म्हणता म्हणता २०२० संपत आलं. लॉकडाउन मग अनलॉक आणि त्यात जन्मलेली आणि रुजू घातलेली न्यू नॉर्मल जीवनशैली. एका वर्षात एवढी उलथापालथ होऊ शकते, हे मागील वर्षी कोणी सांगितलं असतं तर त्याला वेड्यात काढलं असतं. पण काही वेळेस अतर्क्य गोष्टी होतात आणि त्यातून आपल्याला तरून जावंच लागतं. या परिस्थितीने काही जण खचून जातात, तर काही त्यातही सकारात्मकतेचा शोध घेतात. असाच एक मुलगा म्हणजे कुशल कुमार माळी. शाळकरी वय. चुणचुणीत स्वभाव आणि बोलायला लागला की त्याची हुशारी कळून येते. अशा या कुशलचा एक व्हिडिओ आमच्या टीमच्या नजरेस पडला आणि त्याचं बोलणं एवढं मंत्रमुग्ध करून गेलं की त्याविषयी लिहावंसं वाटलं.
हा मुलगा या व्हिडियोत काय सांगतो, तर स्वतःचे आणि इतरांच्या मनातील विचार. पण त्यातील शिकण्यासारखी बाब म्हणजे त्यात असलेली सकारात्मकता. एवढ्याश्या वयात हा मुलगा जपान आणि व्हिएतनाम यांचं उदाहरण देतो. या देशांनी त्यांच्यावर न भूतो न भविष्यती आलेल्या संकटांचा कसा सामना केला याचे दाखले यात देतो. हा व्हिडीओ पाहणाऱ्या किंवा ऐकणाऱ्याला धीर यावा हा त्याचा उद्देश इथे स्पष्ट होतो. या उद्देशाला पटवून देण्यासाठी पुढे ओघवत्या भाषेत जेष्ठ विचारवंत अच्युत गोडबोले, लोकप्रिय गीतकार, संगीतकार गुलजार यांच्या ओळी उद्धृत करतो. व्हिडियोत वेळोवेळी शायरीची पेरणी केलेली आढळते. एवढेच नव्हे तर इंग्रजी भाषेतील कोट्स ही अगदी सहजगत्या बोलून दाखवतो. त्याच्या एकूणच हुशारीचं कौतुक यावेळेस वाटल्यावाचून राहत नाही. त्याला या त्याच्या कथानात ज्यांनी मदत केली असेल त्यांच्या कष्टाची दाद देणंही यानिमित्ताने महत्वाचं ठरतं.
व्हिडिओच्या शेवटी आपला पोशिंदा शेतकरी, रक्षणकर्ते सैनिक, पोलीस, को’विड योद्धे, शिक्षक, सफाई कामगार यांना तो नमन करतो आणि एक उत्तम यमक जुळवत व्हिडीओची सांगता होते. या संपूर्ण व्हिडिओतुन आपण सकारात्मक राहणं किती महत्त्वाचं आहे हे पटवून देण्यात कुशल काही अंशी यशस्वी ठरतो असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. त्याने दिलेल्या उदाहरणांतून आपण आपसूक ऊर्जा घेतो आणि आपल्यावर आलेल्या या अरिष्टाचा सामना करत राहावं असं ठरवतो. यावरून त्याच्या ओघवत्या वाणीची, कुशाग्र बुद्धीची, स्मरणशक्तीची दाद द्यावीशी वाटते. एखाद्या किर्तनाकारप्रमाणे विषय पटवून देणाऱ्या कुशल यांस मराठी गप्पाकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !