Breaking News
Home / मराठी तडका / ह्या लोकप्रिय कलाकाराने साकारली होती कवट्या महाकाळची भूमिका, झपाटलेला चित्रपटात सुद्धा केले आहे काम

ह्या लोकप्रिय कलाकाराने साकारली होती कवट्या महाकाळची भूमिका, झपाटलेला चित्रपटात सुद्धा केले आहे काम

महेश कोठारे. बस्स नाम ही काफी है. काही कलाकार असे असतात, ज्यांची नावं घेतल्यानंतर मनोरंजन होणारंच ही खात्री प्रेक्षकांना असते. पण प्रेक्षकांच्या मनात हे स्थान इतकी दशकं कायम ठेवणं कठीण असतं. पण प्रेक्षकांना कोणत्या पद्ध्तीचं मनोरंजन आवडतं याची नाडी ओळखलेले महेशजी, मात्र अगदी सहजतेने प्रेक्षकांचं मनोरंजन करून जातात, त्यामुळे आजही त्यांच्या कलाकृती लोकप्रिय ठरतात. इतकेच नव्हे तर, त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला सिनेमांतून दाखवलेल्या व्यक्तिरेखा आजही आपल्या आठवणींच्या कप्प्यात ताज्या असतात. त्यांची अशीच एक कलाकृती म्हणजे धडाकेबाज हा सिनेमा. त्यांच्या सिनेमांची नावे नेहमीच उत्साहाने ओतप्रोत भरलेली आणि जरा वेगळीच असंत. कथाही नेहमीच्या कथानपेक्षा वेगळी असते. धडाकेबाज हे त्याचं उत्तम उदाहरण.

धडाकेबाज या सिनेमाच्या कथेनुसार गंगाराम नामक एक पुरातन काळातील व्यक्ती एका बाटलीत अडकलेला असतो. त्याच्याजवळ असलेल्या जादुई वाळूने तो मनातल्या इच्छा पूर्ण करू शकतो. यात लक्ष्मीकांत बेर्डे यांचा डबल रोल होता. सिनेमातील त्यांच्या भूमिकेस अपेक्षेप्रमाणे खूप प्रसिद्धी मिळाली. सोबतच अजून एक व्यक्तिरेखेस प्रसिद्धी मिळाली. ती म्हणजे कवठ्या महाकाळ. हा त्या सिनेमातील खलनायक. हा खलनायक इतर खलनायकांपेक्षा वेगळा होता. म्हणजे तो सिनेमात इतर खलनायकांसारखा अन्याय करताना दाखवला होता, पण त्याचा चेहरा दिसत नसे. त्यामुळे तो अजून भीतीदायक आणि त्याच्याविषयी गूढ वाटे. महेश कोठारे यांच्या इतर सिनेमातील खलनायक कोण होते, हे आपण त्यांना पाहून ओळखू शकतो. अगदी, तात्या विंचू हा बाहुला असला तरीही त्याचा आवाज हा जेष्ठ अभिनेते, दिलीप प्रभावळकर यांचा आहे, हे आपणांस माहिती असते. तसेच कुबड्या खविस असो वा इतर खलनायक. त्यांच्या खलनायकी मुखवट्या पाठीमागे कोणते कलाकार होते हे नेहमी कळे, पण कवठ्या महाकाळच्या मुखवट्यापाठी कोण आहे हे अगदी आत्ता आत्ता पर्यंत माहिती नव्हतं. पण, काही काळापूर्वी महेशजींनी स्वतःहून याचा खुलासा केला.

