Breaking News
Home / माहिती / ह्या राजाच्या नावाने पोलंडमध्ये आहेत रस्ते आणि शाळा, कारण समजल्यावर भारतीय असल्याचा अभिमान वाटेल

ह्या राजाच्या नावाने पोलंडमध्ये आहेत रस्ते आणि शाळा, कारण समजल्यावर भारतीय असल्याचा अभिमान वाटेल

‘अतिथी देवो भवं’ हे केवळ तीन शब्द नव्हेत. त्यांच्यात आपले संस्कार आणि संस्कृती चे सार सामावलेले आहे. वसुधैव कुटुंबकम या आपल्या मानसिकतेला साजेसे असे हे विचार. वैयक्तिक स्वरुपात आपण हे आपण पाळत आलेलो आहोतच. या संकल्पनेभोवती फिरणारी अनेक उदाहरणे आपण आपल्या आजी आजोबांकडून, आई वडिलांकडून ऐकली असतील. अगदी पूर्वीच्या काळी दारात आलेल्या वाटसरूला हातावर गुळ आणि पाणी देण्याची पद्धत होतीच. याच आपल्या संस्कारांना आपण देश म्हणूनही जागलो आहोत. याचंच एक उदाहरण आपल्याला दुसऱ्या महायुद्धाच्या निमित्ताने पहायला मिळतं.

दुसरं महायुद्ध सुरु झालं १९३९ साली. त्याला सुरुवात झाली ते जर्मन आणि त्यावेळेच्या रशियन सोविएत युनियनच्या फौजांनी पोलंडवर आक्रमण केलं तेव्हा. तेथे लागोपाठ होणारे हल्ले परतवून लावताना तेथील सैनिक आणि नागरिक यांनी जीवाची पर्वा न करता लढाईत भाग घेतला. पण लवकरच असं लक्षात आलं कि इथल्या नागरिकांना देशाबाहेर काढलं पाहिजे आणि सुरक्षित स्थळी नेलं पाहिजे. तेव्हाचे पोलंडचे भूमिगत झालेले पंतप्रधान यांनी इंग्लंड चे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्याशी संपर्क केल्याचा उल्लेख आढळतो. तसेच इतर देशांनाही आवाहन केले गेले होतेच.

त्यांच्या या आवाहनाला पहिला प्रतिसाद मिळाला तो भारतातल्या नवानगर संस्थानातल्या जाम साहेब दिग्विजयसिंहजी रणजितसिंहजी जडेजा यांच्या कडून. लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी कि भारत हा तेव्हा पारतंत्र्यात होता. प्रसंगी जाम साहेबांना विरोधही झाला. पण, त्यांनी मात्र जे योग्य तेच करायचं असं ठरवलं. त्याच्या काही काळ आधी पोलंडहून लहान मुलामुलींची रवानगी देशाबाहेर करण्यात आली होती. पण अनेक ठिकाणी त्यांना आश्रय देण्यास नकार मिळाला असावा. मजल दरमजल करत काही महिन्यांत हे निर्वासित पोलिश नागरिक भारतात दाखल झाले. त्यांचा पहिला मुक्काम होता ते मुंबईमधील बांद्रा परिसरात. त्यांच्या आठवणींना जेव्हा ते उजाळा देतात तेव्हा असं लक्षात येतं कि कित्येक महिन्यानंतर त्यांना व्यवस्थित जेवण, अंघोळीसाठी पाणी आणि मानसिक विश्रांती मिळाली होती. ते इथे काही काळ थांबले. या काळात त्यांना जुजबी इंग्रजी शिकवण्यात आलं असा एके ठिकाणी उल्लेख आढळतो.

पुढे नवानगर संस्थानाच्या बालचडी येथे या निर्वासित मुलांचा मुक्काम हलवला गेला. तिथे त्यांना राहण्यास जागा म्हणजेच कँप उभारलेला होता. या कँपची व्यवस्था उत्तम आहे न याची खात्री स्वतः जाम साहेब महाराज करत होते. या मुलांना इथे परकं वाटू नये म्हणून बऱ्याच गोष्टींची काळजीही घेण्यात आली होती. उदाहरण घ्यायचं झालं तर त्यांना जे भारतीय जेवण पुरवलेलं असे, ते त्यांना तिखट वाटे. त्यामुळे त्यात काही बदल करण्यात आले. तसेच त्यांच्यासाठी शिक्षणाची व्यवस्थाहि करण्यात आली. शिक्षणासोबत त्यांना आवड असलेले खेळहि उपलब्ध करून दिले गेले. एकदा तर स्थानिक संघ आणि ह्या मुलांचा संघ असा एक सामना झाला. त्यात तेव्हा लहान वय असलेल्या आणि आता वयस्क असलेल्या मुलाने आपली आठवण सांगताना असं नोंदवून ठेवलंय कि हा सामना ह्या मुलांनी जिंकला. पण तरीही त्यांचं जाम साहेब महाराज यांनी कौतुक केलं. जाम साहेब यांच्या कडून एवढं प्रेम मिळत असताना, स्थानिकांकडूनही त्यांना आदरार्थी वागणूक मिळत होती.

