Breaking News
Home / मराठी तडका / ह्या मराठी अभिनेत्रींनी आपल्या प्रियकरालाच बनवले आयुष्याचा जोडीदार, ७ वी जोडी नक्की बघा

ह्या मराठी अभिनेत्रींनी आपल्या प्रियकरालाच बनवले आयुष्याचा जोडीदार, ७ वी जोडी नक्की बघा

प्रिया मराठे
प्रिया यांना आपण ओळखतो ते मराठी, हिंदी मालिकांतील नायिका – खलनायिकि भूमिकांसाठी. नुकत्याच संपन्न झालेल्या “स्वराज्य रक्षक संभाजी” मालिकेतही त्यांनी छोटी पण महत्वपूर्ण भूमिका बजवली होती. या मालिकेत त्यांच्या पतीनेही म्हणजे शंतनू मोघे यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांची अतिशय महत्वाची भूमिका बजावली होती. शंतनू यांनी स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेतही शहाजी राजेंची महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या दोघांचाही प्रेम विवाह आहे. त्याचा किस्साही रंजक आहे. करियरच्या सुरुवातीला काम करताना प्रिया आपल्या मैत्रिणीसोबत पेइंग गेस्ट म्हणून रहात होत्या. ती मैत्रीण आणि शंतनू हे एका मालिकेत एकत्र काम करत होते. शुटींग उशिराचं असेल तर शंतनू त्या मैत्रिणीला घरी सोडत. त्यावेळी शंतनू यांनी प्रिया यांना पाहिलं होतं.

त्या मैत्रिणीकडून प्रिया यांचा मोबाईल नंबरही मिळवला होता. पुढे दोघांमध्ये बोलणं सुरु झालं. मैत्री झाली, ती वाढत गेली. आणि मग यथासांग लग्न झालं. आज हि दोघेही अभिनयाच्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल तर करत आहेतच, सोबतच त्यांनी स्वतःचं एक कॅफे पण सुरु केला आहे. येत्या काळात, अभिनय आणि व्यवसाय या दोन्ही कामांत त्यांना यश मिळत राहो याच टीम मराठी गप्पाकडून शुभेच्छा !

सुखदा खांडकेकर
सुखदा खांडकेकर यांना आपण ओळखतो ते मालिका, सिनेमा यांतील भूमिकांमुळे. बाजीराव मस्तानी हा त्यांचा गाजलेला सिनेमा. तसेच त्या उत्तम नृत्यांगना म्हणूनही प्रसिद्ध आहेतच. सुखदा यांचा प्रेमविवाह झाला आहे तो अभिजित खांडकेकर यांच्याशी. सध्याच्या आघाडीच्या कलाकारांमध्ये अभिजित येतात हे आपल्याला माहिती आहेच. हे दोघेही नाशिकचे. तसे ते पूर्वी एकमेकांना ओळखत नव्हते. पण अभिजित मुंबईला येऊन माझिया प्रियाला प्रीत कळेना हि मालिका करत होते. ती प्रसिद्धही होत गेली. एक नाशिककर म्हणून सुखदा यांना हि बाब चांगली वाटली आणि अभिजित यांचं अभिनंदन करावसं वाटलं. त्यांनी तसं एका सोशल मिडिया मेसेज मधून अभिजित यांना कळवलं. पुढे त्यांच्यात गप्पा वाढत गेल्या. मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

अभिजित यांच्या मनाने घेतलं होतं कि सुखदा यांच्याशीच लग्न करायचं. त्यांनी तशी मागणी घातली. सुखदा यांच्याकडून होकार आला. मग घरून होकार आल्यावर लग्न झालं. अभिजित सध्या “माझ्या नवऱ्याची बायको” या मालिकेत व्यस्त आहेत. तर सुखदा यांचेही काही प्रोजेक्ट येत्या काळात प्रेक्षकांसमोर येतील. त्यांच्या काही दिवसांपूर्वीच्या सोशल मिडिया पोस्ट मधून तसं दिसतंय. या जोडीच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा !

खुशबू तावडे
खुशबू तावडे हिला आपण ओळखतो ते मराठी हिंदी मालिकांसाठी. त्यात एक मोहोर अबोल, तू भेटशील नव्याने, पारिजात, तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकांचा समावेश होतो. सांजबहर या मालिकेतही ती होती. या मालिकेत तिच्या पतीनेही काम केलं आहे. त्याचं नाव आपल्याला माहिती आहेच. त्याचं नाव आहे संग्राम साळवी. संग्राम यालाही आपण उत्तम अभिनेता म्हणून ओळखतो. देवयानी हि त्याची सगळ्यात लोकप्रिय ठरलेली मालिका. या दोघांची ओळख झाली कारण त्यांच्या मालिकांचे सेट्स एकमेकांच्या बाजूला होते. पुढे त्यांनी एका मालिकेत एकत्र कामही केलं. याचदम्यान त्यांच्या ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मग प्रेमात झालं.

पुढे या दोघांनी लग्नही केलं. त्या आधी त्यांनी साखरपुडा केला तो एक वेगळा विचार करून. हा विचार आला होता खुशबू यांच्या मनात. एका गतिमंद मुलांसाठीच्या अनाथ आश्रमात साखरपुडा करावा आणि त्यांना मदतही करावी असा तो विचार होता. संग्राम आणि दोघांच्या घरच्यांनीही होकार दिला आणि असा आगळा वेगळा साखरपुडा संपन्न झाला. आज अभिनयासोबतच दोघांनी स्वतःचं असं एक कॅफे उघडलं आहे. या दोघांनाही येत्या काळात अभिनय आणि व्यवसाय अशा दोन्ही क्षेत्रांत यश मिळो हि मराठी गप्पाच्या टीम कडून शुभेच्छा !

सखी गोखले
सखी गोखले हिला आपण ओळखतो ते दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेसाठी. त्यातील मित्रांचा पूर्ण ग्रुप महाराष्ट्रातील तरुणाईचा गळ्यातील ताईत बनला होता. याच मालिकेत सखीचा नवरा म्हणजे सुव्रत जोशी हा सुद्धा होता. या मालिकेआधी ते एकमेकांना ओळखत असतं. पण त्यांच्यातील ओळख वाढली ती या मालिकेदरम्यान. पण काही लव स्टोरीजमध्ये असते तशी भांडणाची किनार या लव स्टोरीला आहे. मालिकेच्या सेटवर त्यांच्यात थोडे थोडे वाद होतं. पण हळू हळू ते वाद कमी होऊन त्यांची उत्तम मैत्री झाली, प्रेमही झालं. आणि मग लग्न.

या दोघांनीहि अमर फोटो स्टुडियो हे नाटकही एकत्र केलं आहे. तसेच या लॉकडाऊनच्या काळात आठशे खिडक्या नऊशे दारं या विनोदी मालिकेतूनही ते एकत्र अभिनय करताना दिसले होते. येत्या काळातही त्यांचे विविध प्रोजेक्ट्स प्रेक्षकांच्या भेटीस येतीलच. येत्या काळातील त्यांच्या वाटचालीसाठी त्यांना मराठी गप्पाच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा!

मयुरी वाघ
मयुरी वाघ यांना आपण ओळखतो ते “अस्मिता” या मालिकेसाठी. कोणतीही गोष्ट शोधली कि सापडतेच हा त्यांचा डायलॉग तर घराघरात प्रसिद्ध झाला होता. याच मालिकेत पियुष रानडे यांची महत्वपूर्ण भूमिका होती. मयुरी यांच्या अस्मिता या व्यक्तिरेखेच्या नवऱ्याची भूमिका होती. या मालिकेआधी एका डान्स शो दरम्यान त्यांची ओळख झाली. पुढे या मालिकेच्या निमित्ताने मैत्री झाली आणि ती मैत्री वाढत गेली. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि काही काळाने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १ फेब्रुवारी २०१७ हि त्यांच्या लग्नाची तारीख.

सध्या मयुरी या चला हवा येऊ द्या मध्ये दाखल झाल्या आहेत तर पियुष यांचा अजुनी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. त्यांच्या दोघांच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा !

अमृता खानविलकर
अमृता यांना आपण ओळखतो ते उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून. त्यांचे अनेक मराठी सिनेमे गाजले. हिंदीतही त्यांनी आपल्या अभिनयाने स्वतःची एक वेगळी जागा बनवली आहे. लॉकडाऊन आधी पार पडलेल्या खतरों के खिलाडी मध्ये त्या होत्या. खतरों के खिलाडी प्रमाणेच त्यांनी अनेक रियालिटी शोज मध्ये भाग घेतला आहे. मराठीतील एका पेक्षा एक असेल किंवा हिंदीतील नच बलिये. अशाच एका रियालिटी शो च्या निमित्ताने त्यांची भेट झाली होती ती त्यांच्या भावी पतीशी. त्यांनी २००४ मध्ये सिनेस्टार कि खोज या रियालिटी शो मध्ये भाग घेतला होता. याच शो च्या निमित्ताने त्यांची ओळख झाली ती हिमांशू मल्होत्रा यांच्याशी. या शो नंतर पुढे जवळपास दहा वर्षांनी या दोघांनी लग्न केलं. सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा देताना ते दोघेही म्हणतात कि, ओळख झाली तेव्हा दोघांचे स्वभाव थोडे वेगळे असल्याचं जाणवलं होतं, तरीही त्यांच्यात दोन गोष्टींबद्दल खूप आदर तेव्हाही होता आणि आजही आहे.

ते म्हणजे प्रामाणिकपणा आणि नात्यातील पारदर्शकपणा. पहिल्यांदा ओळख झाल्यानंतर ते लग्न होई पर्यंतच्या काळात आणि नंतरही त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले. पण एकमेकांना भक्कम साथ देत देत या दोघांनी सगळ्यांना समर्थपणे तोंड दिलं आहे. नच बलिये सारख्या शो मधून एकत्र कामही केलं आहे. हिमांशू यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाउंट वर याच शोच्या आठवणींना उजाळा देणारा एक छोटा विडीयो अपलोड केला होता. येत्या काळात या जोडीचा अभिनय असलेल्या अनेक कलाकृती आपल्या भेटीला येतीलच. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !

प्रिया बापट
आपल्या सगळ्यांच्या लाडक्या प्रिया बापट हिचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. याच निमित्ताने तिच्या नवऱ्याने म्हणजे उमेश कामत याने तिला प्रपोज केल्यानंतर हो म्हंटल्याचीही ऍनिव्हर्सरी झाली. प्रिया बापट आणि उमेश यांचा विवाह ऑक्टोबर २०११ मध्ये झाला होता. यंदा त्यांच्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण होतील. पण त्या आधी अनेक वर्षांपासून ते एकमेकांच्या प्रेमात होते. दोघांच्या वयात आठ वर्षाचं अंतर आहे. जेव्हा त्यांची मैत्री सुरु झाली तेव्हा त्या दोघांच्याही करियरची नुकतीच सुरुवात झाली होती. त्यामुळे त्यांनी लग्न करण्यास थोडा वेळ घेतला.

दोघांचीही करियर मार्गी लागल्यावर मात्र त्यांनी घरी कल्पना दिली. घरच्यांनीही मग होकार दिला आणि त्यांनी लग्न केलं. लग्नानंतरहि आज अनेक वेबसिरीज, मुलाखती, जाहिराती यांच्यामधून त्यांची प्रसन्न केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवायला मिळत असते. त्यांची हि केमिस्ट्री येत्या काळातही कायम राहो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मराठी गप्पाच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *