नजीकच्या काळात आपण अनेक सेलिब्रिटीजना लग्न बंधनात अडकताना पाहिलं आहे. अनेक मराठी तारकांच्या लग्नाच्या आणि साखरपुड्यांच्या बातम्या तुम्ही मराठी गप्पावर सातत्याने वाचले असतीलच. नुकतीच सई लोकूर रॉय हिच्या लग्नाची बातमी हे त्याचं अगदी अलीकडंच उदाहरण. मराठी तारकांसोबत आता एका मराठी अभिनेत्यानेही लग्नगाठ बांधली आहे. करण बेंद्रे असं या अभिनेत्याचं नाव. आपण प्रेम पॉयझन पंगा या झीच्या मालिकेतून त्याला नायकाच्या भूमिकेत पाहिलेलं आहेच. तसेच मालिकांसोबत त्याने इतरही माध्यमांतून अभिनय केलेला आहे. मग ती शॉर्ट फिल्म असो, एखादा शॉर्ट व्हिडियो किंवा नाटक आणि एकांकिका. महाविद्यालयात असल्यापासून तो रंगमंचाशी निगडित आहे. अनेक एकांकिकांमधून त्याने अभिनय केलेला आहे.
त्याची निर्वासित ही एकांकिका खूपच प्रसिद्ध झाली होती. त्याच्या एकांकिकांना आणि त्याला अभिनेता म्हणून अनेक स्पर्धांमधून पारितोषिकही मिळाली आहेत. त्यात सवाई सारख्या लोकप्रिय एकांकिका स्पर्धांचा समावेश आहे. उत्तुंग २०१७ मध्ये त्याने लक्षवेधी अभिनेत्याचं पारितोषिक त्याने पटकावलं होतं. तसेच जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासोबत त्याने बलून पिंच ही शॉर्ट फिल्म केली होती. तसेच श्री राम समर्थ या समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनपटात त्याने रामदास स्वामी यांच्या तरुणपणीची भूमिका रेखाटली होती. असा हा अष्टपैलू अभिनेता, काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकला. त्याची जवळपास दशकभराची मैत्रीण असणाऱ्या निकिता सोबत त्याने लग्नगाठ बांधली आहे. निकिता ही नेव्ही मध्ये एच.आर. विभागात कार्यरत आहे. याआधीही तिने अनेक उत्तम कंपन्यांमधून काम केलेलं आहे. या कामाच्या व्यापातही तीने स्वतःच्या कलेबद्दलच्या आवडी आणि छंद जपले आहेत. ती स्वतः एक उत्तम कलाकार आहे. तिला संगीतात उत्तम गती असून, ती छान चित्रंही रेखाटते.
गेल्या दशकभरात या दोघांची प्रथमतः मैत्री आणि मग प्रेम फुलत गेलं आहे. त्यांच्या या प्रेमकथेत ज्यांनी ज्यांनी मदत केली आहे त्यांचे करणने सोशल मीडियाच्या माध्यमांतून आभार मानले आहेत. त्याच्या लग्नाची बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांकडून या दोघांवरही कौतुक, प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. या लग्नात त्याने घेतलेला ‘हो नाही करता, करता झालं आमचं लग्न, मी तर सदैव निकितामध्ये मग्न’ हा गंमतीशीर उखाणा लक्षवेधी ठरतो आहे. मेन विल बी मेन या गंमतीशीत शॉर्ट व्हिडियोमध्ये तो सुप्रसिद्ध अभिनेत्री रुचिरा जाधव सोबत झळकला होता. करणची लॉक डाऊन काळात एक वेब सिरीज प्रसिद्ध झाली होती, फूट फेअरी नावाने. तसेच त्याने अनन्या या नाटकातही महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारली आहे. नुकतंच महाराष्ट्रात नाटकांच्या प्रयोगांना मान्यता मिळाल्याने अनन्या हे नाटक पुन्हा रंगमंचावर दाखल होत आहे. यानिमित्ताने करण, ऋतुजा बागवे आणि अन्य कलाकारांचं दर्जेदार अभिनय प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे. तत्पुर्वी त्याच्या लग्नाच्या बातमीने त्याच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला आहे.
या आनंदात मराठी गप्पाची टीम ही सहभागी आहे आणि त्याच्या आणि निकीताच्या पुढील वाटचालीस आमच्या टीमकडून मनापासून शुभेच्छा आहेत. तसेच त्याच्या यशस्वी अभिनय कारकिर्दीसाठीही मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा ! आपण हा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद ! वर अनन्या नाटकाचा उल्लेख आपण वाचला असेल. या नाटकातील मुख्य अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि अनघा अतुल भगरे यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे लेख मराठी गप्पाच्या टीमने लिहिले आहेत. आपल्याला ते लेखही वाचायचे असल्यास आपण वर दिलेल्या सर्च ऑप्शनचा वापर करू शकता. वर दिलेल्या सर्च ऑप्शन मध्ये जाऊन ‘अनन्या’ असं लिहून सर्च केल्यास आपल्याला ते लेख उपलब्ध होतील. मराठी गप्पाचे नियमित वाचक असल्याबद्दल धन्यवाद !
(Author : Vighnesh Khale)