एवढं प्रेम मिळत असताना, हि लहान मुलं भारावून न जातील तर नवलंच. पुढे दुसरं महायुद्ध संपलं. पण युद्ध संपलं तरीही त्यानंतरच्या वाटाघाटी या असतातच. तसेच एकदा गरम झालेलं वातावरण शमण्यास वेळ हा लागतोच. त्यामुळे युद्ध संपलं त्या नंतर काही काळ हि मुलं भारतातच होती. फक्त दरम्यानच्या काळात त्यांचा मुक्काम कोल्हापूर येथील वळीवडे येथे झाला. तिथेही त्यांची उत्तम काळजी घेतली गेली. पुढे यातील काही मुले आपल्या नातेवाईकांकडे, इतर देशांत गेली. तर काही थेट मायदेशी. काहींनी भारतीयांसमवेत, भारत स्वतंत्र होताना अनुभवला. पण साधारण १९४८ पर्यंत तेही परत गेले.

पण लहान पणात आलेले अनुभव कसे विसरता येतील. किंबहुना, न कळत्या वयात दुसऱ्या देशात राहिलेले असतानाही एवढी उत्तम वागणूक मिळाली यांमुळे भारत, इथले नागरिक त्यांना सदैव स्मरणात राहिले. सगळ्यांत जास्त स्मरणात राहिले ते जाम साहेब महाराज दिग्विजयसिंहजी रणजितसिंहजी जडेजा यांचं योगदान. आज जाम साहेब यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तेथील रस्ते आणि महत्वाच्या वास्तूंना त्यांचं नाव देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. तसेच तेथील वृत्तपत्रात अनेक वेळेस जाम साहेब यांच्या योगदानाची प्रशंसा करणारे लेख मान्यवर व्यक्तींनी प्रसिद्ध केलेले आहेत. जाम साहेब दिग्विजयसिंहजी रणजितसिंहजी जडेजा यांचं ३ फेब्रुवारी १९६६ रोजी देहावसान झालं. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त २०१६ साली भारत सरकार आणि पोलंडचे सरकार यांनी काही उपक्रम हाती घेतले. या उपक्रमा अंतर्गत दोन्ही सरकारांच्या विद्यमाने ‘द लिटील पोलंड’ हा लघुपट प्रदर्शित केला गेला. या लघुपटा अंतर्गत त्या काळी इथे भारतात राहिलेल्या लहान मुलांनी जी अर्थात आत्ता वयस्क नागरिक आहेत त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला होता. या निमित्ताने जाम साहेब यांची या काळातील काही जुनी छायाचित्रेही या लघुपटात पहायला मिळतात. आजही पोलंडचे नागरिक आपल्या नातेवाईकांसकट जे इथे राहिले होते त्यांच्यासोबत भारत भेटीवर येत असतात.

गेल्याच वर्षी म्हणजे २०१९ साली पोलंडचे राजदूत आणि कोल्हापुरात त्या काळी वास्तव्यास असलेले पोलंडचे नागरिक वळीवडे येथे आले होते. या प्रसंगी खासदार आणि कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी या राजनैतिक अधिकाऱ्यांचे स्वागत केले. तसेच या प्रसंगी त्यावेळेच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्यात आला. महत्वाची बाब म्हणजे यावेळी कोल्हापुरात राहिलेल्या पोलिश नागरिकांच्या स्मरणार्थ उभारलेल्या एका स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे पोलंडच्या राजदूतांनी यावेळी हिंदी भाषेतून भाषण आणि संभाषण केल्याचे पाहायला मिळते. भारतीय नागरिकांनी स्वतः पारतंत्र्यात असताना दाखवलेल्या या अतिथी देवो भवं या वृत्तीचे आजही पोलंडवासियांना असलेले कौतुक हे प्रशंसनीय आहे. त्यांच्या वृत्तीतून आजही कृतज्ञता दिसून येते. येत्या काळातही भारत आणि पोलंड यांच्या मधील हा ऐतिहासिक दुवा आणि त्यामुळे निर्माण झालेले स्नेहबंध असेच घट्ट व्हावेत हीच टीम मराठी गप्पाची सदिच्छा !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *