माणूस म्हणून आपण स्वतःवर अनेक बंधनं लादून घेत असतो. या बंधनातूनच मग आपली ओळख निर्माण होत असते. कारण ही बंधनं आपल्या आवडीनिवडीनुसार आलेली असतात. पण या सगळ्या बंधनांना छेद देत आपल्या सगळ्यांना एकत्र आणते ती कला. मग ती नृत्य कला असो, चित्रकला असो वा गायन. पण या सगळ्यांतही आपल्या जवळची वाटते ती म्हणजे गायन कला. म्हणूनच परदेशातील गाणी त्यातील भाषा न समजूनही आपलीशी वाटतात. एवढंच कशाला पण आपल्या मातृभाषेतील संगीत इतर भाषिकांकडून ऐकतानाही आपलंसं वाटतं. कारण संगीत हे भाषेपालिकडे जातं आणि भावनेने आपल्याला जोडतं. आज संगीत आणि भावनांविषयी बोलण्याचं कारण म्हणजे आपल्या टीमने पाहिलेला एक वायरल व्हिडियो. हा वायरल व्हिडियो आहे सुप्रसिद्ध कर्नाटकी संगीत गायिका रंजनी आणि गायत्री ह्यांचा.
रंजनी आणि गायत्री या दोघीही बहिणी. त्यांच्या आई वडील आणि इतर कुटुंबियांना कलाक्षेत्राविषयी विशेष प्रेम होतं. खासकरून गायन क्षेत्राविषयी. गायनाविषयीचं हे प्रेम या दोन्ही बहिणींमध्येही आलं. त्यामुळे अतिशय लहान वयात या दोघींनी गाण्याची तपस्या सुरू केली. त्यांचं बालपण आणि शिक्षण मुंबईत झालं. पुढे त्यांनी चेन्नई येथे जाऊन शास्त्रीय संगीताचे धडे ही गिरवले. आज जवळपास ३५ वर्षांहून अधिक काळ या दोघीही विविध कॉन्सर्टच्या माध्यमातून आपली कला सादर करत असतात. त्यांच्या या कॉन्सर्ट मधील एक कॉन्सर्ट म्हणजे ‘बोलावा विठ्ठल’. मूळच्या तामिळ असलेल्या रंजनी आणि गायत्री यांनी मराठी सोबतच विविध भाषांतून गायन केलेलं आहे. खासकरून मराठी अभंग हे त्यांच्या ‘बोलावा विठ्ठल’ कार्यक्रमातून आपल्याला ऐकायला मिळतात. आज आपल्या टीमने पाहिलेला वायरल व्हिडियो हा त्याच कॉन्सर्टचा एक भाग आहे.
हा व्हिडियो जेव्हा सुरू होतो, तेव्हा रंजनी आणि गायत्री जी दोघीही मंचावर एकत्र बसलेल्या असतात. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल हा अभंग त्या सादर करणार असतात. पण त्या आधी या अभंगाचं निरूपण त्या देत असतात. अभंगातून केली जाणारी विठ्ठल स्तुती त्या तामिळ आणि इंग्रजी भाषेतून उपस्थितांना समजावून सांगत असतात. काही वेळाने त्या दोघीही गायला सुरुवात करतात आणि पुढची पाच मिनिटं आपण केवळ विठ्ठल नामाचा आनंद घेत असतो. संगीतातील बारकावे सांगण्याइतपत आपण श्रेष्ठ नसलो तरीही जे आपण ऐकतो त्यातून या दोन्ही बहिणींची संगीत साधना आपल्याला कळून येते. कारण त्यांचा विठ्ठलाप्रति असलेला भक्तिभाव आपल्या पर्यंत पोहोचलेला असतो. पण म्हणून आपण केवळ एवढ्यावरच थांबतो असं नाही. आपण हा व्हिडियो पुन्हा पुन्हा पाहतो आणि तो स्वर्गीय आनंद पुन्हा अनुभवण्याचा यशस्वी प्रयत्न करतो.
रंजनी आणि गायत्री यांच्या गायकीविषयी बोलण्याची आमची योग्यता नाही त्यामुळे इथेच थांबतो. पण आपण मात्र त्यांची गायकी जरूर ऐकावी, त्यांनी गायलेले मराठी अभंग अनुभवावेत, ही आमची मनापासून इच्छा आहे. आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांसमोर आपल्या गायकीतून त्या विठ्ठलाचे रूप साकार करणाऱ्या रंजनी आणि गायत्री यांना मराठी गप्पाच्या टीमचा मानाचा मुजरा.
मराठी गप्पाची टीम ही आपल्या वाचकांप्रति फारच चौकस असते. त्यामुळे आम्ही प्रसिद्ध करत असलेले लेख आणि त्यातून मांडले जाणारे विषय आपल्याला आवडतात की नाही यावर आमचं बारीक लक्ष असतं. तेव्हा आपल्याला आवडणाऱ्या लेखांवर आपण आमच्या टीमला प्रोत्साहन देणाऱ्या कमेंट्स करता, त्या प्रोत्साहन देणाऱ्या कमेंट्स तर करत रहाच. सोबतच आपले हे लेख ही शेअर करत राहा. कारण आपल्याला होणारा आनंद हा वाटल्यामुळे द्विगुणित होतो. तेव्हा हे लेख नक्की शेअर करा. आपल्या अमूल्य वेळेसाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :