सोशल मीडिया आणि त्याचा वाढता परीघ म्हणजे उदयोन्मुख कलाकारांसाठी हक्काची व्यासपीठंच म्हणायला हवीत. या व्यासपीठांवरून अनेक गुणी कलाकार आजतागायत आपल्याला अनुभवता आले आहेत आणि आजही अनेक जणांची त्यात भर पडते आहे. याच सगळ्या उदयोन्मुख आणि उत्तम कलाकारांविषयी आपली टीम अगदी सातत्याने लिहीत असते आणि लिहीत राहील. याच मंदियाळीतील एक नाव म्हणजे श्रुती रिंगे. आजच्या लेखातून त्यांच्याविषयी थोडंसं.
श्रुतीजी या एक उत्तम नृत्यांगना आहेत आणि उदयोन्मुख युट्युबर आहेत. त्यांचं युट्युब चॅनेल सुरू झाल्यापासून केवळ सव्वा वर्षाच्या काळात त्यांच्या चॅनेलने १२ हजार सबस्क्राईबर्सचा टप्पा ओलांडला आहे. आजही ही घोडदौड तेवढ्याच वेगाने चालली आहे. यावरून त्या जे जे डान्स परफॉर्मन्स आपल्या भेटीस घेऊन येतात ते किती लोकप्रिय ठरताहेत याची एक कल्पना यावी. त्यांचा एक परफॉर्मन्स तर आपल्या सगळ्यांनी पाहिला असणारच. माधुरीजी दीक्षित यांच्या ‘मैं कोल्हापूर से आयी हुं’ या गाण्यावर त्यांनी काही काळापूर्वी परफॉर्मन्स दिला होता. या त्यांच्या परफॉर्मन्सला जवळपास १३ लाख लोकांनी पाहिलं आहे.
या व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा लावणीची सुरुवात जशी ठसक्यात व्हायला हवी तशाच पद्ध्तीने श्रुतीजी सुरुवात करताना दिसून येतात. सोबतच एक नजाकत ही दिसून येते. त्यांची ही नजाकत त्यांच्या डान्स स्टेप्स, त्यांच्या हस्तमुद्रा, त्यांच्या गिरक्या, त्यांचे ठुमके या सगळ्यांतून जाणवते. तसेच अजून एक गोष्ट जाणवते ती म्हणजे सहजता. त्यांचा हा डान्स परफॉर्मन्स तुम्ही पहिल्या क्षणापासून ते शेवटपर्यंत पहा. त्यात इतक्या सहजतेने त्या नाचताना दिसतात की खूप आनंद होतो. इंग्रजीत म्हणायचं झालं तर अगदी ग्रेसफुली डान्स परफॉर्मन्स करतात. अजून एक नमूद करावयाची गोष्ट म्हणजे या व्हिडियोतील प्रत्येक क्षणांत त्या आनंद घेत डान्स करत असल्याचं दिसतं. प्रत्येक स्टेपच्या वेळी एक खेळकर भाव त्यांच्या चेहऱ्यावर असलेला दिसून येतो. त्यामुळे हा डान्स पाहणारी व्यक्ती कितीही थकलेली असेल तर त्या व्यक्तीस ही प्रसन्न वाटावं. त्यांच्या इतरही परफॉर्मन्स मध्ये कुठेही कंटाळा, थकवा दिसून येत नाही. खरं तर त्यांच्या एका Q & A सेशन मध्ये त्यांनी डान्स परफॉर्मन्स करणं ही आवड त्या कशा जोपासतात हे सांगितलं होतं.
घर संसार सांभाळून पुन्हा डान्सची आवड जोपासणे म्हणजे वेळ आणि श्रम यांची पराकाष्ठाच. पण आवड असली की सवड मिळतेच. श्रुतीजी याचं उत्तम उदाहरण आहेत. या त्यांच्या प्रवासात त्यांच्या कुटुंबाचा ही पाठींबा आहेच. तसेच काही डान्स परफॉर्मन्स मध्ये समावेश ही असतो. कधी कधी, त्यांची चिमुकली स्वरा आपल्याला डान्स करताना दिसते तर कधी कधी त्यांचे अहो म्हणजे श्रेयस रिंगे हे सुदधा डान्स करताना दिसतात. त्यामुळे कुटुंब रंगलय नृत्यात असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. अर्थात याच श्रेय, श्रुती ताईचं असणार हे नक्की. सोबतच प्रेक्षकांमधील अनेक जणं त्यांचा डान्स परफॉर्मन्स बघून डान्स करण्यास प्रवृत्त होत असणार हे नक्की. त्यांच्या चॅनेलच्या वाढत्या सबस्क्राईबर्स संख्येवरून तसच चित्र सध्या दिसतंय. गेल्या सव्वा वर्षात त्यांच्या चॅनेलची संख्या झपाट्याने वाढली आहे. ती यापुढेही वाढत राहील हे नक्की. किंबहुना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आपल्या टीमच्या त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा आहेतच. खूप मोठ्या व्हा ताई, खूप नाव कमवा आणि आपली वाटचाल ही यशस्वी वाटचाल असू दे या सदिच्छा.
आपली टीम नेहमीच विविध वाचकप्रिय विषयांवर लिहीत असते. त्यातील एक म्हणजे उदयोन्मुख कलाकारांवरील लेख होय. त्यातीलच हे एक लेखपुष्प होते. आपल्याला आमच्या टीमचा हा प्रयत्न आवडला असणार असा विश्वास आहे. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून कळू द्या. या प्रतिक्रिया आम्हाला प्रोत्साहन देत असतात. त्यातूनच नवीन लेख लिहिण्याची ऊर्जा मिळते. तेव्हा आपलं हे प्रोत्साहन नेहमीप्रमाणे आमच्या टीमला मिळत राहू द्या. लवकरच नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य लेखही वाचा, शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :