सेलिब्रिटी किड्स म्हणजे आपल्या सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय. मग ते अगदी लहान असोत किंवा मोठे असोत. ते कसे आहेत, कसे वागतात, त्यांच्या आई वडिलांप्रमाणे ते वागतात का आणि त्याचं आयुष्य कसं असतं या विषयी आपल्याला उत्सुकता असते. तर आज आपण अशाच काही मराठी स्टार किड्स काय काय करतात याचा मागोवा घेत आहोत.
अभिनय बेर्डे :
लक्ष्मीकांतजी आणि प्रियाजी बेर्डे यांनी आपल्या अभिनय, विनोद आणि नृत्य या कौशल्याने आपलं कित्येक वर्ष मनोरंजन केलंय. पण लक्ष्मीकांतजी यांच्या अचानक जाण्याने एक पोकळी निर्माण झाली. ती कधीही भरून येणार नाही. पण, या दोघांच्या मुलांमुळे अभिनयाचा हा वारसा पुढेही चालू राहील इतके नक्की. कारण, त्यांचा मुलगा, अभिनय याने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तो कॉलेजमध्ये नाटक, एकांकिका यांच्यामध्ये भाग घेत असे. पुढे ‘ती सध्या काय करते’ या सिनेमाच्या निमित्ताने त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केले. अंकुश चौधरी यांच्या ऐन तारुण्यातला रोल त्याने केला होता. पुढे ‘रम्पाट’ सुद्धा केला. अनेक कार्यक्रमांमधून तो गाण्यांवर थिरकतानासुद्धा दिसला आहेच. या पुढेही प्रेक्षकांना तो आनंद देत राहील एवढं नक्की.
श्रिया पिळगावकर :
सचिनजी आणि सुप्रीयाजी म्हणजे महाराष्ट्राची सर्वात लाडकी जोडी. त्यांचे सिनेमे किती प्रसिद्ध आहेत हे काही सिनेरसिकांना सांगायची गरज नाही. पण केवळ तेवढ्यावरच न थांबता त्यांनी अनेक कलाकृतींमध्ये भाग घेतला. ‘नच बलीये’चा पहिला सीजन जिंकणारी जोडी ती हीच. अशाच या लाडक्या जोडीची हरहुन्नरी मुलगी म्हणजे श्रिया पिळगावकर. तिनेसुद्धा आई वडिलांच्या पाऊलावर पाउल टाकून सिनेसृष्टीत प्रवेश केला. बालकलाकार म्हणून तिने काम केले ते “तू तू मै मै” या प्रसिद्ध सिरीयल मधे. मग सिनेकलाकार म्हणून २०१३ साली पदार्पण केलं. त्यासाठी तिला पुरस्कारही मिळाले आहेत. सध्या तिने आपलं लक्ष वेबसिरीज वर केंद्रित केल्याचं दिसतं आहे. ‘द गॉन गेम’ हि तिची भूमिका असलेली वेब सिरीज नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. करोना महामारीचा अंतर्भाव असलेली हि वेबसिरीज म्हणजे एक थ्रिलर आहे. अभिनयाच्या जोडीला तिने काही शॉर्ट फिल्म्सचं दिग्दर्शनही केलं आहे.
सखील परचुरे :
अतुल परचुरे आणि सोनिया परचुरे हि सुप्रसिद्ध जोडी. अभिनय आणि नृत्य या दोन्ही क्षेत्रात दोघांनी आपापली कला जपली, वाढवली. छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत त्यांनी आपलं कार्यक्षेत्र विस्तारलं. अशाच या गुणी कलाकारांची मुलगी म्हणजे सखील परचुरे. तिने ‘पोरबझार’ या सिनेमामधून अभिनयात पदार्पण केलंय. आणि अभिनयासोबतच तिला फॅशन क्षेत्रातही आवड आहेच. तिने याचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं असून, तिच्या फॅशन क्षेत्रातील कामाची झलक तिच्या सोशल मिडीयावर बघायला मिळते.
अनिकेत सराफ :
आडनाव वाचून लक्षात आलं असेलंच. आपल्या सगळ्यांचे लाडके अशोकजी सराफ आणि निवेदिताजी सराफ यांचा मुलगा. साधारणतः आई वडील सिनेमासृष्टीशी निगडीत असले कि त्यांची मुले सुद्धा या क्षेत्रात येतात. पण अनिकेतने त्याला आवडणाऱ्या क्षेत्रात जायचं ठरवलं. निवेदिताजींना स्वयंपाकघरात काम करताना पाहून त्याला पण कुकिंगची गोडी निर्माण झाली. पण केवळ एवढ्यावरच न थांबता, त्याने कुकिंगचं रीतसर प्रशिक्षण फ्रान्समधून पूर्ण केलं. या क्षेत्रात काम करता करता, त्याने युट्युबर म्हणून पण आपलं काम सुरु केलं आणि त्याचे कुकिंगचे विडीयोज फेमस सुद्धा झाले आहेत.
इशानी आठल्ये :
अलका कुबल-आठल्ये यांनी आपल्या अभिनयाने सिनेसृष्टी गाजवली आणि गाजवत आहेत. आता त्या छोट्या पडद्यावरही कार्यरत झाल्या आहेत. जज म्हणून आपण त्यांना पाहिलं आहेच आता त्या एका नवीन सिरीयलमधे सुद्धा आपल्याला दिसतील. त्यांचे पती श्री. समीर आठल्ये हे सुद्धा सिनेसृष्टीशी अनेक वर्षे निगडीत असून प्रथितयश सिनेमॅटोग्राफर आहेत. पण त्यांच्या जेष्ठ कन्येने मात्र या ऐवजी एक वेगळाच मार्ग निवडला आहे.
ती प्रशिक्षित पायलट म्हणून काही काळापूर्वी रुजू झाली आहे. पायलट होण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली होती. आणि आज ती
स्वतःच नाव त्या क्षेत्रात डौलाने फडकवायला सज्ज झाली आहे. तसच मिडीयामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार तिचं लग्न सुद्धा एका पायलट मुलासोबतच ठरलं आहे. तिच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा !