काही दिवसांपूर्वी आपल्या टीमने एक लेख लिहिला होता. त्या लेखाला आपला जो उत्तम प्रतिसाद मिळाला होता, ते पाहून तशाच पद्ध्तीचा एखादा व्हिडियो आहे का हे आमची टीम बरेच दिवस पाहत होती. कारण तुम्ही आनंदी तर आपली टीम पण आनंदी असते. पण बराच काळ झाला असा काही व्हिडियो मिळेना. आम्ही पण मधल्या काळात हा विषय विसरून गेलो होतो. पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्ट, योग्य वेळ आली की मिळतेच, फक्त इच्छा जबरदस्त पाहिजे. तसंच आज झालं. काही वर्षांपूर्वी पाहिलेला एक व्हिडियो आज अचानक समोर आला आणि आमचा शोध संपला. हा व्हिडियो आहे काही मुलांनी एकत्र येऊन सादर केलेल्या एका सादरीकरणाचा. ही मुलं विरार येथील एका रहिवासी संकुलातील मुलं होती. एका सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त त्यांनी ‘मेरे बायांका नाम’ या सुप्रसिद्ध गाण्यावर डान्स सादर केलेला होता.
या व्हिडियोची सुरवात होते तेव्हा एक दादा येऊन प्रेक्षकांनी पुढील दोन डान्सचा मनमुराद आनंद घ्यावा असं सांगतात आणि पाठी जातात. आता कोणता डान्स बघायला मिळणार असं वाटत असतानाच काही लहान मुलं, दररोजच्या वापरातील गोष्टी घेऊन मंचावर आलेली दिसतात. त्यात एक मुलगा गायक, दुसरा मुलगा गायिका आणि बाकीचे वादक झालेले असतात. नीट बघितलं तर उजवीकडचा मुलगा कोंबडा झालेला दिसतो. ज्यांनी हे गाणं ऐकलं आहे त्यांना कोंबड्याच्या उल्लेख झालेला तर आठवत असेलच. गाणं सुरू होतं आणि सगळे जणं नाचायला लागतात. त्यात आघाडीवर असतात ते गायक गायिका बनलेले मुलं. ज्यांना डान्स करायला आणि अभिनय करायला आवडतो अशी ही मुलं. त्यामुळे त्यांच्या देहबोलीतून आनंद ओसंडून वाहत असतो. त्यामुळे या व्हिडियो च्या काही क्षणातच आपण त्यांच्या सादरीकरणाशी एकरूप होऊन जातो. ते ही मस्त मजा घेत असतात. गाण्यात जेव्हा जेव्हा हार्मोनियम वाजतो तेव्हा तेव्हा गायक गायिका बनलेली पोरं त्या पेटीवाल्याकडे जातात आणि त्याला प्रोत्साहन देतात हे बघून हसूच येतं.
जास्त मजा येते जेव्हा ‘कोंबडा का’पता है’ हे वाक्य येतं तेव्हा. कोंबडा बनलेला मुलगा या वाक्यावर असा काही डान्स करतो की ज्याचं नाव ते. त्यात त्याला जोड मिळते ते गायिका बनलेल्या मुलाची. पाठी असलेला विशेष वाद्यवृंद सुद्धा काही कमी नसतो. त्यांच्या पण अतरंगी स्टेप्स चालू असतात. त्यात ‘कोई हार घालता है’ या वाक्यावर अजून एका मुलाची एन्ट्री होते आणि तो या दोन गायकांना हार घालून जातो ते पण मजेशीर वाटतं. पुढे पुढे तर आपण एवढे गुंगून जातो की काही विचारू नका. मग सुरू होतं दुसरं गाणं. मघाशी ते सूत्रसंचालक दादा काय बोलले याचा आता अंदाज येतो. शांता बाई हे अजून एक गाणं वाजण्यास सुरुवात झालेली असते. मग काय आधीच डान्स भिनलेली ही मुलं अजून उत्साहाने नाचायला लागतात. या गाण्यावर त्या गायिका बनलेल्या पोराचा उत्साह तर ओसंडून वाहत असतो. त्याच्यामुळे उपस्थित प्रेक्षक पण उत्साहित झालेले असतात. एखाद्या सादरकर्त्याच्या उत्साहित असण्यामुळे कार्यक्रमात किती फरक पडू शकतो हे आपल्याला दिसून येतं असतं. याच जल्लोषात या मुलांचा हा डान्स संपतो आणि व्हिडियो सुद्धा.
आपण शेवटी तर इतके हसत असतो की चल यार पुन्हा एकदा बघूया असं मनातल्या मनात म्हणतो आणि पुन्हा हा व्हिडियो बघतो. खरं सांगायचं तर या कार्यक्रमात विशेष काही खर्च केलेला नाही. नेहमीच्याच वस्तू गंमतीशीर पद्ध्तीने वापरल्या आहेत. पण यातील सहभागी मुलं मात्र पूर्ण माहोल अगदी उत्साहित करून सोडतात. कोणीही सादरकर्ते असतील आणि ते सादर करत असलेल्या गोष्टीचा आनंद घेणारे असले की सादरीकरण आपोआप उत्तम होतंच. हा व्हिडियो त्याचं उदाहरण. वारंवार पहावा वाटणाऱ्या या व्हिडियो वरील हा लेखही आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपल्याला आवडणाऱ्या व्हिडियोज, कलाकार, कार्यक्रम यांच्या वरील लेख आपली टीम वेळोवेळी प्रकाशित करत असतेच. आपला उत्तम प्रतिसाद ही लाभतो आम्हाला. तेव्हा या वेळीही काहीही कसर ठेऊ नका. आपल्याला हा लेख जेवढा शेअर करता येईल तेवढा करा. तसेच नवनवीन लेख रोज प्रसिद्ध होत असतात त्यांचाही न चुकता आनंद घ्या. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :