काळ बदलला त्यानुसार संवाद साधण्याची साधनं बदलली. त्यामुळे आपसूकच समाज प्रबोधन करण्याचे मार्गही बदलले. पण समाज प्रबोधनाचा सर्वोत्तम मार्ग आजही एकच – कीर्तन. प्रभूंचे नाम घेत घेत, दैनंदिन आयुष्यात असलेली उदाहरणं देता देता सामान्य जनांच्या मनाची कवाडं उघडणं म्हणजे हे कीर्तन. शहरात कीर्तनाचे प्रमाण अगदी नगण्य असले तरी आजही गावागावात, खेड्यापाड्यात आपल्याला कीर्तन अगदी मनोभावे होताना दिसते. आजही कीर्तनकार लांबवरचा प्रवास करून विविध ठिकाणी कीर्तन करत समाज प्रबोधन करण्याचे कार्य करत असतात. आज याच किर्तनकारांपैकी एक असलेल्या, अतिशय तरुण वयाच्या एका किर्तनकारांचा वायरल व्हिडियो आमच्या टीमने पाहिला. महाराजांचं वय ते केवळ, अगदी कोवळं. पण त्यांच्या जवळ असलेलं ज्ञान मात्र एखाद्या मोठ्या वयाच्या व्यक्तीस लाजवेल असं.
त्यांनी केलेल्या नारदीय कीर्तनाचा काही भाग म्हणजे हा वायरल व्हिडियो. या वायरल व्हिडियोत महाराज मंचकावर उभे असतात. सोबत देण्यासाठी वादक आपल्या वाद्यांसकट उपस्थित असतात. महाराज बोलायला सुरुवात करतात. स्पष्ट शब्दोच्चार, मुद्द्यांची थेट मांडणी आणि विचारांवर असलेली घट्ट पकड हे त्यांचे काही गुण आपल्याला पहिल्या काही क्षणांतच जाणवतात. महाराज आपल्याला भारतीय शिक्षण पद्धती आणि तिचा इतक्या शतकांचा झालेला प्रवास अगदी नेमकेपणाने समजावून सांगतात. यात इंग्रजांनी आपल्या शिक्षण पद्ध्तीचे जे अवमूल्यन केले त्याचेही अनेक दाखले ते देतात. तत्पूर्वी स्वामी विवेकानंदांनी केलेली शिक्षणाची व्याख्या ते उद्धृत करतात. यावरून त्यांचा लहान वयातील व्यासंग किती मोठा असावा हे लक्षात येतं. आजूबाजूला उपस्थित असणाऱ्या श्रोत्यांनाही त्यांचं कौतुक वाटत असतं. त्यांनी दिलेल्या उपमा, उदाहरणं यांना वेळोवेळी प्रतिसाद मिळत राहतो. त्यांच्या कीर्तनातून होणार नर्मविनोद जसा वातावरण हलकं फुलकं ठेवतो तसाच आपल्याला सद्य परिस्थितीची जाणीवही करून देत असतो. बदललेला काळ आणि त्यायोगे बदलेले शिक्षक आणि विद्यार्थी या विनोदावर सगळेच हसतात पण त्यातील सद्य परिस्थिती लक्षात राहतेच.
अगदी व्हिडियो संपल्यानंतरही. असे अनेक दाखले ते आपल्या या कीर्तनातून देतात आणि हा सहा मिनिटांचा व्हिडियो त्यामुळे ऐकत राहावा असं वाटत राहतं. एरव्ही असणाऱ्या वायरल व्हिडियो पेक्षाही जास्त वेळेचा व्हिडियो. पण महाराजांचं कीर्तन एवढं सुरेख की आपण हा व्हिडियो पुन्हा पुन्हा ऐकतो.
हा व्हिडियो पाहून आमची टीम एवढी प्रभावित झाली की महाराजांविषयी अजून काही माहिती मिळते का हे आमच्या टीमने पाहिलं. तेव्हा महाराजांचं नाव लक्ष्मिप्रसाद पटवारी असल्याचं लक्षात आलं. तसेच त्यांचं स्वतःचं एक युट्युब चॅनेल असल्याचं ही लक्षात आलं. इतर युट्युब चॅनेलवरही लक्ष्मिप्रसाद महाराज यांची विविध ठिकाणी केलेली कीर्तने अनुभवण्यास उपलब्ध आहेत. एका चॅनेल वरील व्हिडियोतून अनेक मान्यवरांनीही वेळोवेळी महाराजांचं कौतुक केल्याचं दिसून येतं. आमच्या टीमच्या सदस्यांनाही त्यांच्या विषयी आदर आहे. आमच्या संपूर्ण टिमकडून लक्ष्मिप्रसाद महाराज यांना मनापासून नमस्कार.
आपल्याला हा लेख भावल्यास, नक्की शेअर करा. तसेच आमच्या टीमने लिहिलेले अन्य लेखही नक्की वाचा बरं का. आपल्या वेळेसाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :