच हवं.
बघा व्हिडीओ :