आपण नेहमीच एक गोष्ट म्हणत असतो, ती म्हणजे – ‘हल्ली काय सांगता येत नाही हो, कधी काय होईल याचा नेम नाही’. आपल्या बोलण्यातून हे वाक्य अनेकवेळा डोकावलेलं असेल. पण काही वेळा या वाक्याची प्रचिती ही येते आणि त्याची दाहकता कळते. गेल्या काही काळात तर क्रिकेट रसिकांना याची प्रचिती ही वारंवार आलेलीच होती. दुर्दैवाने आज याची पुनरावृत्ती होताना आपण अनुभवतो आहोत. कारण एकेकाळी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा आधारस्तंभ असणारा अष्टपैलू खेळाडू, अँड्रु सायमंड्स याचे एका वाहन अपघा’तात नि’धन झालेले आहे.
शनिवारी रात्री टाऊन्सविल, क्वीनसलँड येथे अँड्रु सायमंड याची गाडी रस्त्यावरून बाजूला गेली आणि तिचा अपघा’त झाला. हा अपघा’त इतका भीषण होता, की अँड्रू याला काही वेळातच मृ’त घोषित करण्यात आले. मृ’त्यसमयी या दमदार खेळाडूचे वय केवळ ४६ वर्षे इतके होते. इतक्या कमी वयात त्याचं हे अस जाणं म्हणजे खऱ्या क्रिकेट रसिकांच्या मनाला चटका लावून जाणारं आहे. अँड्रू सायमंड हे नाव आपल्या भारतीयांसाठी का परिचित आहे हे काही वेगळं सांगायला नको आणि त्या विषयी आज बोलणं ही नको. पण म्हणून अँड्रू सायमंड याची केवळ इतकीच ओळख होती का? नक्कीच नाही.
हा खेळाडू या पेक्षा किती तरी पटीने मोठा होता. त्याने राष्ट्रीय, कौंटी तसेच आंतरराष्ट्रीय अशा विविध स्तरांवर चमकदार कामगिरी केली होती. तो लहानपणापासूनच मुळात खेळांचा चाहता होता. क्रिकेट सोबतच त्याला रग्बी हा खेळ आवडत असे. गेल्या काही वर्षात, सामाजिक कारणांसाठी खेळल्या जाणाऱ्या काही रग्बी सामन्यांचा तो भाग राहिला होता. पण तरी त्याच्या पूर्ण आयुष्यावर क्रिकेट या खेळाची जी मोहिनी होती ती कायम होती. यात त्याला त्याच्या वडिलांनी प्रोत्साहन दिलं होतं. शिक्षक असलेले त्याचे वडील क्रिकेटचे मनापासून चाहते होते. त्यामुळे लहानपणापासून त्यांनी अँड्रूला प्रोत्साहन दिलं. ते स्वतः त्याला अनेक सामान्यांना घेऊन जात असत. त्याने ही यात अतिशय लक्षणीय कामगिरी करत या प्रोत्साहनाच चीज केलं होतं. याची परिणिती लवकरच दिसून आली. मानाच्या समजल्या जाणाऱ्या कौंटी क्रिकेट मध्ये तो खेळला. पुढे संपूर्ण आयुष्यात तो जवळपास चार कौंटिंकडून खेळला. जबरदस्त कामगिरी केली. एका सामन्यात तर त्याने एका इनिंग मध्ये १६ आणि दुसऱ्या इनिंग मध्ये ४ असे एकूण २० षटकार खेचले होते. त्यावेळी हा एक विश्वविक्रम होता. त्याची कामगिरी वृद्धिंगत होत होती.
एक वेळ तर अशी होती की इंग्लंडच्या राष्ट्रीय टीमकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी त्याला चालून आली होती. पण त्याने मात्र ऑस्ट्रेलियाकडूनच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचा निर्णय घेतला. अर्थात अस असलं तरी हा प्रवास अगदीच सोप्पा नव्हता. सुरुवातीस त्याचं क्षेत्ररक्षण हे बॅटिंग आणि बॉलिंग पेक्षा उजवं मानलं जाई. हळूहळू त्यातील अष्टपैलू गुण आंतरराष्ट्रीय स्तरावर ही चमकायला लागले आणि मग त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. २००३ ते २००७ या काळात क्रिकेट विश्वावर सत्ता असणाऱ्या क्रिकेट संघाचा तो एक प्रमुख भाग होता. त्याचा हा झंजावात आपण सगळ्यांनीच पाहिला आहे. मैदानावर हा खेळाडू असणं म्हणजे जवळजवळ कर्दनकाळ उभा असण्यासारखं असे. पुढे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला घरघर लागली असली तरी आय. पी. एल. सारख्या त्यावेळी नवीन स्पर्धेत त्याने जान फुंकली होती. त्यावेळी त्या स्पर्धेतील दुसरा महागडा खेळाडू ठरला होता. त्याची परतफेड त्याने उत्तम कामगिरी करून दिलीच होती. पण पुढे तो हळूहळू क्रिकेट मधून बाहेर पडला. मध्यंतरी बिग बॉस च्या पाचव्या सिजन मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून आणि मग अक्षय कुमार यांची भूमिका असलेल्या, ‘पटियाला हाऊस’ सिनेमात तो दिसला होता.
हे सगळं त्याने अवघ्या या उण्या पुऱ्या ४६ वर्षांच्या आयुष्यात केलं होतं. त्यामानाने त्याचं हे जाणं हे तरुण वयाचं आहे. पण हल्ली कधी काय होईल आणि कोणती बातमी कानी येईल हे सांगता येत नाही. या लेखाच्या निमित्ताने अँड्रू सायमन्ड्स या दमदार अष्टपैलू खेळाडूला श्रद्धांजली ! त्याच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो हीच सदिच्छा.
मंडळी, हा होता आपल्या टीमने लिहिलेला लेख ! आपली टीम विविध विषयांवर लेखन करत असते. यापुढेही आपल्याला आमच्या टीमकडून वैविध्यपूर्ण लेख वाचायला मिळतीलच याची खात्री बाळगा. तसेच आपण आम्हाला जे प्रोत्साहन देत आहात ते यापुढेही देत राहा. लवकरच नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत निरोप घेतो. धन्यवाद !