निरमा पावडरची सफेद आणि शुभ्र कपड्यांची जाहिरात आपण सर्वांनीच लहानपणी पाहिली असेल. पण त्या निरमा कंपनीवाल्यानी या पोरांचा हा व्हीडिओ पाहिला तर त्यांच्या तोंडाला फेस आल्याशिवाय राहणार नाही. अतरंगी डान्सचे अनेक प्रकार तुम्ही आजपर्यंत पाहिले असतील पण असलं काही पाहिलंयं का, पोरांनी असला भन्नाट डान्स होळीला पण केला नसेल. ही बच्चे कंपनी पोहोचली थेट पाण्याच्या काठावर डीजेवर निरमाचं गाणं लागलं. पोरांनी अंगावरचा शर्ट काढला आणि हवेत गरगर फिरवत डान्स सुरू केला. डान्स करता करता पोरांच्या अंगात इतकं भिनलं की सर्वांनी कपडे धुवायलाच सुरुवात केली. इथपर्यंतची स्टेप ही ठिक होती. स्टोरीची डिमांड होती. पण काही धडाकेबाज थेट जमिनीवर रेंगाळू लागले. इतकी बेफिकीर होऊन आयुष्य फक्त बालपणातच जगता येतं. शर्ट खराब होईल, आईबापाचे रट्टे बसतीलही पण ही मैत्री हा निखळ आनंद पुन्हा कधी येणार नाही.
या सगळ्यात शोधता आलेला आनंद केवळ श्रीमंतीत आनंद शोधणाऱ्यांनी हा व्हीडिओ नक्की पहावा. इतकी धमाल आपण शेवटी कधी केली होती. तो क्षण तुम्हाला आठवतोय का, मुलांच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू पहा. बालपण देगा देवा मुंगीसाखरेचा रवा, असं संत तुकाराम का म्हणत असतील याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. काहींचं बालपण अजून जगायचं असेल काहींच्या आयुष्यात ते पुन्हा येणार नाही. आलेल्या जबाबदाऱ्या कमी होणार नाहीत. पण एखाद्या क्षणासाठी का होईना सगळं दुःख विसरुन तुम्हाला यात रमता येईल का ते पहा. किंवा अशा व्हीडिओतनं आपलं बालपण रिलेट करा, तुमच्या मित्रांना पाठवा आणि आपण जगलेल्या बालपणाचा आनंद पुन्हा अनुभवा.
बघा व्हिडीओ :