Breaking News
Home / मराठी तडका / ह्या मराठी अभिनेत्रींचा अभिनयाव्यतिरिक्त आहे स्वतःचा वेगळा बिजनेस, कमावतात लाखों रुपये

ह्या मराठी अभिनेत्रींचा अभिनयाव्यतिरिक्त आहे स्वतःचा वेगळा बिजनेस, कमावतात लाखों रुपये

यंदाची दिवाळी हि करोनाच्या काळ्या छायेत असली तरीही या सणानिमित्त घरोघरी जेव्हा दिवे लागण होईल, आकाश कंदिलांनी घरं नटतील, तेव्हा आपल्या मनात प्रसन्नतेचा प्रकाश पुन्हा एकदा जागवला जाईल हे नक्की. त्यात दिवाळी या सणाचं महत्व असं कि याचा प्रत्येक दिवस काही ना काही विशेष महत्व सांगणारा. खासकरून व्यापारी वर्गासाठी तर या सणाचं खूप महत्व. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा अशा सणांमुळे व्यापारी वर्गाचं या सणाकडे विशेष लक्ष असतं. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रत्येक व्यापारी आपल्या व्यवसायासाठी नवीन चोपडी पूजन करतात. येणारं नवीन वर्ष आपल्याला समृद्ध करणारं असू दे अशी मागणी देवी लक्ष्मीकडे मागतात. आपल्या मनोरंजन क्षेत्रात अशी अनेक कलाकार मंडळी आहेत जे इतरही क्षेत्रांमध्ये सक्रीय आहेत. त्यांचे स्वतःचे व्यवसाय, उद्योग आहेत. आज या लेखाच्या निमित्ताने आपण अशा मराठी अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी स्वतःचे ब्रँड्स तयार केले आहेत. काही नवीन आहेत तर यातल्या काही जणींनी काही वर्षांपूर्वीच या व्यवसायांमध्ये प्रवेश केला आहे.

निवेदिता सराफ :

निवेदिताजी सराफ यांना आपण अनेक सुप्रसिद्ध सिनेमे, नाटक, मालिका यांतील अभिनयासाठी ओळखतो. त्यांची सध्या सुरु असलेली मालिका म्हणजे ‘अग्गं बाई सासूबाई’. यातील त्यांच्या सोशिक भूमिकेचं जसं कौतुक झालं तसचं त्यांनी करोना झाल्यानंतर स्वतःला ज्या गतीने सावरलं त्याचंही त्यांच्या चाहत्यांना कौतुक आहेच. अशा या निवेदिताजी यांचा साड्यांच्या व्यवसाय आहे. त्यांच्या या ब्रँडचे नाव आहे, ‘हंसगामिनी’.

या नाममुद्रेअंतर्गत विविध प्रकारच्या साड्या त्या स्त्रियांच्या भेटीस आणत असतात. त्यांनी ‘हंसगामिनी’ची अनेक एग्जीबिशन्स केली आहेत. गेली काही वर्षे हा व्यवसाय त्या यशस्वी रीतीने चालवताहेत. पण त्यांच्या या व्यवसायाची सुरुवात कशी झाली हे वाचून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल आणि बरं वाटेल. एकदा भारतात एके ठिकाणी प्रचंड पुर आला होता. त्या भागात साड्यांचा व्यवसायाची परंपरा आहे, त्यामुळे अनेक कारागिरांच या पुरात नुकसान होत होतं. निवेदिताजींना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी या साड्या ना नफा ना तोटा या तत्वावर विकण्यास त्या कारागिरांना मदत केली. तो काळ ओसरला पण आपण हा व्यवसाय म्हणून केला तर अशी कल्पना त्यांच्या मनात आली. मग त्यांनी स्वतः या विषयावर अभ्यास करायला सुरुवात केली. सोबत त्यांची एक घनिष्ठ मैत्रीण होती. या दोघींनी साड्या कशा बनतात इथपासून ते त्यांची विक्री कशी करता येईल याची माहिती घेतली आणि ‘हंसगामिनी’ जन्माला आली. आज कित्येक वर्षानंतर साड्यांची नाममुद्रा फारच प्रसिद्ध झाली आहे. निवेदिताजींच्या ‘हंसगामिनी’च्या या प्रतिष्ठित ब्रँडला पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा !

प्रिया बापट :

मराठी मनोरंजन विश्वातलं विश्वासाचं नाव म्हणजे प्रिया बापट. सिनेमा, नाटक, मालिका, वेबसिरीज असं कोणतही माध्यम असो प्रिया बापट आपल्याला हमखास उत्तम अभिनय करताना दिसते. तिच्या अनेक भूमिका या लोकप्रिय झाल्या आहेत. तर अशी हि गुणी अभिनेत्री एका व्यवसायाची मालकहि आहे. तिने स्वतःची ‘सावेंची (Sawenchi)’ असं नाव असलेला साड्यांचा ब्रँड सुरु केला आहे. यात तिची व्यवसाय भागीदार आहे तिची बहिण श्वेता बापट. श्वेता बापट याही मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असून सेलिब्रिटी स्टायलीस्ट आहेत. या दोघांच्या हि या व्यवसाया अंतर्गत अनेक उत्तमोत्तम साड्या पाहायला मिळतात. या आपल्या नवीन व्यवसायाच्या निमित्ताने साडी घडवणाऱ्या हातांनाही रोजगार आणि या कारागिरांच अर्थाजन होतं हे महत्वाचं आहे असं एका प्रथितयश वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत प्रिया म्हणते. तिच्या या नवीन व्यवसायाचं अनेक प्रथितयश वृत्तपत्रातून कौतुक झालं आहे. प्रिया आणि श्वेता या दोघींच्या या नवीन व्यवसायासाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !

सई ताम्हणकर :

साड्यांचा विषय निघावा आणि नव्याने सुरु झालेल्या एका ब्रँडचं यात नाव न यावं तरच नवल. या कंपनीचं नाव आहे ‘द सारी स्टोरी’ आणि याची मालक आहे आपल्या सगळ्यांची लाडकी सई ताम्हणकर. या गेल्या दसऱ्यानिमित्त सईने या ब्रँडची घोषणा तिच्या सोशल मिडिया पेज वरून केली. सोबत या ब्रँडच्या नावे वेगळ असं सोशल मिडिया अकाउंटहि सुरु करण्यात आलंय. दसऱ्याच्या काही दिवस आधी पासून सईने ती काही तरी नवीन गोष्ट भेटीस घेऊन येणार आहे याची कल्पना आपल्या सोशल मिडियातर्फे दिलीच होती. या तिच्या नवीन ब्रँडच्या निमित्ताने अनपेक्षित पण एक सुखद धक्का तिच्या चाहत्यांना बसला. अनेक चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलंच, सोबत अनेक कलाकारांनी आणि सेलिब्रिटीजनी तिच्या या व्यवसायानिमित्त तिला शुभेच्छा दिल्या. यात मराठी मनोरंजन जगतातले आघाडीचे कलाकार होते तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातले आघाडीचे कलाकारही होते.

सध्या ‘द सारी स्टोरी’ हा स्थिरस्थावर होतो आहे आणि ज्यांनी ज्यांनी साड्या विकत घेतल्या आहेत त्यांच्या कडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे आणि कौतुक होतं आहे. सई आणि तिची मैत्रीण ‘श्रुती भोसले’ ह्यांनी मिळून ‘द सारी स्टोरी’ची सुरुवात केली आहे. येत्या काळात त्यांचा हा व्यवसाय एक मोठा ब्रँड म्हणून पुढे येईल हे नक्की. या कोऱ्याकरकरीत साडीसारख्या नवीन व्यवसायासाठी सईला मराठी गप्पाच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा !

 

तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे :

सख्ख्या मैत्रिणी एकत्र आल्या कि फार धमाल करतात हे आपण आपल्या जीवनात नेहमीच पाहतो. अनेक वेळेस त्या स्वतःची एखादी कंपनीही सुरु करतात हेही आपल्या कानावर पडत असेलच. अशीच एक सख्ख्या मैत्रिणींची जोडी आपल्याला परिचित आहे ते त्यांच्या कपड्यांच्या ब्रँडमुळे. तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे असं ह्या सख्ख्या मैत्रीणीचं नाव आणि त्यांच्या ब्रँडचे नाव आहे ‘तेजाज्ञा’.

काही वर्षांपूर्वी या दोघींनी एकत्र येत या व्यवसायाची सुरुवात केली. त्यांच्या साड्यांचं आणि इतर कपड्यांचं कलेक्शन उत्तम आहेच. सोबत या लॉकडाऊनच्या काळात त्यांनी उत्तम असे मास्कही विक्रीस उपलब्ध करून दिले होते. त्या काही ठराविक काळानंतर विविध असे फॅशनेबल आणि ट्रेंडी कपडे तेजाज्ञाच्या ग्राहकांसाठी घेऊन येत असतात. तेजाज्ञाचे अनेक ठिकाणी अगदी परदेशातही एग्जीबिशन्सहि झाले आहेत. येत्या काळात एक मोठा ब्रँड होऊ घातलेल्या व्यवसायासाठी मराठी गप्पाच्या टीम कडून तेजाज्ञाच्या टीमला खूप खूप शुभेच्छा !

सई लोकूर :

सध्या अनेक मराठी तारका आणि त्यांचे साखरपुडे आणि लग्न हा कौतुकाचा आणि बातम्यांचा विषय झाला आहे. या बातम्यांमध्ये एक नाव विशेष करून आघाडीवर आहे ते म्हणजे बिग बॉस फेम सई लोकूर. सईने बिग बॉसचे पर्व गाजवले. प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अशी हि प्रेक्षकांची लाडकी सई एका व्यवसायाची मालक आहे. तिच्या या ब्रँडचं नाव आहे, ‘सांझ बाय सई’. या ब्रँडअंतर्गत दागिने तयार केले जातात. या दागिन्यांच वैशिष्ठ्य असं कि हे दागिने तयार करताना कपडे, ताग, लाकूड यांचाही वापर केला जातो असं त्यांच्या सोशल मिडिया पेजवरून कळतं. या वैविध्यपूर्ण वस्तूंच्या वापरासोबतच वैविध्यपूर्ण डिझाईनचे दागिने पाहायला मिळतात. सईच्या या व्यवसायासाठी तिला मराठी गप्पाच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा !

अपूर्वा नेमळेकर :

अण्णा म्हंटलं कि शेवंता असं नाव आपसूकच आपल्या तोंडातून बाहेर पडत. या दोन्ही व्यक्तिरेखांनी महाराष्ट्रातील प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या व्यक्तिरेखा इतक्या प्रसिद्ध झाल्या कि कोकणातल्या ‘रात्रीस खेळ चाले’ च्या सेट वर अनेक चाहते भेट देत असत आणि मालिकेतील कलाकारांना भेटत असतं. यातील शेवंता हि भूमिका जिने लोकप्रिय केली ती म्हणजे अपूर्वा नेमळेकर. बोलके डोळे, सुंदर व्यक्तिमत्व आणि तेवढाच सुंदर अभिनय यांच्या जोरावर अपूर्वाने हि भूमिका प्रसिद्ध केली. तिने याधीही अनेक मालिका आणि सिनेमांतून अभिनय केलेला आहे. तसेच तीने स्वतःचा व्यवसायहि सुरु केला आहे. अपूर्वा कलेक्शन असं तिच्या ब्रँडचं नाव. या कंपनीअंतर्गत दागिने बनवले जातात. त्यांचं डिझाईन स्वतः अपूर्वा करते. गेली काही वर्षे तिने हा व्यवसाय समर्थपणे चालवला आहे. गेल्या वर्षी संस्कृती बालगुडे आणि सोनाली कुलकर्णी यांनीही अपूर्वाने तयार केलेल्या दागिने परिधान केले होते. अपूर्वाच्या या व्यवसायासाठी तिला मराठी गप्पाच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा !

क्रांती रेडकर :

अभिनय, नृत्य आणि दिग्दर्शन अशा कलेच्या विविध प्रांतात अगदी उत्तमरीतीने काम केलेली अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर. त्यांचं कोंबडी पळाली हे गाणं आपल्याला आजही आठवत असेल. त्यांनी या गाण्यावर जसं उत्तम नृत्य केलं तसाच उत्तम अभिनयही जत्रा या सिनेमात केला. तसेच शिक्षणाच्या आईचा घो मधील त्यांची समंजस भूमिकाही प्रेक्षकांनी वाखाणली. तसेच त्या काही प्रसिद्ध अभिनेत्रींची उत्तम नक्कल हि करतात. मध्यंतरी त्यांनी दिग्दर्शनातही आपलं पाउल टाकलं आणि उत्तम कलाकृती निर्माण केली.

अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीने स्वतःचे दोन नवीन व्यवसायहि सुरु केले आहेत. पहिला व्यवसाय आहे पारंपारिक आणि पाश्चिमात्य कपड्यांचा. त्याचं नाव आहे, झीया झ्यादा. तर दुसरा व्यवसाय आहे स्त्रियांच्या दागिन्यांचा. त्याचं नाव क्राका. या दोन्ही व्यवसायातून उत्तमोत्तम कलेक्शन खरेदीदारांसमोर मांडलं गेलंय. सोनाली कुलकर्णी यांनीही काही दिवसांपूर्वी क्राका चे दागिने परिधान करून फोटोशूट केलं होतं. कलाक्षेत्र, लहान मुली, घर आणि दोन व्यवसाय असं सगळं समर्थपणे सांभाळणाऱ्या क्रांती यांना मराठी गप्पाच्या टीमकडून येत्या काळातील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.