महेशजींच्या डोक्यात नेहमीच होते कि, त्यांना एक असा व्हिलन दाखवायचा आहे कि त्याच्या चेहरा कधीच कोणाला दिसणार नाही. तो पूर्णपणे मुखवट्यात असेल. आणि तेही सांगाड्याच्या मुखवट्यात. त्यामुळे तो एकदम भयानक दिसेल. तसेच कवट्या महाकाल या खलनायकाच्या नावासोबत एक किस्साही आहे. त्यांचे ह्याआधी रिलीज झालेल्या चित्रपट कसे व्यवसाय करत आहेत, लोकांचा त्या चित्रपटांना कसा प्रतिसाद मिळत आहे हे पाहण्यासाठी ते अनेक ठिकाणी फिरले. असंच एकदा ते कवठे महंकळ ह्या गावी गेले. जेव्हा त्यांनी हे नाव पाहिले, तेव्हा त्यांना त्या नावात काहीतरी कुतूहल जाणवले. मग त्यांनी विचार केला कि त्यांना स्कल लूक म्हणजेच डोक्याची कवटी असलेला व्हिलन हवा आहे, तर कवट्या महाकाळ हे नाव त्यासाठी खूप चांगले दिसेल. आणि तेथूनच मग कवट्या महाकाळचा जन्म झाला. कवठे महंकळ या नावाचा अपभ्रंश करून कवठ्या महाकाळ हे नाव धडाकेबाज या सिनेमातील खलनायकास दिले गेले. तिथपासून ते आजतागायत हा खलनायक अतिशय प्रसिद्ध झालेला आहे.

महेशजींनी सोशल मिडियावरती केलेल्या एका पोस्टमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक बिपीन वर्टी हे कवठ्या महाकाळ याच्या मुखावट्यापाठी होते, असा खुलासा केला आहे. बिपिन वर्टी यांनी ह्या भूमिकेत काही काळ काम केले. पण त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांना ही भूमिका पूर्णवेळ करता आली नाही. त्यामुळे त्यांच्याऐवजी इतरही काही कलाकारांनी कवठ्या महाकाळच्या मुखवट्यापाठी राहून अभिनय केलेला होता. बिपीन वर्टी ह्यांच्या नंतर तब्बल आठ कलाकारांनी ह्या चित्रपटात कवट्या महाकाळची भूमिका साकारली होती. इतकंच काय, चित्रपटाचे दिग्दर्शक महेश कोठारे ह्यांना सुद्धा त्या आठ कलाकारांची नावे आठवत नाहीत. परंतु हि भूमिका सुरुवातीला साकारणारा आणि त्याचा आवाज हा बिपीन वर्टी ह्यांचाच आहे, असे महेश कोठारे ह्यांनी सांगितले. हा खलनायक साकारणारे बिपिन वर्टी स्वतः एक उत्तम अभिनेते आणि दिग्दर्शक. त्यांनी अनेक सुप्रसिद्ध मराठी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. एक गाडी बाकी अनाडी, पोरींचा मामला, डॉक्टर डॉक्टर हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे. त्यांच्या सिनेमांचे विषयही साचेबद्ध कथानपेक्षा वेगळे आणि रंजक असत. बिपीन वर्टी ह्यांनी लोकप्रिय चित्रपट ‘झपाटलेला’मध्ये खुबड्या खविसची भूमिका साकारली होती.

कवठ्या महाकाळ नंतरही महेशजींनी अनेक खलनायक विविध सिनेमांतून दिले. त्या कथानकात आणि व्यक्तिरेखांत त्यांनी सदैव काही ना काही वेगळं, अनपेक्षित, मनोरंजक असं देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच उत्तमोत्तम कलाकार घेऊन कलाकृती सादर करण्याकडे त्यांचा कल असतो. या कलाकारांत सर्वात वरचं नाव म्हणजे लक्ष्मीकांतजी बेर्डे. या दोघांची पहिली भेट कशी आणि कधी झाली आणि महेशजींनी लक्ष्मीकांतजींना एक रुपयात सिनेमासाठी कसं साइन केलं हा ही एक रंजक किस्सा आहे. हा लेख आपण वाचला आहेतच. तर लक्ष्मीकांतजी आणि महेशजींचा उल्लेखलेला किस्सा वाचण्यासाठी वर उपलब्ध सर्च ऑप्शन मध्ये जा. तिथे जाऊन महेश कोठारे असं टाईप करा आणि सर्च करा. तुम्हाला मराठी गप्पाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेला लेख नक्की सापडेल. मराठी गप्पाचे नियमित वाचक असल्याबद्दल धन्यवाद !

(Author : Vighnesh Khale)

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *