Breaking News
Home / जरा हटके / ह्या महिलेने व्हॉट्सअपवर वापरली हि आयडिया आणि उभा केला कोटींचा व्यवसाय

ह्या महिलेने व्हॉट्सअपवर वापरली हि आयडिया आणि उभा केला कोटींचा व्यवसाय

लॉकडाऊन ची सुरुवात झाली आणि आपल्या पैकी अनेक जणांनी छोटे किंवा मध्यम आकाराचे व्यवसाय करायला सुरुवात केली. अनेक हरहुन्नरी मराठी तरुण-तरुणी या निमित्ताने पुढे आले. काही जण, लॉकडाऊन आधीच उद्योग व्यवसायात उतरले होते. आपले हे व्यवसाय करताना आणि वाढवताना त्यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घेत व्हॉट्सअप, फेसबुक यांचा वापर करून आपला व्यवसाय वाढवला आहे. पण व्यवसाय म्हंटला कि त्यात उतार चढाव येतातच. पण तोटा होत असताना किंवा कठीण परिस्थितीतही डगमगून न जाता प्रवास केला तर यश हे नक्की मिळत. याच प्रवासानिमित्त दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा अनुभव आपल्या कामाला आला तरीही प्रवास करताना उमेद टिकून राहते. आपल्या नवं उद्यमी मित्र मैत्रिणींसाठी अशाच एका प्रेरणादायी प्रवासाची हि गोष्ट. हि गोष्ट त्यांना व्यवसायात तगून राहण्यास आणि तो वाढवण्यास प्रोत्साहन देईल हे नक्की.

हा प्रेरणादायी प्रवास आहे शनमुगा प्रिया यांचा. एका सामान्य घरातून येऊन, साड्या विकण्याचा छोटासा व्यवसाय करून त्याचे रुपांतर करोडो रुपयांच्या व्यवसायात करता येते याची हि प्रेरणादायी गोष्ट. पण त्यांच्या या व्यवसायाची सुरुवात मात्र आधी सांगितल्याप्रमाणे साध्या स्वरूपात झाली होती. शनमुगा प्रिया यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील कारपेंटर म्हणून काम करत. परिस्थिती बेताची असूनही आपल्या मुलीला शिक्षण द्यायचं असा त्यांच्या वडिलांचा मानस होता. तो त्यांनी पूर्णही केला. वडिलांनी किती कष्टाने आपल्याला वाढवलं आहे याची कल्पना असल्याने शनमुगा प्रिया यांनी शिक्षणानंतर लगेचच एच. आर. म्हणून नोकरी सुरु केली. आयुष्यात थोडी स्थिरता आली. पुढे त्यांचं लग्न झालं, मुलगा हि झाला. सगळं सुरळीत चालू होतं. पण नियतीच्या मनात काही वेगळ असावं.

सर्व काही सुरळीत चालू असताना त्यांच्या मुलाच्या हाताला दुखापत झाली होती. हाडाला मार लागल्याने हाताला प्लास्टर करावं लागलं होतं. त्यात, त्यांच्या पतीला दुसऱ्या ठिकाणी कामानिमित्त रहायला जावं लागलं होतं. घरी मदत करू शकतील अशा त्यांच्या सासूबाईचं निधन झालं. हे सगळं घडलं होतं अवघ्या तीन महिन्यांत. अशा वेळी मुलाची काळजी घेण्यासाठी मग त्यांना स्वतःची नोकरी सोडावी लागली. घर आणि मुलाला सांभाळायची जबाबदारी त्यांनी घेतली. पण त्यांना त्याचं मन स्वस्थ बसू देत नव्हतं. आपण घेतलेल्या शिक्षणाचा, अनुभवाचा फायदा व्हायला पाहिजे असं त्यांना वाटत होतं. तसेच आर्थिक परिस्थिती सुधारण्यात मदत करणं गरजेचं होतं. तेव्हा त्यांना कल्पना सुचली.

त्यांच्या सासूबाईनी शनमुगा प्रिया यांच्या पतीला एकट्याने वाढवलं होतं. आर्थिक गरज म्हणून साड्या विकण्याचा व्यवसाय सुरु केला होता. आईला या व्यवसायात हातभार म्हणून शनमुगा प्रिया यांचे पती लहानपणी सायकल वर जाऊन साड्या विककून आईला मदत करत असतं. याचे अनेक किस्से शनमुगा प्रिया यांनी ऐकले होते, तेव्हा आपणही तसं केलं तर असा विचार त्यांच्या मनात आला. थोड्या भांडवलात आपणही ते सुरु करू असं त्यांना वाटलं. काल होता २०१४-१५ सालचा. त्यांनी पतीशी चर्चा केली. त्यांनी पाठींबा दर्शवला. शनमुगा प्रिया यांनी मग एके दिवशी मुलाला सोबत घेतलं आणि सुरुवातीला २० साड्या विकत आणल्या. सुरुवात शेजारी पाजारी आणि नातवाईक यांना सांगून केली. साड्या विकण्यास सुरुवात झाली. व्यवसायाचा पूर्वानुभव नसल्याने शनमुगा प्रिया यांना काही वेळेस भीती वाटे कि हे गुंतवलेले पैसे बुडाले तर काय होईल. पण त्यांच्या पतीचा भक्कम पाठींबा त्यांना होता. हळूहळू का होईना जम बसत होता.

त्यात एक दिवस तो क्षण आला ज्याने त्यांच्या व्यवसायाला मोठं केलं. असेच एक दिवस त्या आपल्या मैत्रिणीशी बोलत होत्या. तर मैत्रीण म्हणाली कि साड्यांचे फोटो काढून मला व्हॉट्सअपवर पाठव म्हणजे तिला इतरांनाही दाखवता येतील. तो क्षण शनमुगा प्रिया यांच्यासाठी युरेका मोमेंट म्हणावा असा क्षण होता. त्यांना यातील व्यवसाय संधी जाणवली. त्यांनी तत्काळ काही साड्यांचे फोटोज काढून पाठवले. त्यांच्या मैत्रिणीने ते स्वतःच्या नातेवाईकांना आणि इतर मैत्रिणींना शेयर केले. हीच पद्धत त्यांनी त्यांच्या इतर व्हॉट्सअप ग्रुप्सवर अवलंबली. अवघ्या दोन दिवसात सगळ्या साड्या म्हणता म्हणता विकल्या गेल्या. ज्या साड्या विकायला एवढे कष्ट करावे लागत तिथे एवढ्या कमी वेळेत साड्या विकल्या गेल्या होत्या. त्यांच्या शेजाऱ्यांनी आणि इतर खरेदीदारांनी साड्यांची मागणी केली. चौकशी केली तर साड्या संपलेल्या बघून त्यांनाही आश्चर्य वाटलं. काहींनी त्यांच्या या व्यवसाय प्रारूपाचं (बिझनेस मॉडेलचं) कौतुक केलं. काहींनी अशाच प्रकारे या व्यवसायात शनमुगा प्रिया यांना मदत करण्याचा मानस व्यक्त केला. शनमुगा प्रिया यांनीही त्यांना या व्यवसायात सामावून घेतलं आणि व्यवसाय वाढीस सुरुवात केली. सुरुवातीला ९-१० स्त्रिया यात जोडल्या गेल्या साडी विक्रेता म्हणून. आज त्यांची संख्या काही हजारांत आहे.

व्हॉट्सअपवरून साड्या विकण्याची कल्पना सुचण्याअगोदर शनमुगा प्रिया २०,००० रुपयांची गुंतवणूक एका वेळेस खरेदी करताना करत. व्हॉट्सअपवर साड्या विकण्याच्या अभूतपूर्व यशानंतर तीच गुंतवणूक ५०,००० रुपये एका वेळेची खरेदी एवढी झाली होती. त्यांच्या एका मुलाखतीदरम्यान दिवसाला १०० पेक्षा जास्त साड्या विकल्या जातात असं त्यांनी नमूद केलं होतं. एवढेच नव्हे तर सुरुवातीला त्यांना साडी उत्पादकांकडे खरेदीदार म्हणून जावे लागे. आता उत्पादक स्वतःहून त्यांच्या जवळ स्वतःच्या साड्या विकण्यास घेऊन येतात. काही उत्पादक तर संपूर्णतः शनमुगा प्रिया यांच्या व्यवसायाला साड्या पुरविण्याचे काम करतात. यश आणि पैसा मिळाला कि व्यवसायाला कशी कलाटणी मिळते हे या उदाहरणातून पहायला मिळते. शनमुगा प्रिया यांचा व्यवसाय आज उद्योगात परावर्तीत झाला आहे. त्यांच्या यशाची नोंद अनेकांकडून घेतली गेली त्यात खुद्द व्हॉट्सअपची टीमसुद्धा समाविष्ठ आहे. त्यांच्या युट्युब चॅनेलवर शनमुगा प्रिया यांचा यशाचा विडीयोहि पहायला मिळतो.

त्यांच्या या प्रवासातून शिकण्यासारखं बऱ्याच गोष्टी आहेत. त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे परिस्थिती कशीही असो, परिस्थितीसमोर हरायचं नाही. आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी करता येतील त्यासाठी धडपड करायची. शनमुगा प्रिया यांनीही तशी धडपड केली आणि आज त्या करोडोंची उलाढाल करणाऱ्या यशस्वी उद्योगीनी आहेत. यात त्यांच्या पतीची त्यांना सदैव साथ लाभली हे सुद्धा कौतुकास्पद. येत्या काळातही त्यांचा हा यशाचा प्रवास उत्तरोत्तर वाढत जाओ हिच टीम मराठी गप्पा कडून त्यांना शुभेच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.